21 ऑक्टोबर 2025
सामान्य काळातील एकोणतिसाव्या आठवड्याचा मंगळवार
आजची वाचने
दुच्चो दी बुओनिन्सेन्या, सार्वजनिक स्वामित्वातील कलाकृती, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “कंबर कसा, आपले दिवे पेटवा आणि लग्नाहून परतणाऱ्या आपल्या धन्याची वाट पाहणाऱ्या सेवकांसारखे राहा. धनी येऊन दार ठोठावताच त्याच्यासाठी दार उघडायला तयार राहा.” लूक 12:35–36
“कंबर कसा” म्हणजे काय? आज फारसा वापरात नसलेल्या या वाक्प्रचाराचा शब्दशः अर्थ “कंबरपट्टा घट्ट बांधा” असा आहे. पूर्वी हा वाक्प्रचार लांब झगा घातलेल्या व्यक्तीच्या संदर्भात वापरला जाई, कारण अशा झग्यात सहजपणे आणि चपळाईने हालचाल करणे कठीण होते. म्हणून कंबर कसणे म्हणजे लांब झगा कमरेला खोचून कंबरपट्टा घट्ट बांधणे, जेणेकरून अंगमेहनतीच्या कामासाठी तयार होता येईल. लढाईची तयारी करणाऱ्यांना सज्ज होण्याचे आवाहन करण्यासाठीही हा वाक्प्रचार नेहमी वापरला जाई. म्हणून लाक्षणिक अर्थाने याचा अर्थ एखाद्या कठीण कामासाठी किंवा आव्हानासाठी तयार राहणे, एवढाच आहे. म्हणजेच जागरूक आणि सज्ज राहणे. आध्यात्मिक दृष्टीने पाहता, येशू आपल्या शिष्यांना त्यांच्यापुढे असलेल्या आध्यात्मिक लढ्यासाठी सज्ज राहायला सांगत आहे.
मग येशू आपल्या शिष्यांना दिवे पेटवायला सांगतो. या वाक्याचे अनेक अर्थ असू शकतात. उदाहरणार्थ, “पापाच्या किंवा अज्ञानाच्या अंधारात राहू नका,” “जीवनाच्या वाटेवर चालताना प्रीतीचा प्रकाश झळकू द्या,” किंवा “सत्याचा प्रकाश तुमच्या मनात उजळू द्या.” अशा प्रकारे श्रद्धेच्या प्रकाशात त्यांनी जागरूक आणि सज्ज राहावे, आणि प्रभू ज्या ज्या कामासाठी त्यांना पाठवतो ते प्रत्येक काम करण्यास तयार असावे.
आजच्या शुभवर्तमानाच्या शेवटी येशू सांगतो की रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरापर्यंतही शिष्य जागरूक राहिले, तर ते खरोखर धन्य ठरतील. चर्चच्या काही धर्मपित्यांच्या मते, हे प्रहर माणसाच्या आयुष्यातील तीन टप्पे दर्शवतात: बालपण हा पहिला प्रहर, मध्यम वय हा दुसरा आणि वृद्धावस्था हा तिसरा.
हे अर्थ लक्षात घेतले, तर या शुभवर्तमानातून आपल्याला एक संदेश मिळतो: आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी श्रद्धेत जागरूक राहण्याचे आवाहन येशू आपल्याला करतो. तुम्ही आयुष्याची बरीच वर्षे अनुभवली असतील, तर मागे वळून पाहा आणि प्रत्येक टप्प्यावर तुम्ही किती विश्वासू राहिलात, याचा विचार करा. बालपणी, मध्यम वयात आणि अगदी वृद्धावस्थेतही देवाला तुमच्याद्वारे अनेक प्रकारे कार्य करायचे आहे. श्रद्धेचा प्रवास कधीही थांबता कामा नये. उलट, वय वाढत जाईल तशी तुमची श्रद्धा अधिकाधिक खोल होत गेली पाहिजे. पण तुम्ही “कंबर कसलीत” आणि “आपले दिवे पेटवलेत” तरच हे शक्य होईल. तुम्ही सतत जागरूक राहिले पाहिजे, श्रद्धेच्या प्रकाशाकडे सदैव लक्ष दिले पाहिजे आणि देव जेव्हा जेव्हा एखादी कृती करण्याची प्रेरणा देतो, तेव्हा ती करण्यास तयार राहिले पाहिजे.
श्रद्धेत जगण्याच्या आणि देवाची सेवा करण्याच्या आयुष्यभराच्या प्रवासासाठी तुम्हाला पाचारण झाले आहे. आज या प्रवासावर चिंतन करा. केवळ जन्माने कोणी ख्रिस्ती होत नाही. तुमचा जन्म ख्रिस्ती श्रद्धेत झाला असेल, तर ती श्रद्धा दिवसेंदिवस अधिक खोल आणि दृढ व्हावी म्हणून तुम्ही आयुष्यभर काय केले आहे, याचा विशेष विचार करा. श्रद्धेचा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेल्या असंख्य प्रेरणांना तुम्ही तत्परतेने प्रतिसाद दिला आहे का, याचे मनन करा. तुम्ही आयुष्यभर खरोखर विश्वासू राहिला असाल, तर देवाचे आभार माना आणि उरलेले आयुष्यही असेच विश्वासू राहण्याचा निर्धार पुन्हा करा. तुमची श्रद्धा कमी पडली असेल आणि देवाची इच्छा ओळखण्यासाठी तुम्ही पुरेसे जागरूक राहिला नसाल, तर ही उणीव देवाच्या दयेवर सोपवा. आजपासून देवाची हाक येताच त्याच्या इच्छेला प्रतिसाद देण्यासाठी आपल्या परीने सर्व काही करण्याचा निश्चय करा.
हे परमदयाळू प्रभू, माझ्या आयुष्यभर तू असंख्य मार्गांनी माझ्याशी बोललास आणि या जगात श्रद्धेचे व प्रेमाचे माझे कार्य पूर्ण करण्यासाठी मला पाचारण केलेस. यासाठी मी तुझे आभार मानतो. आज मी तुला वचन देतो की, जेव्हा जेव्हा तू मला हाक देशील, तेव्हा तेव्हा मी जागरूक राहून तुझ्या हाकेकडे लक्ष देईन. प्रिय प्रभू, तुझ्या तारणदायी शुभवर्तमानाच्या प्रकाशाची या जगाला गरज आहे. तो प्रकाश जगापर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपयोग कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
संत ज्यूड यांची नोव्हेना
निराशाजनक परिस्थिती आणि मार्ग न दिसणाऱ्या अडचणींसाठी
ही प्रार्थना वर्षात कधीही करता येते, विशेषतः 19–27 ऑक्टोबरदरम्यान
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




