17 फेब्रुवारी 2026
सामान्य काळातील सहाव्या आठवड्याचा मंगळवार
आजची वाचने
सर्व्हाइट धर्मसंघाचे सात पवित्र संस्थापक—ऐच्छिक स्मृतिदिन
प्रेषितांना बोध — जेम्स टिसो यांचे चित्र
शिष्य भाकरी आणायला विसरले होते आणि नावेत त्यांच्याजवळ एकच भाकर होती. येशूने त्यांना बजावले, “सावध राहा, परुश्यांच्या खमिरापासून आणि हेरोदाच्या खमिरापासून जपून राहा.” मार्क 8:14–15
येशू आणि त्याचे शिष्य अनेकदा नावेतून प्रवास करत आणि गालील सरोवराच्या काठची अनेक नगरे व गावे यांना भेट देत. यहुदीतर लोकांच्या देकापलिस प्रदेशातील फलदायी भेटीनंतर येशू व त्याचे शिष्य सरोवर ओलांडून दल्मनुथा येथे गेले. ते नावेतून उतरल्यावर काही परुश्यांनी येशूकडे चिन्ह मागितले. येशूने चमत्कार करून 4,000 लोकांना जेवू घातल्याचे त्यांनी बहुधा ऐकले असावे. त्यांच्या अविश्वासामुळे येशूला फार दुःख झाले. त्याने अंतःकरणाच्या तळापासून सुस्कारा सोडला, त्यांची मागणी नाकारली आणि तो पुन्हा नावेतून निघून गेला. याच जलप्रवासात आजच्या शुभवर्तमानातील प्रसंग घडला.
परुश्यांच्या कठोर अंतःकरणामुळे येशूला झालेले पवित्र दुःख त्याच्या मनाला खोलवर भिडले. त्यांनी त्याला नाकारले म्हणून त्याला स्वतःची कीव आली नव्हती; हे दुःख त्याच्या दैवी करुणेतून आले होते. त्यांच्या अविश्वासाचे आणि देवाच्या प्रेमाचे सत्य स्वीकारण्यास त्यांनी दिलेल्या नकाराचे ओझे त्याला जाणवले. याच खोल दुःखातून येशूने आपल्या शिष्यांना बजावले, “सावध राहा, परुश्यांच्या खमिरापासून आणि हेरोदाच्या खमिरापासून जपून राहा.”
या संदर्भात “खमीर” हे परुशी आणि हेरोद या दोघांनाही आपल्या अधीन ठेवणाऱ्या, सहज न दिसणाऱ्या पण सर्वत्र पसरणाऱ्या प्रभावाचे प्रतीक आहे. थोडेसे खमीर जसे मळलेल्या पिठाच्या गोळ्यात सर्वत्र पसरून तो फुगवते, तसेच परुशी आणि हेरोद यांचा घातक प्रभाव त्यांच्या कृतींतून आणि शिकवणीतून पसरत होता आणि इतरांनाही बिघडवत होता. परुश्यांबरोबरच्या भेटीत झालेले दुःख अजून ताजे असतानाच, येशूने या प्रसंगाचा उपयोग करून शिष्यांना बजावले की अशा घातक प्रभावांना आपल्या अंतःकरणात मूळ धरू देऊ नका.
परुश्यांचा सहज न दिसणारा, सर्वत्र पसरणारा आणि घातक दोष असा होता की ते नियमशास्त्राचे बाह्य पालन आणि त्यातून निर्माण झालेल्या परंपरा यांनाच अवाजवी महत्त्व देत. नियमांच्या कठोर पालनाच्या आग्रहामुळे त्यांना देवाच्या नियमशास्त्राचा खरा अर्थ दिसेनासा झाला: दया आणि अंतःकरणाची भाववृत्ती. त्यामुळे त्यांचा स्वतःचा आध्यात्मिक नाश झाला आणि त्यांनी इतरांनाही चुकीच्या मार्गाला लावले.
हेरोदाचे “खमीर” म्हणजे बहुधा सत्ता, संपत्ती आणि सुखभोग यांच्या सतत मागे धावणारी सांसारिक वृत्ती. देवाच्या शाश्वत सत्यांपेक्षा हेरोदाने सांसारिक गोष्टींच्या क्षणिक मोहाला पसंती दिली. त्याचा गर्व आणि घातक वर्तन यांतून ही वृत्ती ठळकपणे दिसते. याच वृत्तीमुळे शेवटी त्याने बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचा वध करवला. कारण हेरोदाचे आपल्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याशी असलेले व्यभिचारी संबंध योहानाने धैर्याने उघड केले होते.
नावेत असताना येशूने आपल्या शिष्यांना दिलेला इशारा हा केवळ परुशी आणि हेरोद यांच्या पापांचा निषेध नव्हता. सर्वत्र पसरणाऱ्या अशा पापांचा शिष्यांवरही परिणाम होऊ शकतो, याची ती जाणीव करून देणारा इशारा होता. येशूने आपल्या शिष्यांना जसे बजावले, तसेच तो आज आपल्यालाही बजावतो: देवाच्या तारणदायी सत्यातून न येणाऱ्या प्रभावांविषयी “सावध राहा” आणि त्यांच्यापासून “जपून राहा.” समाजात सर्वत्र पसरलेले विचारप्रवाह आणि नैतिकतेविषयीच्या धारणा नकळत आपल्या विचारांना व कृतींना कसे वळण देतात, हे ओळखणे आजच्या जगात अत्यावश्यक आहे. जागरूक राहून आणि ख्रिस्तामध्ये दृढपणे रुजून आपण सांसारिक वृत्तीचे, ढोंगीपणाचे आणि गर्वाचे खमीर ओळखून नाकारले पाहिजे. देवाच्या दैवी प्रकाशाला आपल्या जीवनाचे मार्गदर्शन करू दिले पाहिजे.
आज तुमच्या जीवनाला वळण देणाऱ्या प्रभावांवर चिंतन करा. तुम्ही समाजमाध्यमांवर, इंटरनेटवर निरनिराळ्या गोष्टी पाहण्यात किंवा दूरदर्शन पाहण्यात तासन्तास घालवता का? तसे असेल, तर तुम्ही पाहता किंवा वाचता त्या मजकुराचा सहज न जाणवणारा पण दूरवर पोहोचणारा परिणाम काय आहे, याचा क्षणभर विचार करा. तो तुम्हाला नकळत चुकीच्या वाटेवर नेत आहे का, हे विवेकाने तपासा. अशा सांसारिक प्रभावांवर प्रार्थना आणि देवाचे वचन हाच खरा उपाय आहे. शुभवर्तमान आपल्या मनात आणि अंतःकरणात सर्वत्र भिनले पाहिजे, जेणेकरून ते खमिराप्रमाणे आपल्यात आतून परिवर्तन घडवेल. प्रार्थना, संस्कार आणि शुभवर्तमानाशी सातत्याने राखलेली बांधिलकी यांतून या दैवी खमिराला पोषण मिळते. येशूने आपल्या शिष्यांना दिलेला इशारा प्रत्येक पिढीसाठी आहे; तो मनावर घ्या. जागरूक राहा. तुमचे अंतःकरण आणि मन जपा, आणि ती दोन्ही देवाच्या तारणदायी कृपेत दृढपणे रुजलेली राहू द्या.
हे दुःखित प्रभू, परुशी आणि हेरोद यांच्या पापांमुळे तुझे अंतःकरण पवित्र दुःखाने भरून गेले होते. विशेषतः त्यांचा इतरांवर होणारा घातक परिणाम पाहून तुला दुःख झाले. माझ्या विचारांना आणि कृतींना वळण देणारे प्रभाव मला ओळखता यावेत, म्हणून मला आध्यात्मिक अंतर्दृष्टीचे वरदान दे. केवळ तुझे वचन आणि तुझे सत्य मला मार्ग दाखवोत. माझ्या जीवनातून त्या सत्याची साक्ष मिळो आणि माझ्या आचरणाचा इतरांवर पवित्र प्रभाव पडो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
यांच्याविषयी अधिक वाचा: सर्व्हाइट धर्मसंघाचे सात पवित्र संस्थापक
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




