मराठी

पश्चात्तापाचे सौंदर्य

10 एप्रिल 2021
पुनरुत्थानाच्या अष्टकातील शनिवार
आजची वाचने

व्हिडिओ

येशूचे पुनरुत्थान झाल्यावर, आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे तो सर्वप्रथम मरिया मग्दालेना हिला दिसला. तिच्यातून त्याने सात भुते घालवली होती. मार्क 16:9

पवित्र शास्त्रातील नोंदीनुसार, येशू सर्वप्रथम मरिया मग्दालेना हिला दिसला. विशेष म्हणजे, येशूने तिच्यातून सात भुते घालवली होती. सात भुतांनी तिला पछाडले होते, याचा अर्थ ती पूर्णपणे त्यांच्या ताब्यात होती, असा परंपरेने लावला जातो. येशूने तिला मुक्त करण्यापूर्वी, तिने स्वतःच्या इच्छेने दुष्टतेला शरण गेल्यामुळे सैतानाने आणि त्याच्या भुतांनी तिच्या इच्छाशक्तीवर पूर्ण ताबा मिळवला होता. तरीही, इतका भयंकर भूतकाळ असलेल्या याच स्त्रीला येशूने आपल्या पुनरुत्थानानंतरचे पहिले दर्शन देण्याचा मान दिला. किती आश्चर्यकारक गोष्ट!

प्रत्येकाला एक भूतकाळ असतो. काही जणांनी गंभीर पापे केली आहेत. तर लिझियेची संत तेरेझ हिच्यासारख्या काहींनी एकही मर्त्य पाप केलेले नाही. संत तेरेझसारख्या आत्म्याचे सौंदर्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे आणि अशा आत्म्याला स्वर्गात मोठे प्रतिफळ मिळेल. पण गंभीर पाप केलेल्या व्यक्तीचे काय? मरिया मग्दालेनाप्रमाणे अत्यंत पापमय जीवन जगलेल्यांचे काय? आपला प्रभू त्यांच्याविषयी काय विचार करतो?

पवित्र शास्त्रातील नोंदीनुसार पुनरुत्थित प्रभूला पाहणारी पहिली व्यक्ती मरिया मग्दालेना होती. या गोष्टीवरून आपल्याला बरेच काही समजते: ज्या व्यक्तीने गंभीर पापाशी मोठा संघर्ष केला, पण नंतर त्या पापावर मात करून ती पूर्ण अंतःकरणाने आपल्या प्रभूकडे वळली, तिच्याकडे येशू कसा पाहतो, हे यातून दिसते. पाप मनोबल खच्ची करते. पापाचा पश्चात्ताप केला नाही, तर आपल्या प्रतिष्ठेला आणि चारित्र्याच्या सचोटीला धक्का बसतो. मात्र पश्चात्ताप केल्यानंतरही काही जणांना मन पोखरणाऱ्या अपराधीपणाशी आणि लज्जेशी झगडावे लागते. काहींच्या बाबतीत सैतान या संघर्षाचाच हत्यारासारखा वापर करतो. आपल्या प्रभूची तळमळीने आणि उत्साहाने सेवा करण्यास आपण पात्र नाही, असे त्यांना वाटायला लावून तो त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करतो.

पण देवाच्या दृष्टीने सत्य असे आहे की पश्चात्ताप करणारे पापी खरे रत्न आहेत; आपल्या प्रभूच्या नजरेत ते सुंदर आहेत. ते सर्वोच्च सन्मानास पात्र आहेत. देव आपली गतपापे मनात धरून बसत नाही. उलट, आपण त्या पापांचा पश्चात्ताप केला आणि आपल्याला त्यांची क्षमा मिळाली, तर तीच पापे देवाच्या प्रेमाचे आणि दयेचे चिरंतन चिन्ह ठरतील.

तुम्ही भूतकाळात केलेल्या पापांकडे कसे पाहता? सर्वप्रथम, तुम्ही ती पापे पूर्णपणे कबूल केली आहेत का, त्यांचा पश्चात्ताप केला आहे का आणि आपल्या प्रभूकडे क्षमा मागितली आहे का? तसे केले असेल, तरीही ती पापे तुम्हाला सतावतात का? सैतान अजूनही तुमच्या भूतकाळाची आठवण करून देऊन देवाच्या दयेवरील तुमची आशा हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो का?

आज तुम्ही भूतकाळात केलेल्या सर्वांत गंभीर पापांवर चिंतन करा. पापस्वीकारात ती अजून कबूल केली नसतील, तर शक्य तितक्या लवकर ती कबूल करा. ती कबूल केली असतील, तर देवाच्या नजरेतून स्वतःच्या आत्म्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा. देव तुमच्या गतपापांकडे रागाने किंवा किळसने पाहत नाही. उलट, तुमचे मनपरिवर्तन किती खोलवर झाले आहे, तुम्हाला पापांबद्दल किती दुःख आहे आणि तुमचा पश्चात्ताप किती खोल आहे, एवढेच तो पाहतो. त्याच्या दृष्टीने हे पवित्र आणि सुंदर आहे. आपल्या पश्चात्तापी अंतःकरणाच्या सौंदर्यावर मनन करा. असे करताना तुम्ही स्वतःच्या अंतःकरणाकडे देवाच्या नजरेतून पाहत आहात, हे लक्षात ठेवा.

हे माझ्या परम दयाळू देवा, तू पाप्यावर प्रेम करतोस आणि पापाचा द्वेष करतोस. माझ्या आकलनापलीकडच्या रीतीने तू माझ्यावर प्रेम करतोस. मी पूर्ण मनाने पश्चात्ताप करतो तेव्हा माझ्या अंतःकरणावर तुझे किती गाढ प्रेम असते, हे मला समजायला मदत कर. माझ्या अंतःकरणाकडे केवळ तुझ्याच नजरेतून पाहण्यास मला मदत कर. हे प्रिय प्रभू, तुझ्या प्रेमाबद्दल आणि दयेबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

ईस्टरसाठी आणखी साहित्य

नववा दिवस: दैवी दयेच्या रविवारच्या तयारीची नोव्हेना

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वर ठळकपणे दाखवलेली चित्रे: मरिया मग्दालेनाला दर्शन देणारा ख्रिस्त, ‘मला स्पर्श करू नकोस’ — रेम्ब्रांट यांची कलाकृती



दैवी दयेवरील दैनंदिन चिंतन:
संत फॉस्तिनाबरोबर 365 दिवस