मराठी

अपरंपार विपुलता

16 एप्रिल 2021
पास्काच्या दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवार
आजची वाचने

व्हिडिओ

“उरलेले तुकडे गोळा करा, म्हणजे काहीही वाया जाणार नाही.” तेव्हा त्यांनी ते गोळा केले. जवाच्या पाच भाकऱ्यांपैकी लोकांना खाऊन उरलेल्या तुकड्यांनी त्यांनी बारा विणलेल्या टोपल्या भरल्या. योहान 6:12–13

योहानाचे शुभवर्तमान प्रतीकात्मक अर्थांनी समृद्ध आहे. वर दिलेल्या उताऱ्याने भाकरी आणि मासे यांच्या वाढीच्या चमत्काराचे वर्णन संपते. केवळ जवाच्या पाच भाकऱ्या आणि दोन मासे यांनी एवढ्या मोठ्या जनसमुदायाला जेवू घातल्यावर, उरलेल्या अन्नाने बारा विणलेल्या टोपल्या भरल्या. एवढे अन्न का उरले?

या उताऱ्यावर भाष्य करताना संत ऑगस्टिन सांगतात की, त्या मोठ्या जनसमुदायाच्या आकलनापलीकडील आध्यात्मिक सत्ये प्रतीकातून दाखवण्यासाठी येशूने लोकांना खाता येईल त्यापेक्षा अधिक अन्न दिले. येशूच्या शिकवणुकीतून जनसमुदायाला असे आध्यात्मिक पोषण मिळाले की ते पूर्णपणे तृप्त झाले. पण येशूने जे शिकवले त्याने लोक तृप्त झाले असले, तरी त्याला अजून पुष्कळ काही शिकवायचे होते. उरलेल्या बारा टोपल्या ही अधिक सखोल आध्यात्मिक सत्ये दर्शवतात.

बारा टोपल्या हे बारा शिष्यांचे प्रतीक आहे. आणखी पुष्कळ काही ग्रहण करण्यासाठी येशूने त्यांची खास निवड केली होती. येशू लोकसमुदायाला दाखल्यांतून शिकवत असे आणि नंतर एकांतात त्या बारा शिष्यांना त्यांचा अर्थ समजावून सांगत असे, ते प्रसंग आठवा. बहुतेक लोकांना समजून घेता आणि स्वीकारता येत नव्हती, अशी काही सत्ये येशूने त्यांना उलगडून सांगितली.

या चमत्काराच्या संदर्भात लोकांच्या तीन वेगवेगळ्या गटांचा विचार करून आज आपण त्यांपैकी कुठे आहोत हे पाहणे उपयुक्त ठरेल. पहिल्या गटात ते लोक येतात जे चमत्काराच्या वेळी तिथे हजरही नव्हते. त्या निर्जन ठिकाणी येशूच्या सहवासात राहण्यासाठी ते गेलेच नाहीत. आपल्या समाजात हाच सर्वांत मोठा गट आहे. हे लोक आपल्या प्रभूकडून थोडेसेही आध्यात्मिक पोषण मिळवण्याचा प्रयत्न न करता आपले दैनंदिन जीवन जगत असतात.

दुसरा गट म्हणजे येशूच्या सहवासात राहण्यासाठी त्याच्यामागे गालील सरोवराच्या दूरच्या तीरावर गेलेला हा “मोठा जनसमुदाय.” हे लोक दररोज आपल्या प्रभूचा आस्थेने शोध घेणाऱ्यांचे प्रतीक आहेत. ते श्रद्धेने मिस्साबलिदानात सहभागी होतात, पवित्र शास्त्राचे वाचन करतात आणि रोज प्रार्थना व अभ्यास करतात. आपल्या प्रभूकडून त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि त्याच्या पवित्र वचनातून व संस्कारांतून त्यांचे पोषण होते.

तिसरा गट म्हणजे बारा शिष्य. उरलेल्या बारा विणलेल्या टोपल्या हे त्यांचे प्रतीक आहे. ते आपल्या प्रभूशी विलक्षण निष्ठावान असतात आणि प्रभू त्यांचे विपुल प्रमाणात पोषण करत राहतो. ते सर्वांत गहन आध्यात्मिक सत्ये समजून घेण्याचा आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांच्या अंतरंगाचे पोषण व्हावे आणि अगदी खोलवर परिवर्तन घडावे.

आज या गोष्टीवर चिंतन करा: आपला प्रभू तुम्हाला देऊ इच्छित असलेले आध्यात्मिक अन्न बहुतेकदा तुम्ही लगेच स्वीकारून आत्मसात करू शकाल त्यापेक्षा कितीतरी अधिक असते. हे लक्षात येणे ही आणखी मिळावे म्हणून स्वतःला तयार करण्याची पहिली पायरी आहे. प्रभूकडून मिळणाऱ्या या विपुल आध्यात्मिक अन्नावर चिंतन करताना, आध्यात्मिक सत्यांनी भरलेल्या त्या उरलेल्या “बारा विणलेल्या टोपल्या” शोधण्याचा पुन्हा एकदा खास निश्चय करा. असे केल्यास तुम्हाला कळेल की आपला प्रभू तुम्हाला देऊ इच्छित असलेल्या कृपादानांनी तुमच्या अंतरंगात किती खोलवर परिवर्तन घडू शकते, याला खरोखर मर्यादा नाही.

हे माझ्या परम उदार प्रभू, तू आपल्या लोकांचे केवळ आध्यात्मिक पोषण करतोस असे नाही, तर त्यांना आध्यात्मिक अन्न भरभरून देतोस. दररोज तुझा शोध घेताना मी तुझ्या दयेने भरून जातो. तुझ्या विपुल कृपादानाचा आस्वाद घेताना मला कधीही थकवा येऊ देऊ नकोस. हे प्रिय प्रभू, माझे पोषण कर आणि तुझे पवित्र वचन आत्मसात करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पुनरुत्थानकाळातील प्रार्थना

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील निवडक चित्र: भाकरी आणि मासे वाढवण्याचा चमत्कार — चित्रकार: अॅम्ब्रोसियस फ्रांकेन पहिला