मराठी

सार्वकालिक जीवनासाठी अन्न

१९ एप्रिल २०२१
पुनरुत्थानकाळातील तिसऱ्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने

व्हिडिओ

“रब्बी, तुम्ही इथे कधी आलात?” येशूने त्यांना उत्तर दिले, “आमेन, आमेन, मी तुम्हाला सांगतो: तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध घेत आहात. नाश पावणाऱ्या अन्नासाठी श्रम करू नका; तर सार्वकालिक जीवनासाठी टिकणाऱ्या अन्नाकरिता श्रम करा. ते अन्न मानवपुत्र तुम्हाला देईल.” योहान 6:25–27

जीवनात तुम्ही कशासाठी श्रम करता? शेवटी नाश पावणाऱ्या गोष्टींसाठी? की शाश्वत गोष्टींसाठी? या महत्त्वाच्या प्रश्नाचे प्रामाणिकपणे उत्तर देणे गरजेचे आहे. अनेकदा आपण आयुष्याचा बराचसा काळ अशा गोष्टींवर आपला बहुतेक वेळ आणि शक्ती खर्च करण्यात घालवतो, ज्यांना शाश्वत जीवनाच्या दृष्टीने फारसे मोल नाही.

वर उल्लेख केलेल्या संभाषणाच्या आदल्या दिवशी येशूने भाकरी आणि मासे वाढवून पाच हजार कुटुंबांना जेवू घातले होते. या घटनेचा लोकांवर इतका प्रभाव पडला की दुसऱ्या दिवशी पुन्हा भूक लागल्यावर ते येशूचा शोध घेत आले आणि त्यांना तो सरोवराच्या पलीकडच्या तीरावर सापडला. येशूला अर्थातच काय चालले आहे ते लगेच समजते. त्याला शोधून आलेल्या लोकांना शाश्वत आध्यात्मिक अन्नापेक्षा आणखी एकदा जेवायला मिळावे, याचीच अधिक ओढ आहे, हे तो ओळखतो. म्हणून या संधीचा उपयोग करून सर्वांत महत्त्वाचे काय आहे, याची तो त्यांना थोडक्यात आणि सौम्यपणे शिकवण देतो. “सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न” म्हणजे शेवटी येशूवरील श्रद्धाच.

कल्पना करा की भाकरी आणि मासे वाढवण्याचा चमत्कार तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला असता. त्याचा तुमच्यावर कसा परिणाम झाला असता? देवाचा पुत्र येशू याच्यावर तुमची श्रद्धा अधिक दृढ झाली असती का? की चमत्काराने मिळालेल्या मोफत अन्नाचेच तुम्हाला अधिक अप्रूप वाटले असते? विशेष म्हणजे, त्या पाच हजार लोकांना जेवणाची अपेक्षाही नव्हती आणि इच्छाही नव्हती, तेव्हा येशू त्यांना जेवू घालतो. पण दुसऱ्या दिवशी ते जेवण मिळावे या इच्छेने आणि अपेक्षेने येतात, तेव्हा तो नकार देतो. येशू पुन्हा चमत्कार करण्यास नकार देतो, कारण लोकांनी वरवरच्या गोष्टींपलीकडे पाहून शाश्वत सत्य ओळखावे, अशी त्याची इच्छा आहे. 

आपल्या जीवनात त्या अधिक गहन आणि शाश्वत सत्याला प्राधान्य देऊन जगणे अनेकदा कठीण जाते. जीवनातल्या वरवरच्या आणि कमी महत्त्वाच्या गोष्टींवरच लक्ष ठेवणे सोपे असते. मला आणखी पैसे कसे कमावता येतील? नवी गाडी कशी घेता येईल? आणखी रुचकर जेवणाचा आस्वाद कसा घेता येईल? माझे मनोरंजन आणखी चांगल्या प्रकारे कसे करता येईल? कोणता नवा कपडा घ्यावा? ही यादी अशीच वाढत जाते. अर्थात, यांपैकी कोणतीही गोष्ट वाईट नाही; पण या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर आहेत आणि आपल्या अमर आत्म्यावर त्यांचा परिणाम होणार नाही. उलट, जीवनातल्या वरवरच्या आणि अगदी कमी महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष दिले, तर सर्वांत महत्त्वाच्या गोष्टीपासून आपले लक्ष विचलित होईल.

येशूने दिलेल्या या आव्हानावर आज चिंतन करा. नाश पावणाऱ्या गोष्टींसाठी श्रम करू नका; जे शाश्वत आहे त्यासाठी श्रम करा. तुमच्या जीवनात तुम्ही कशाला प्राधान्य देता, ते पाहा. तुमचे लक्ष कशावर आहे? रोज तुम्हाला सर्वांत जास्त कशाची काळजी वाटते? देवाच्या पुत्रावरील तुमची श्रद्धा अधिक दृढ व्हावी, हीच तुमची सर्वांत मोठी काळजी असावी. देवावर आणि आपल्या शेजाऱ्यावर शाश्वत प्रेम करण्याची शिकवण तुम्ही आचरणात आणावी, ही आशा. तुमच्या जीवनाकडे आणि ध्येयांकडे प्रामाणिकपणे पाहिल्यावर या जगातल्या गोष्टींची तुम्ही अती काळजी करता असे जाणवले, तर आपल्या प्रभूचे हे शब्द जणू तुमच्याशीच बोलत आहेत असे समजून ते मनावर घ्या, म्हणजे तुम्ही सार्वकालिक जीवनासाठी संपत्ती साठवाल.

हे माझ्या परम गौरवशाली प्रभू, तूच शाश्वत अन्न आहेस. तूच सार्वकालिक जीवन देणारे अन्न आहेस. हे प्रिय प्रभू, या जगातल्या क्षणभंगुर आणि अगदी कमी महत्त्वाच्या गोष्टींवरून माझी नजर हटवून शाश्वत गोष्टींकडे वळवण्यासाठी मला आवश्यक ते ज्ञान दे. माझी नजर तुझ्यावर खिळून राहो आणि तुझ्यावरील माझ्या श्रद्धेने माझे पोषण होवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पुनरुत्थान काळातील प्रार्थना

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील चित्र: कोझिमो रोसेल्ली यांचे ‘डोंगरावरील प्रवचन’


तू मला येऊ दिलेस तर मी तुझ्या जीवनात येऊ शकतो
आध्यात्मिक चिंतन