गुरुवार, 25 डिसेंबर 2025
प्रभूचा जन्मोत्सव (नाताळचा दिवस)
वाचने:
जागरणाच्या मिस्सामध्ये – रात्रीच्या मिस्सामध्ये – पहाटेच्या मिस्सामध्ये – दिवसाच्या मिस्सामध्ये
गेरार्ड व्हान हॉन्थॉर्स्ट, सार्वजनिक मालकीतील कलाकृती, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने
ते तेथे असतानाच तिची प्रसूतीची वेळ आली आणि तिने आपल्या प्रथम पुत्राला जन्म दिला. तिने त्याला दुपट्यात गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण उतारशाळेत त्यांच्यासाठी जागा नव्हती. लूक 2:6–7 (रात्रीच्या मिस्सातील शुभवर्तमान)
आपल्या पहिल्या अपत्याचा जन्म अनुभवणाऱ्या प्रेमळ आईवडिलांना या प्रसंगाचे पावित्र्य आणि सौंदर्य उमगते. धन्य कुमारी मरियेच्या उदरी येशूचा गर्भसंभव कसा झाला, हे गूढ असले तरी मरिया खरोखरच त्याची आई होती आणि तो खरोखरच तिचा पुत्र होता. आपण या बालकाचे जन्मदाते पिता नाही, हे संत योसेफाला माहीत होते. तरीही प्रभूच्या दूताने स्वप्नात दिलेल्या सूचनेनुसार त्याने पित्याची जबाबदारी स्वीकारली. ही त्याच्या गाढ श्रद्धेची कृती होती. आपल्या श्रद्धेमुळे आणि देवाने सोपवलेल्या कार्यामुळे योसेफ देवपुत्राचा पिता म्हणून अशा निष्ठेने वागला, जसे केवळ अत्यंत प्रेमळ आणि समर्पित पित्यालाच जमेल.
नाताळ साजरा करताना, आपल्या प्रभूने किती नम्रतेने या जगात येण्याचे निवडले, याची आपल्याला आठवण होते. रोमन जनगणनेत नाव नोंदवण्यासाठी मरिया आणि योसेफ घरापासून दूर आले होते. त्यामुळे जनावरे ठेवत असत अशा ठिकाणी येशूचा जन्म झाला. बहुधा ती एक गुहा होती. अशा ठिकाणी त्याचा जन्म झाला, हे प्रथमदर्शनी दुर्दैवी वाटेल. पण हे साधे, गरिबीचे ठिकाण देवाच्या योजनेचाच भाग होते आणि त्यामुळे त्या रात्रीचे वैभव अधिकच खुलले, याची आपण खात्री बाळगू शकतो. प्रेमाचे खरे मोठेपण आपल्याला दाखवण्यासाठी ख्रिस्ताने नम्रतेने हे ठिकाण निवडले.
गुहेतील गरिबी आणि गव्हाणीचा साधेपणा—ती गव्हाण म्हणजे जनावरांना चारा घालण्याची जागा—यांतून येशूच्या जन्माचे पावित्र्य अधिक ठळकपणे जाणवते. ना झगमगाट, ना थाटमाट, ना आराम; होते ते केवळ प्रेम. निर्मळ प्रेम. धन्य कुमारी मरियेच्या हृदयातील प्रेम, संत योसेफाची निष्ठा आणि देहधारी देवपुत्राची उपस्थिती—त्या रात्रीला वैभव प्राप्त होण्यासाठी एवढेच पुरेसे होते.
प्रभूच्या जन्मातून आपण हा एक धडा शिकू शकतो: आपल्या जीवनातील सौंदर्य, शांती आणि समाधान हे आपल्याजवळ किती पैसा किंवा किती भौतिक वस्तू आहेत यांवर नव्हे, तर आपले प्रेम किती निर्मळ आहे यावर अवलंबून असते. पवित्र कुटुंबाची अंतःकरणे परिसरामुळे नव्हे, तर येशू ख्रिस्ताच्या व्यक्तीमध्ये देवाशी असलेल्या घनिष्ठ ऐक्यामुळे पूर्णपणे तृप्त होती.
त्या गरिबीच्या ठिकाणी देवपुत्राच्या उपस्थितीमुळे आपल्याला ज्या खऱ्या संपत्तीची आस आहे, तिचे स्वरूप उलगडते. आपण शोधत असलेला खरा ठेवा धनसंपत्तीत, सुखसोयींत किंवा मालमत्तेत नाही, तर देवाच्या प्रेमात आणि कृपेत आहे. पवित्र कुटुंबाच्या साक्षीतून आपल्याला कळते की आपण आपली अंतःकरणे देवाच्या हाती सोपवली, तर आपल्याला जे काही आवश्यक आहे ते सर्व मिळेल.
आज त्या परमपवित्र, साध्या आणि नम्र प्रसंगावर चिंतन करा. त्या अनुभवाने पवित्र कुटुंबाला मानवी पातळीवर किती समाधान दिले असेल, याची कल्पना करा. येशूला दुपट्यात घट्ट गुंडाळले होते. त्याच्या आईने आणि पालनकर्त्या पित्याने अत्यंत ममतेने त्याची आराधना केली. मनापासून कृतज्ञता आणि परिपूर्ण समाधान अनुभवण्यासाठी जे काही आवश्यक होते, ते सर्व मरिया आणि योसेफ यांच्या अंतःकरणांत होते. तुम्हाला जीवनात समाधान लाभत नसेल, तर पवित्र कुटुंबाकडून शिका आणि मरिया व योसेफ यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने आपल्या देहधारी प्रभूवरील तुमचे प्रेम तुम्हाला जे काही आवश्यक आहे ते सर्व देईल.
हे माझ्या देहधारी प्रभू, तुझे दैवी स्वरूप तुझ्या मानवी स्वरूपाशी एकरूप असल्याने बेथलेहेमजवळील त्या साध्या गुहेचे रूपांतर एका देवमंदिरात झाले, जिथे निर्मळ प्रेमाचे अतूट बंध होते. मला त्या पवित्र प्रसंगात सामावून घे. तुझ्या आईच्या निष्कलंक हृदयातील प्रेमात आणि तुझा पालनकर्ता पिता योसेफ याच्या मानवी निष्ठेत मला सहभागी होऊ दे. तू ज्या ज्या प्रकारे माझ्याकडे येतोस, त्या प्रत्येक रूपात तुला ओळखून आणि तुझ्यावर प्रेम करून मला जीवनात समाधान आणि पूर्ण तृप्ती लाभो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
नाताळसाठीचे आमचे साहित्य पाहा!
प्रभूच्या जन्मोत्सवाविषयी अधिक




