मराठी

ख्रिस्ताचे जू

17 जुलै 2025
सामान्य काळातील पंधराव्या आठवड्याचा गुरुवार
आजची वाचने

माझे जू खांद्यावर घ्या कृती: लॉरेन्स ओ. पी., परवाना: CC BY-NC-ND 2.0.

व्हिडिओ

“माझे जू आपल्या खांद्यांवर घ्या आणि माझ्याकडून शिका, कारण मी सौम्य व अंतःकरणाने नम्र आहे; आणि तुम्हाला विसावा मिळेल. कारण माझे जू पेलायला सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.” मत्तय 11:29–30

येशूच्या त्या पहिल्या अनुयायांना ‘जू’ हा शब्द परिचित होता. त्यांच्यापैकी बरेच जण आपली शेते नांगरण्यासाठी नेहमी बैलांचा आणि इतर जनावरांचा उपयोग करत असत. नांगरणीसाठी ते बैलांच्या मानेवर लाकडी जू ठेवत. ते जू नांगरालाही जोडलेले असे, त्यामुळे बैलांना जमीन नांगरणे सोपे जाई. मानेवर जू बांधले जाणे हे पराधीनतेचे चिन्ह होते, कारण दुसऱ्याच्या कामासाठी राबणे हीच बैलांची भूमिका होती.

या उताऱ्यावर भाष्य करताना संत ऑगस्टीन यांनी (प्रवचन 126 मध्ये) ख्रिस्ताच्या जुवाची तुलना पक्ष्याच्या पंखांशी केली. पक्ष्याचे पंख त्याच्या शरीराच्या मानाने मोठे असतात. त्यामुळे हे जास्तीचे वजन काढून टाकल्याने पक्ष्याचे जगणे सोपे होईल, असे समजून कोणी त्याचे पंख काढून टाकले, तर उलट तो जमिनीवरच खिळून राहील. पण त्याला त्याचे पंख परत दिले, तर तेच ‘जू’ त्याला आकाशात उंच भरारी घेण्यास समर्थ करेल.

आपल्या प्रभूच्या जुवाचेही तसेच आहे. देवाचे सेवक होण्याचे आमंत्रण आपण स्वीकारले आणि आपल्यावर सोपवलेले सेवेचे कार्य पूर्ण करण्यासाठी ख्रिस्ताचे जू घेतले, तर सेवेमुळे आपले मन हलके होते, आपल्याला ताजेतवाने वाटते आणि नवे बळ व उत्साह मिळतो, हे आपल्या लक्षात येईल. जसे पंख हा पक्ष्याच्या घडणीचाच भाग आहे, तसेच देवाची सेवा करण्यासाठी आपण घडवले गेलो आहोत. पंख गमावलेल्या पक्ष्याप्रमाणे, देवाच्या सेवेचे जू आपण आपल्या जीवनातून काढून टाकले, तर आपण ओझ्याखाली दबून जाऊ आणि जे चांगले कार्य करायला आपण घडवले गेलो आहोत ते आपल्याला करता येणार नाही.

या उताऱ्यात आपल्याला हेही सांगितले आहे की आपण आपले स्वतःचे जू वाहायचे नाही; त्याऐवजी ख्रिस्ताचे जू वाहायचे आहे. “माझे जू तुमच्यावर घ्या…,” असे येशू म्हणाला. येशूचे जू वाहणे म्हणजे त्याच्यासोबत आणि त्याच्यामध्ये जीवन जगण्याचे पाचारण स्वीकारणे. तो सेवा करण्यासाठी आणि इतरांसाठी आपले जीवन अर्पण करण्यासाठी आला. त्याला आपल्यामध्ये हेच करू देऊन त्याच्याप्रमाणे वागणे हे आपले कर्तव्य आहे. ख्रिस्त आणि त्याची सेवकवृत्ती हीच आपल्या जीवनाची प्रेरणा आणि पाया असली पाहिजे.

ख्रिस्तामध्ये सेवक होण्याच्या तुमच्या पाचारणावर आज चिंतन करा. देव तुम्हाला कोणत्या प्रकारे सेवा करण्यास बोलावत आहे? तो तुम्हाला कोणाची सेवा करण्यास बोलावत आहे? या प्रश्नांची उत्तरे देताना, तुम्ही तुमच्या सेवेकडे कसे पाहता याचाही विचार करा. सेवा तुम्हाला ओझ्यासारखी वाटते का? की सेवेसाठीच तुम्हाला घडवण्यात आले आहे, हे तुम्हाला उमगले आहे? नम्रपणे सेवा करणे तुम्हाला ओझ्यासारखे वाटत असेल, तर कदाचित तुम्ही स्वतः ख्रिस्तासोबत आणि त्याच्यामध्ये राहून सेवा करण्याचा खरोखर प्रयत्न केला नसेल. येशू आपले जू तुमच्या खांद्यांवर ठेवत आहे, असे मनात आणून त्यावर चिंतन करा. त्याला जू ठेवू द्या आणि ज्या नम्र सेवेचे कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पाचारण मिळाले आहे, त्यालाही ‘हो’ म्हणा. मनापासून हे केल्याने तुम्हाला केवळ नवा तजेला मिळणार नाही, तर तुमच्या जीवनाला अर्थ आणि उद्देशही मिळेल.

हे माझ्या सौम्य प्रभू, तू आमची सेवा करण्यासाठी आणि प्रेमापोटी स्वतःचे जीवन अर्पण करण्यासाठी आमच्याकडे आलास. तू माझ्यासाठी केलेली सेवा स्वीकारण्यास, तुझ्या उदाहरणाप्रमाणे वागण्यास आणि ज्या सेवेसाठी तू मला बोलावले आहेस त्यात सहभागी होण्यास मला आवश्यक ती कृपा दे. हे प्रिय प्रभू, तू माझ्यावर सोपवलेले कार्य पूर्ण करता यावे म्हणून तुझे जू मला माझ्यावर घेऊ दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्सातील वाचनांचे पर्याय