मंगळवार, २२ जुलै २०२५
फोंदात्सियोने कारिप्लो, CC BY-SA 3.0, विकिमीडिया कॉमन्समार्फत
मरिया कबरीबाहेर रडत उभी राहिली. रडता रडता तिने वाकून कबरीत पाहिले. येशूचा देह जिथे ठेवला होता, तिथे शुभ्र वस्त्रे घातलेले दोन देवदूत बसलेले तिला दिसले—एक डोक्याच्या जागी आणि दुसरा पायांच्या जागी. योहान 20:11–12
आपल्या सेवाकार्याच्या सुरुवातीच्या काळात येशूने माग्दालाच्या मरियेतून सात दुरात्मे काढून टाकले. त्यानंतर ती येशूची अत्यंत निष्ठावान अनुयायी झाली. येशू व त्याचे शिष्य प्रवास करत असताना स्वतःच्या साधनसंपत्तीतून त्यांच्या गरजा भागवणाऱ्या अनुयायांपैकी ती बहुधा एक होती. तिने त्याची शिकवण ऐकली आणि त्याचे चमत्कार पाहिले. त्याला दोषी ठरवण्यात आले तेव्हा ती तिथे होती. येशूच्या आईबरोबर ती क्रुसाच्या पायथ्याशी उभी राहिली आणि त्याचा देह दफनासाठी तयार करण्यास तिने मदत केली. पवित्र शास्त्रातील नोंदीनुसार, पुनरुत्थानानंतर येशूने सर्वप्रथम तिलाच दर्शन दिले.
आजच्या मिस्सातील शुभवर्तमानात सांगितले आहे की, रविवारी पहाटे मरिया कबरीत ठेवलेल्या येशूच्या मृतदेहाला सुगंधी तेल लावण्याचे काम पूर्ण करण्यासाठी तिथे गेली. पण कबर रिकामी असल्याचे पाहून तिला फार आश्चर्य वाटले. हे सांगण्यासाठी ती धावत प्रेषितांकडे गेली. अशा रीतीने येशूच्या अनुयायांपैकी पुनरुत्थानाची साक्ष देणारी मरिया माग्दालेना ही पहिली ठरली. प्रेषितांना सांगितल्यावर ती पेत्र आणि योहान यांच्याबरोबर कबरीकडे परत आली. पेत्र आणि योहान निघून गेल्यावर, वर उद्धृत केलेल्या शुभवर्तमानातील उताऱ्यात सांगितल्याप्रमाणे, ती कबरीबाहेर रडत उभी राहिली.
मरियेचे अश्रू सुंदर आहेत. तिच्या प्रभूवरील गाढ भक्ती त्यांतून व्यक्त होते. तो मृतांतून उठला आहे, हे तिला अजून समजले नव्हते; पण येशूप्रतीची तिची निष्ठा तिच्या प्रेमाची साक्ष देते. येशूने तिची प्रतिष्ठा तिला परत मिळवून दिली होती. तिला छळणाऱ्या सात दुरात्म्यांपासून त्याने तिला मुक्त केले होते. पूर्वी तिने बहुधा पापमय जीवन जगले असावे, पण आता ती जगाच्या तारणाऱ्याला अनन्यभावाने समर्पित झाली होती.
माग्दालाच्या मरियेची साक्ष आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी आहे. सात दुरात्म्यांनी पछाडलेले लोक फार थोडे असतील, पण या ना त्या प्रकारे आपल्या सर्वांनाच त्रास सोसावा लागतो. आपण सगळेच पाप करतो. आपण सगळेच दुर्बल आहोत. आपल्या प्रत्येकाच्या भूतकाळात अशा काही गोष्टी आहेत, ज्यांचा आपल्याला पश्चात्ताप होतो. आणि आपणा सर्वांना अधिक चांगले जीवन जगण्याचे आमंत्रण आहे. मरियेसाठी ‘अधिक चांगले जीवन’ म्हणजे आपल्या जीवनाचे येशूला परम निष्ठेने केलेले समर्पण. क्रुसाच्या पायथ्याशी उभे असताना अधिकाऱ्यांनी तिला पाहिले तरी तिला त्याची पर्वा नव्हती. त्यामुळे त्यांनी तिचा छळ केला असता, तरी तिला त्याचे काही वाटले नसते. ती निष्ठावान होती. येशूच्या देहाला सुगंधी तेल लावण्यासाठी ती कबरीकडे गेली, तेव्हा सैनिकांनी तिला त्रास दिला असता तरी तिला त्याची पर्वा नव्हती. प्रेमाची ही अखेरची कृती त्याच्यासाठी करावी, एवढाच विचार तिच्या मनात होता. आणि पुनरुत्थित येशूला पाहून तो माळी आहे असे तिला वाटले, तेव्हा मन विदीर्ण झालेले आणि डोळ्यांत अश्रू असलेले त्याने तिला पाहिले तरी तिला त्याची पर्वा नव्हती. तिला फक्त आपल्या प्रभूचा देह पाहायचा होता.
तिच्या अढळ निष्ठेमुळे येशूने तिला कल्पनेपलीकडची देणगी दिली. मृतांतून उठल्यावर त्याने तिला दर्शन दिले आणि प्रेषितांची प्रेषित म्हणून तिला पाठवले. येशू मृतांतून उठला आहे आणि स्वर्गातील आपल्या पित्याकडे जाण्याच्या तयारीत आहे, हे प्रेषितांना सांगण्यासाठी त्याने तिला पाठवले.
आज या स्त्रीच्या पवित्र आत्म्याचे चिंतन करा. तिने आपल्या पापांचा पश्चात्ताप केला आणि तिच्या संपूर्ण जीवनाला नवे वळण दिले. तिने आपले सर्वस्व येशूला अर्पण केले आणि त्या बदल्यात तिला त्याहूनही अधिक मिळाले. स्वर्गात मरिया माग्दालेना सदैव येशूला बिलगून राहील आणि त्याच्या पवित्र हृदयाची आराधना करील. आपणही आपल्या पापमय जीवनापासून दूर वळून आणि आपल्या प्रभूशी अढळ निष्ठा राखून तिचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू या.
हे माझ्या पुनरुत्थित प्रभू, तुझ्या पुनरुत्थानानंतर तू सर्वप्रथम मग्दालाच्या मरियेला दर्शन दिलेस. आता स्वर्गातील तुझ्या गौरवमय जीवनात सहभागी होण्यासाठी तू तिला आमंत्रण देतोस. सर्व पापांपासून दूर वळून आणि अंतःकरणापासून तुझ्या भक्तीत रमून तिच्या उदाहरणातून शिकण्यास मला मदत कर. हे प्रिय प्रभू, तुझ्याशी माझी निष्ठा पूर्ण आणि अढळ राहो, जेणेकरून एके दिवशी मलाही तुझ्या पुनरुत्थानाच्या गौरवात सहभागी होता येईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – संत मरिया मग्दालेना
मरिया मग्दालेना नेमकी कोण होती, हे समजून घेण्यासाठी उपयुक्त लेख – नवीन आगमन
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




