१७ ऑगस्ट २०२५
सामान्य काळातील विसावा रविवार (वर्ष क)
आजची वाचने
छायाचित्र स्रोत: अन्स्प्लॅश
“मी पृथ्वीवर शांती प्रस्थापित करायला आलो आहे, असे तुम्हाला वाटते काय? नाही, मी तुम्हाला सांगतो, उलट फूट पाडायला आलो आहे. यापुढे पाच जणांच्या घरात फूट पडेल: तिघे दोघांच्या विरोधात आणि दोघे तिघांच्या विरोधात उभे राहतील. पिता पुत्राच्या विरोधात आणि पुत्र पित्याच्या विरोधात, आई मुलीच्या विरोधात आणि मुलगी आईच्या विरोधात, सासू सुनेच्या विरोधात आणि सून सासूच्या विरोधात उभी राहील.” लूक 12:51–53
या उताऱ्याच्या सुरुवातीला येशू म्हणतो, “मी पृथ्वीवर आग लावायला आलो आहे, आणि ती आताच भडकलेली असावी, अशी माझी किती इच्छा आहे!” तो ज्या “अग्नी”विषयी बोलतो, तो त्याच्या दयेचा शुद्ध करणारा अग्नी आहे. जगाच्या तारणासाठी आपले जीवन अर्पण करताना त्याने क्रुसावरून तो ओतला. आपल्या पापांतून आपल्याला मुक्त करण्यासाठी आणि आपले आत्मे शुद्ध करण्यासाठी तो आपल्यावर दया करतो, जेणेकरून देव स्वतः आपल्यामध्ये येऊन वस्ती करू शकेल. यासाठीच आपले अस्तित्व आहे. आपण त्याच्याशी पूर्णपणे एकरूप व्हावे आणि त्याने आपल्यामध्ये वस्ती करावी, अशी देवाची इच्छा आहे.
देवाशी एकरूप होण्याचा एक सुंदर परिणाम असा की, जे इतर लोक देवाशी एकरूप आहेत, त्यांच्याशीही आपले आध्यात्मिक नाते जुळते. आपली निर्मिती देवाशी सहभागितेत जगण्यासाठी, तसेच एकमेकांशीही सहभागितेत जगण्यासाठी झाली आहे. या ऐक्यात सहभागी होण्याचे आमंत्रण देव विशेषतः कुटुंबातील सदस्यांना देतो. आपल्यात वेगवेगळ्या पातळ्यांवर मैत्री आणि ऐक्य असू शकते; पण दोन व्यक्ती आपापल्या अंतःकरणात देवाशी एकरूप असतात, तेव्हा त्यांच्यात सर्वांत गहिरे नाते निर्माण होते. उदाहरणार्थ, दोघांनाही तोच क्रीडासंघ आवडत असेल किंवा त्यांच्या आवडीनिवडी सारख्या असतील. त्यातून त्यांच्यात जवळीक निर्माण होऊ शकते किंवा मैत्री जुळू शकते. ही चांगली गोष्ट आहे. पण ते दोघेही देवाशी गाढपणे एकरूप असतील, तर त्यांच्यातील ऐक्य वरवरच्या गोष्टींवर आधारलेले नसते; ते देवाकडून येते.
शुभवर्तमानातील वरील उतारा आपल्याला विचार करायला लावतो. कुटुंबातील एक किंवा अधिक सदस्य देवाच्या प्रेमाच्या शुद्ध करणाऱ्या अग्नीसाठी आपले अंतःकरण उघडत नाहीत आणि त्यामुळे देवाशी एकरूप होऊन जगत नाहीत, तेव्हा काय घडते हे त्यातून दिसते. परिणाम असा होतो की, निदान सर्वांत खोल आणि खऱ्या पातळीवर तरी त्यांच्यात ऐक्य राहत नाही. या फुटीचे कारण देव नाही, तर पाप आहे. एक व्यक्ती देवाशी एकरूप असेल आणि दुसरी पापमय जीवनात गुरफटलेली असेल, तर खरे आध्यात्मिक ऐक्य शक्य नाही. अर्थात, त्या दोघांच्या काही आवडीनिवडी सारख्या असू शकतात आणि रोजच्या व्यवहारात वरवर पाहता त्यांचे पटतही असेल. पण दोघांपैकी एकाच्या किंवा दोघांच्याही अंतःकरणात देव नसेल, तर त्यांना खऱ्या आध्यात्मिक मैत्रीचा आणि सहभागितेचा अनुभव कधीच येणार नाही.
कुटुंबात फूट पाडण्यासाठी आपण आलो आहोत, असे येशू म्हणतो, तेव्हा तो एवढेच दाखवून देतो की, कुटुंबातील सगळे जण देवाशी एकरूप नसतील, तर घरात फूट पडणारच. शिवाय, येशू आपल्याला सावध करतो की, आपल्या घरातील कोणी आपल्यालाही आपल्या पापमय जीवनात ओढू पाहत असेल, तर त्याच्या आमंत्रणाला नकार दिलाच पाहिजे. असा नकार दिल्यावर, आपण त्या व्यक्तीलाच नाकारले असे तिला अनेकदा वाटते आणि त्यामुळे दुरावा आणखी वाढतो. थोडक्यात, पापाच्या किंवा कोणत्याही प्रकारच्या असत्याच्या आधारावर खरे ऐक्य शक्य नाही.
आज आपल्या अंतःकरणातील सर्वांत खोल आध्यात्मिक इच्छेवर चिंतन करा. स्वतःशी प्रामाणिक राहिलात, तर तुमच्या अंतःकरणातील ही सर्वांत खोल इच्छा प्रेमाची आहे, हे तुमच्या लक्षात येईल. प्रेम देण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठीच आपली निर्मिती झाली आहे. देवाच्या प्रेमासाठी आपले अंतःकरण उघडण्यात या इच्छेची पूर्तता सुरू होते. असे घडले की, आपण देवाचे प्रेम इतरांना देऊ शकतो आणि त्यांच्याकडूनही देवाचे प्रेम स्वीकारू शकतो. याहून अधिक समाधान देणारी गोष्ट जीवनात नाही.
हे परमदयाळू प्रभू, सर्व लोकांना तुझ्या प्रेमात एकत्र आणण्यासाठी तू आलास. पण तुझे प्रेम नाकारले जाते, तेव्हा आमच्यात ऐक्य राहत नाही. कृपा करून माझ्याकडे ये आणि माझ्या अंतःकरणात अधिक पूर्णपणे वस्ती कर. तुझ्या उपस्थितीमुळे माझे आध्यात्मिक ऐक्य केवळ तुझ्याशीच नव्हे, तर याच प्रेमात सहभागी असलेल्या इतरांशीही दृढ होऊ दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




