10 फेब्रुवारी 2026
संत स्कोलास्टिका, कुमारी, यांचा स्मृतिदिन
आजची वाचने
सामान्य काळातील पाचव्या आठवड्याच्या मंगळवारची वाचने
‘फारिस्याच्या घरी भोजन’ — जेम्स तिसो यांचे चित्र
“तुमचे शिष्य वडीलधाऱ्यांची परंपरा का पाळत नाहीत? उलट ते अशुद्ध हातांनी जेवतात.” येशूंनी उत्तर दिले, “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने केलेले भाकीत किती अचूक आहे! असे लिहिले आहे: ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. ते माझी उपासना व्यर्थ करतात, कारण माणसांनी घालून दिलेले नियम ते धर्मसिद्धांत म्हणून शिकवतात.’” मार्क 7:5–8
यशयाने हे भाकीत केले तेव्हा आणि येशूंनी ते उद्धृत केले तेव्हा ते जितके खरे होते, तितकेच ते आज आपल्यासाठीही खरे आहे. देवाची उपासना आपल्या अंतःकरणातून, आपल्या अस्तित्वाच्या गाभ्यातून व्हायला हवी. तरच ती खरी उपासना ठरते.
मानवी स्वभाव गुंतागुंतीचा आहे. आपण शरीर आणि आत्मा यांनी घडलेले आहोत. आपल्या शरीरात हृदय असले, तरी यशया आणि येशू ज्या ‘अंतःकरणा’विषयी बोलतात ते आध्यात्मिक स्वरूपाचे आहे; मुळात ते मनुष्याच्या इच्छाशक्तीला सूचित करते. देवाने आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य देऊन निर्माण केले. म्हणजे आपले निर्णय आपण स्वतः घेतो; मात्र चांगली निवड करताना देवाच्या कृपेचे साहाय्य आपल्याला नेहमीच मिळते.
देव आपल्याशी बोलून आपली दैवी इच्छा प्रकट करतो, तेव्हा तो आपल्या बुद्धीच्या माध्यमातून ती आपल्याला समजावतो. स्वाभाविक विवेक आणि दैवी कृपा यांच्या प्रकाशात आपण कोणती चांगली गोष्ट निवडली पाहिजे, हे बुद्धी ओळखते आणि ती आपल्या इच्छाशक्तीपुढे ठेवते. देवाच्या कृपेने प्रेरित झालेली आपली इच्छाशक्ती ते चांगले स्वीकारून त्या कृपेला मुक्तपणे सहकार्य करू शकते किंवा ते नाकारू शकते. देवाचे कार्य आणि आपले निवडीचे स्वातंत्र्य एकत्र कसे येतात, हे या सहकार्यातून दिसते.
जेव्हा आपण स्वेच्छेने चांगल्याची निवड करतो, तेव्हा आपली इच्छाशक्ती परिपूर्ण करणारी प्रेमाची कृपा स्वीकारण्यास आपण तयार होतो. हे प्रेम आपल्याला बळ देते आणि देव जसे प्रेम करतो तसे प्रेम करण्यास समर्थ बनवते. त्यामुळे सर्व गोष्टींपेक्षा देवावर अधिक प्रेम करावे आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम करावे, ही दैवी आज्ञा आपण आचरणात आणू शकतो. आपली बुद्धी, इच्छाशक्ती आणि कृती देवाच्या इच्छेशी जुळतात, तेव्हाच आपली उपासना खरी होते आणि आपले जीवन पवित्र बनते.
फारिसी आणि शास्त्री यांच्या धार्मिक आचरणात अशी प्रेमपूर्ण उपासना नव्हती. त्यांची भक्ती केवळ बाह्य आचारांपुरती उरली होती. त्यांच्या ‘उपासनेत’ गर्व भरला होता. कृपेला मुक्तपणे प्रतिसाद देत देवावरचे प्रेम व्यक्त करण्याऐवजी, आपण किती नीतिमान आहोत हे दाखवण्यापुरते त्यांचे धार्मिक आचरण उरले होते. पण येशूंनी त्यांना दोषी ठरवण्यासाठी नव्हे, तर प्रेमापोटी खडसावले. त्यांचे ढोंग त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, त्यांची चूक त्यांना अंतःकरणात जाणवून द्यावी आणि खऱ्या उपासनेत रुजलेल्या देवाशी प्रामाणिक नात्याकडे त्यांना बोलवावे, हा येशूंचा हेतू होता. परंतु त्यांनी नम्रतेने प्रतिसाद देण्यास आणि पश्चात्ताप करून देवाकडे वळण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्यापैकी अनेकांनी येशूंविरुद्ध कट रचला, ज्याची परिणती त्यांना क्रुसावर खिळण्यात झाली. त्यांनी दैवी प्रेम नाकारले, यावरून त्यांची उपासना व्यर्थच राहिली हे दिसते. कारण बाह्य धार्मिक आचारांचे रूपांतर देवाशी असलेल्या जिवंत नात्यात घडवणाऱ्या कृपेसाठी त्यांनी आपली अंतःकरणे बंद ठेवली होती.
तुम्ही आपल्या उपासनेच्या बाह्य कृतींवर विचार करता, तेव्हा स्वतःला विचारा: या कृती देवाला पूर्णपणे समर्पित असलेल्या अंतःकरणातून येतात का? मिस्साला उपस्थित राहताना, प्रार्थना म्हणताना किंवा प्रेमाची कृत्ये करताना तुम्हाला कशाची प्रेरणा असते? तुमची उपासना ही देवावरील प्रेमाची खरी अभिव्यक्ती आहे का, की कधी ती केवळ सवयीचा भाग किंवा कर्तव्यपूर्ती ठरते? येशूंनी फारिसी आणि शास्त्री यांना जे खडे बोल सुनावले ते आपण सर्वांनी लक्षपूर्वक ऐकावे आणि आपले अंतःकरण तपासावे. आपली उपासनाही केवळ बाह्य आचारांपुरती उरली आहे का किंवा तिच्यात गर्व शिरला आहे का, हे आपण पाहावे. खऱ्या उपासनेसाठी नम्रता, प्रामाणिकपणा आणि आपल्यात परिवर्तन घडवणारी देवाची कृपा स्वीकारण्याची तयारी आवश्यक आहे. केवळ तीच कृपा आपल्या बाह्य कृतींना प्रेमाचे खरे अर्पण बनवू शकते.
उपासनेची सर्वांत श्रेष्ठ आणि निर्मळ कृती म्हणजे पवित्र मिस्सामध्ये ख्रिस्ताच्या बलिदानाशी पूर्णपणे एकरूप होणे आणि प्रेमपूर्ण आज्ञाधारकतेने व संपूर्ण विश्वासाने आपले शरीर, मन आणि आत्मा देवाला जिवंत बलिदान म्हणून अर्पण करणे. मिस्सामध्ये याजक द्राक्षारस असलेल्या प्याल्यात पाण्याचा एक थेंब घालतात. मग प्रतिष्ठापनेत ते पाणी आणि द्राक्षारस स्वतः ख्रिस्त बनतात. पाण्याचा तो एक थेंब आपले प्रतीक आहे. आपण अंतःकरणातून केलेले हे अर्पण मिस्साच्या बाह्य विधीशी जोडतो, तेव्हा खरी उपासना सुरू होते आणि तिथून ती आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात पसरते.
आज तुम्ही करत असलेल्या भक्तीच्या आणि प्रेमाच्या प्रत्येक बाह्य कृतीवर, विशेषतः मिस्सातील तुमच्या सहभागावर, चिंतन करा. येशूंनी फारिसी आणि शास्त्री यांना प्रेमापोटी जे खडे बोल सुनावले ते ऐका आणि त्यांच्या शब्दांच्या प्रकाशात आपले जीवन तपासा. जिथे दुर्बलता, पाप, गर्व किंवा अर्थहीन सवय आढळेल, तिथे त्यांच्या जागी मनापासून केलेली उपासना आणण्याचा प्रयत्न करा. अशा रीतीने तुमचे संपूर्ण जीवन देवावरील खऱ्या प्रेमाचे आणि उपासनेचे अर्पण बनू दे.
हे माझ्या प्रभू, हे माझ्या देवा, माझे सर्व प्रेम, माझी सर्व भक्ती आणि माझी निर्मळ आराधना यांना तूच एकटा पात्र आहेस. माझी आराधना कुठे कुठे मनापासून होत नाही, हे मला दाखव आणि स्वेच्छेने व मनःपूर्वक तुझ्यावर प्रेम करण्याची कृपा मला दे. माझे हृदय शुद्ध कर, जेणेकरून माझ्या आराधनेतून तुझा गौरव होईल आणि तुझ्या राज्याचा प्रसार होईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
याविषयी अधिक वाचा: संत स्कोलास्टिका, कुमारी—स्मृतिदिन
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




