मराठी

दुरात्म्यांवरील अधिकार

२४ सप्टेंबर २०२५
सामान्य काळातील पंचविसाव्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने

फिलिप मेडहर्स्ट, CC BY-SA 3.0, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने

व्हिडिओ

येशूने बारा प्रेषितांना बोलावले आणि त्यांना सर्व दुरात्म्यांवर सत्ता व अधिकार दिला आणि रोग बरे करण्याचे सामर्थ्य दिले. मग देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी आणि आजाऱ्यांना बरे करण्यासाठी त्याने त्यांना पाठवले. लूक 9:1–2

येशू आपल्या प्रेषितांना कार्यासाठी पाठवतो, ही पहिलीच वेळ आहे. या कार्यातून तो त्यांना त्यांच्या अंतिम कार्यासाठी तयार करत आहे. येशूचा मृत्यू, पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण झाल्यानंतर, पेन्टेकॉस्टच्या वेळी ते अंतिम कार्य त्यांच्यावर सोपवले जाईल. पण आता येशू या प्रेषितांवर तीन कामे सोपवतो: दुरात्म्यांना हाकलून लावणे, आजाऱ्यांना बरे करणे आणि देवाच्या राज्याची घोषणा करणे.

प्रेषितांप्रमाणेच आपल्यालाही सैतानाशी आणि त्याच्या दुरात्म्यांशी लढण्यासाठी बोलावले आहे. ते पतित देवदूत आहेत. त्यांच्याकडे त्यांची स्वाभाविक सामर्थ्ये अजूनही आहेत. त्या सामर्थ्यांचा वापर करून ते आपल्याला फसवण्याचा, छळण्याचा आणि काही प्रसंगी आपल्या अंगात संचार करण्याचाही प्रयत्न करतात. पण देवासमोर दुरात्म्यांचे काहीच चालत नाही, आणि देव आपल्याला त्यांच्यावर आध्यात्मिक अधिकार देतो. चर्चमध्ये दुरात्मे घालवण्याची विशेष सेवा काही जणांनाच सोपवली जाते, तरी दुरात्म्यांवर आध्यात्मिक अधिकार आपल्या सर्वांनाच आहे. विशेषतः मोहात पाडून ते जे आध्यात्मिक हल्ले करतात, त्यांचा प्रतिकार करण्याचा अधिकार आपल्याला आहे.

दुरात्म्यांशी लढण्याचा आपला मुख्य मार्ग म्हणजे त्यांचा खोटेपणा उघड करून तो प्रकाशात आणणे. लोयोलाचे संत इग्नेशियस आपल्या आध्यात्मिक साधना या अभिजात आध्यात्मिक ग्रंथात दुरात्म्यांच्या नेहमीच्या काही युक्त्या आणि त्यांवर आपण कशी मात करू शकतो, हे समजावून सांगतात. ते सांगतात की गंभीर पापांत बुडालेल्या लोकांनी तीच पापे करणे पुन्हा पुन्हा निवडावे, म्हणून ‘तुमची पापे तुम्हाला आनंद आणि फायदा देतात’ ही खोटी कल्पना दुरात्मे सतत त्यांच्या मनात आणतात. याउलट, जे पवित्रतेसाठी झटतात, त्यांचे मनपरिवर्तन अधिक खोलवर होत असताना हे दुरात्मे त्यांचे धैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न करतात. ते “दंश करतात, दुःखी करतात, अडथळे आणतात आणि खोटी कारणे दाखवून मन अस्वस्थ करतात, जेणेकरून ती व्यक्ती पुढे जाऊ नये” (नियम 2). या मोहांवर मात करण्याचा मार्ग म्हणजे सत्याकडे वळणे. सर्वप्रथम हे ओळखले पाहिजे की पापाची ‘सुखे’ भ्रामक व क्षणभंगुर असतात आणि शेवटी ती आपल्याला अधःपाताकडे नेतात. शिवाय, देवाकडून “धैर्य व सामर्थ्य, सांत्वन, अश्रू, प्रेरणा आणि शांती” स्वीकारून तसेच त्याला “अडचणी हलक्या करू देऊन आणि सर्व अडथळे दूर करू देऊन” आपण या मोहांवर मात करतो. दुसऱ्या शब्दांत, देवाला आपल्याला बळ देऊ देणे, आपल्या विचारांना स्पष्टता देऊ देणे आणि पवित्रतेच्या मार्गावरील सर्व भ्रामक अडथळे दूर करू देणे, तसेच या वाटचालीत मदत म्हणून तो उदारपणे देत असलेले सांत्वन स्वीकारणे, यातून आपण दुरात्म्यांवर मात करतो.

आपला प्रभू या तीन प्रकारे तुमची सेवा करू इच्छितो, यावर आज चिंतन करा. या दुरात्म्यांनी तुमच्या वाटेत आणलेल्या अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न केलात, तर प्रेषितांना सोपवलेल्या इतर दोन कार्यांत सहभागी होण्यासाठी तुम्ही तयार व्हाल. तुमच्या जीवनात मनाला, भावनांना आणि आत्म्याला मिळणारी आरोग्यप्राप्ती तुम्ही अनुभवू शकाल आणि तुमच्या स्वतःच्या आत्म्यात देवाचे राज्य वाढून सामर्थ्यशाली होऊ द्याल. त्यानंतर, ज्यांना या कृपादानांची गरज आहे, त्यांच्यापर्यंत ती पोहोचवण्यासाठी आपला प्रभू तुम्हाला पाठवील.

हे माझ्या सर्वसमर्थ प्रभू, दुष्टतेवर तुझा अधिकार आहे. बरे करण्याचे आणि शाश्वत तारणाची सर्व दाने देण्याचे सामर्थ्य तुझ्याकडे आहे. ज्या मार्गांनी तू माझ्यापर्यंत येऊ इच्छितोस, त्या मार्गांनी तुझे स्वागत करायला मला मदत कर. दुष्टाच्या हल्ल्यांपासून मला मुक्त कर, मला आरोग्य आणि आशा दे आणि माझ्या जीवनात तुझ्या गौरवशाली राज्याची समृद्धी प्रकट होऊ दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

लिझ्यूच्या संत तेरेझाची नोवेना – छोटे फूल
तिसरा दिवस – २४ सप्टेंबर

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्सातील वाचनांचे पर्याय