मराठी

देवाने प्रकट केलेल्या गोष्टींचे स्मरण

19 मे 2025
प्रभूच्या पुनरुत्थानकाळातील पाचव्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने

प्रतिमा सौजन्य: अडोबी स्टॉक

व्हिडिओ

“मी तुमच्याबरोबर असतानाच हे तुम्हाला सांगितले आहे. पिता माझ्या नावाने ज्याला पाठवील तो साहाय्यकर्ता, म्हणजे पवित्र आत्मा, तुम्हाला सर्व काही शिकवील आणि मी तुम्हाला जे काही सांगितले आहे त्या सर्वांची आठवण करून देईल.” योहान 14:25–26

कधीकधी देवाने आपल्याला जे काही सांगितले आहे ते आपण विसरून जातो. उदाहरणार्थ, आपल्या जीवनात देवाच्या उपस्थितीचा अगदी स्पष्ट अनुभव आपल्याला आला असेल. प्रार्थनेतून एखादी गहन आध्यात्मिक जाणीव झाली असेल, प्रवचनातून देवाची वाणी आपल्यापर्यंत पोहोचली याची खोल खात्री पटली असेल, समेटाच्या संस्कारात जीवन बदलून टाकणारे स्वातंत्र्य अनुभवले असेल किंवा पवित्र शास्त्र वाचताना एखादी गोष्ट निःसंदिग्धपणे उमगली असेल. देव आपल्याशी बोलतो आणि आपल्याला त्याचे सत्य, बळ, क्षमा आणि इतर सर्व प्रकारची कृपा देतो, तेव्हा त्याची जवळीक जाणवून आपल्याला आध्यात्मिक दिलासा मिळतो. पण संकट आले की, अशा वेळी आपल्याला जे स्पष्टपणे उमगले होते त्याचा सहज विसर पडू शकतो.

येशूच्या तीन वर्षांच्या सार्वजनिक सेवाकार्यात शिष्यांना अनेक प्रसंगी सत्य अधिक स्पष्टपणे उमगले असेल. त्याच्या प्रवचनांतून जाणवलेल्या आध्यात्मिक अधिकाराने ते थक्क झाले. त्यांनी असंख्य चमत्कार पाहिले, पाप्यांना मुक्त होताना पाहिले, येशूचे गौरवमय रूपांतर पाहिले आणि आपला प्रभू पित्याशी गाढ प्रार्थनेत तल्लीन झालेला पाहिला. देवाचे सामर्थ्य कार्य करताना त्यांनी जेव्हा जेव्हा अनुभवले, तेव्हा तेव्हा येशू हाच मशीहा, देवाचा पुत्र आणि जगाचा तारणारा आहे, ही त्यांची खात्री अधिक दृढ झाली असेल. पण या शिष्यांची त्याच्यावरील श्रद्धा लवकरच डळमळेल, हेही येशूला माहीत होते. आपल्याला अटक होताना, मारहाण होताना आणि जिवे मारले जाताना ते भीतीने दुरून पाहतील आणि पूर्वी अनुभवलेल्या सर्व गोष्टी त्यांना हळूहळू विसरू लागतील, हे त्याला ठाऊक होते. भीतीमुळे मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो, आणि आपले शिष्य लवकरच या सापळ्यात अडकतील, हे येशूला माहीत होते. म्हणूनच येशूने आपल्या शिष्यांना वरील शब्द सांगितले. पवित्र आत्मा लवकरच त्यांच्यावर येईल, त्यांना सर्व काही शिकवील आणि त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देईल, असे अभिवचन त्याने त्यांना दिले.

देवाकडून शिकलेला प्रत्येक धडा आपल्या जीवनात नेहमी केंद्रस्थानी राहिला, तर किती छान होईल! भीतीमुळे मनात गोंधळ होऊ दिला नाही आणि देवाने निरनिराळ्या मार्गांनी आपल्याला जे काही सांगितले आहे त्याचा विसर पडू दिला नाही, तर किती छान होईल! शिकलेल्या गोष्टींचे स्मरण राहण्यासाठी शिष्यांना पवित्र आत्म्याच्या मदतीची गरज भासेल हे येशूला माहीत होते. त्याचप्रमाणे आपल्यालाही पवित्र आत्म्याच्या मदतीची तितकीच गरज आहे, हे त्याला माहीत आहे. म्हणूनच वर शिष्यांना उद्देशून सांगितलेले शब्द आपल्यालाही उद्देशून आहेत. “पिता माझ्या नावाने ज्याला पाठवील तो साहाय्यकर्ता, म्हणजे पवित्र आत्मा, तुम्हाला सर्व काही शिकवील आणि मी तुम्हाला जे काही सांगितले आहे त्या सर्वांची आठवण करून देईल.”

भूतकाळात तुम्ही श्रद्धेचे कोणते धडे शिकलात, ज्यांची आज तुम्हाला पुन्हा आठवण होण्याची गरज आहे? जेव्हा जेव्हा आपल्याला त्या धड्यांची गरज भासते, तेव्हा ते आपल्या स्मरणात आणणे ही पवित्र आत्म्याची भूमिका आहे. म्हणून पेन्टेकॉस्टच्या गौरवशाली महासणाचा दिवस जवळ येत असताना पवित्र आत्म्याला प्रार्थना करण्याची ही योग्य वेळ आहे. देवाने ज्या अनेक प्रकारे स्वतःला आपल्यासमोर प्रकट केले, त्या सर्वांचे स्मरण ठेवण्याचे दान त्याच्याकडे मागूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा परिपूर्ण एकमताने कार्य करतात, पण आपल्या जीवनात प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. आपण ख्रिस्त येशूसारखे पूर्णपणे घडावे, ही पित्याची इच्छा आहे. ती इच्छा आपल्यामध्ये पूर्ण व्हावी म्हणून दिवसेंदिवस आपल्याला त्या दिशेने नेणे, ही विशेषतः पवित्र आत्म्याची भूमिका आहे.

आपल्या प्रभूने त्याच्या शिष्यांना आणि आपल्याला दिलेल्या या सामर्थ्यदायी अभिवचनावर आज चिंतन करा. पवित्र आत्म्याला प्रार्थना करा. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर पवित्र आत्मा देत असलेल्या मार्गदर्शनासाठी आपले अंतःकरण खुले ठेवा आणि भीतीमुळे मनात कधीही गोंधळ होऊ देऊ नका. त्याऐवजी, देवाला तुमच्या मनातील सगळा गोंधळ दूर करू द्या आणि आयुष्यभर त्याने तुम्हाला जे काही सांगितले आहे, त्या सर्वांची आठवण करून देऊ द्या.

हे परम गौरवशाली प्रभू येशू, तू जे काही प्रकट केलेस त्या सर्वांची आठवण आम्हाला करून देण्यासाठी पवित्र आत्मा आमच्याकडे पाठवला जाईल, असे अभिवचन तू तुझ्या शिष्यांना आणि तुझ्या सर्व लोकांना दिलेस. हे पवित्र आत्म्या, कृपया माझ्यावर सतत उतर, मला शिकव आणि मला मार्गदर्शन कर. मला शिकवलेले अनेक धडे मी कधीही विसरू नयेत, म्हणून मला मदत कर, म्हणजे भीतीमुळे माझ्या मनात कधीही गोंधळ होऊ देणार नाही. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पोप लिओ चौदावे यांच्यासाठी प्रार्थना

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

पुनरुत्थानकाळासाठी पवित्र शास्त्रावरील मनन

पुनरुत्थानकाळातील प्रार्थना

आजचे संत आणि सण

मिस्सातील वाचनांचे पर्याय