11 मार्च 2026
प्रायश्चित्तकाळातील तिसऱ्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने
व्हिडिओ
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे लिखाण रद्द करण्यासाठी मी आलो आहे, असे समजू नका. मी रद्द करण्यासाठी नव्हे, तर पूर्णत्वास नेण्यासाठी आलो आहे. आमेन, मी तुम्हांला सांगतो: आकाश व पृथ्वी नाहीशी होईपर्यंत, सर्व काही घडून येईपर्यंत, नियमशास्त्रातील सर्वांत लहान अक्षरही किंवा अक्षराचा अगदी छोटासा भागही नाहीसा होणार नाही.” मत्तय 5:17–18
तारणाच्या प्रदीर्घ इतिहासात देवाने आपली दैवी योजना हळूहळू प्रकट केली. त्या इतिहासाची सुरुवात आदाम आणि हव्वा यांच्यापासून झाली. नोहा आणि अब्राहाम यांच्या काळात तो पुढे सरकला, मोशेच्या काळात त्याला अधिक खोली लाभली, संदेष्ट्यांच्या काळात तो लोकांच्या अंतःकरणात रुजला आणि येशूमध्ये तो पूर्णत्वास गेला. या इतिहासाचा सविस्तर मागोवा घेण्यास बराच वेळ लागेल, पण त्यातून एक साधे सत्य ठळकपणे दिसते: आदाम आणि हव्वा यांच्या पतनानंतर देवाने आपल्या लोकांना आपल्या दैवी नियमशास्त्राची परिपूर्णता टप्प्याटप्प्याने उलगडून दाखवली. त्याच प्रकारे, आपल्या आध्यात्मिक वाटचालीत आपण हळूहळू देवाकडे वळतो आणि शुद्ध होत जातो, तसे तो आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या अधिक जवळ आणतो.
सुरुवातीला देवाने ज्याला आपण नैसर्गिक नियम म्हणतो तो प्रस्थापित केला. आदाम आणि हव्वा यांना नैतिक सत्ये स्वाभाविकपणे उमगत होती. पण त्यांच्या पापानंतर त्या नियमाचे भान धूसर झाले आणि आजही ते तसेच आहे. मग देवाने नोहाशी करार केला आणि पुन्हा कधीही जलप्रलयाने पृथ्वीचा नाश करणार नाही, असे वचन दिले. अब्राहामाशी केलेल्या कराराला अधिक खोली लाभली: त्याच्या वंशजांद्वारे सर्व राष्ट्रांना आशीर्वाद देण्याचे वचन देवाने दिले. त्यानंतर मोशेच्या काळात दहा आज्ञा देण्यात आल्या. त्यांतून कसे जगावे याचे स्पष्ट नैतिक नियम मिळाले. उपासनेत लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी विधिविषयक नियम देण्यात आले, तर नागरी नियमांमुळे इस्राएली लोकांना देवाचे विसिष्ट लोक म्हणून वेगळी ओळख मिळाली.
इस्राएलची स्थापना झाल्यावर देवाने लोकांच्या अंतःकरणात अधिक खोल परिवर्तन घडावे म्हणून संदेष्टे पाठवले. पश्चात्ताप करून पापापासून दूर व्हा, देवाकडे परत या आणि कराराला पूर्णत्व देणाऱ्या मशीहाच्या आगमनासाठी तयार व्हा, असे आवाहन संदेष्ट्यांनी लोकांना केले.
येशू आला तेव्हा त्याच्या शिकवणुकीमुळे नियमशास्त्राचा अधिक पूर्ण अर्थ उलगडला. नियमशास्त्रातील सर्व वचने आणि आज्ञा त्याच्यामध्ये पूर्णत्वास गेल्या. आपल्या जीवनातून, मरणातून आणि पुनरुत्थानातून येशूने कृपेचा नवा करार प्रस्थापित केला आणि उद्धाराचे कार्य पूर्णत्वास नेले.
तारणाच्या इतिहासाचा हा आढावा केवळ ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचा नाही; देव आपल्यापैकी प्रत्येकाशी वैयक्तिक नाते कसे जोडतो, हेही त्यातून समजते. आपण देवाकडे वळू लागतो तेव्हा आपण ज्या अवस्थेत आहोत, तिथेच तो आपल्याला भेटतो. तो आपल्याला त्याची मुले होण्यासाठी बोलावतो आणि गंभीर पाप टाळून त्याच्या आज्ञा पाळण्याची ओढ आपल्याला लागते. आपण पुढे जातो तसे संस्कारांसह आपल्या श्रद्धेच्या आचरणालाही नवी खोली लाभते. केवळ बाह्य नियम पाळणे पुरेसे नाही, तर अंतःकरणापासून जगण्याचे आपल्याला आवाहन आहे, हे हळूहळू आपल्या मनात रुजते. देव आपल्याला जवळचा वाटू लागतो, तो आपल्याशी वैयक्तिक नाते ठेवतो हे उमगते, आणि पापाकडे असलेली अगदी थोडीशी ओढही दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो. शेवटी, सुवार्तेकडे पूर्णपणे वळावे आणि तिने आपल्याला ख्रिस्ताशी अधिक खोल नात्यात न्यावे, असे आपल्याला आवाहन आहे.
ही वाटचाल ओळखणे आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक आहे. ही वाट आपल्या लक्षात आली नाही, तर जिथे आहोत तिथेच आपण समाधानी राहू शकतो. तुम्ही देवाकडे वळू लागलात तेव्हा त्याने तुम्हाला जे काही प्रकट केले ते आजही खरे आहे; पण सुरुवात म्हणजे पूर्णत्व नव्हे. आपल्या जीवनावर चिंतन करताना स्वतःला विचारा: देवाने मला आपल्या अधिक जवळ कसे आणले, माझी श्रद्धा कशी दृढ केली आणि त्याच्याशी अधिक गाढ ऐक्यात येण्यासाठी मला कसे बोलावले, हे मला दिसते का?
देव आपल्याला हळुवारपणे पुढे नेतो. एकदम परिपूर्ण होणे आपल्याला झेपणार नाही, हे त्याला ठाऊक आहे. तरीही आपण दररोज वाढावे अशी त्याची इच्छा आहे. देवाकडे नव्याने वळत राहण्याची, अंतःकरणात अधिक खोल बदल घडण्याची आणि आध्यात्मिक शुद्धी साधण्याची संधी प्रत्येक दिवस देतो. महान संतांनी या वाटचालीविषयी लिहून आपल्याला पावित्र्याचा मार्ग दाखवला आहे.
परिपूर्ण होण्याच्या आवाहनावर आज चिंतन करा. ते अशक्य वाटत असेल, तर एका वेळी एक पाऊल टाकण्याचा निर्धार करा. परिपूर्णतेचा मार्ग लांब आहे, त्यावर चालणे कठीण आहे आणि त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण तो आपल्याला मुक्त करतो, आपल्यात परिवर्तन घडवतो आणि अखेरीस गौरवाकडे नेतो. एका रात्रीत तुम्ही संत होणार नाही, पण पावित्र्याच्या दिशेने पुढचे पाऊल आजच टाकू शकता. या वाटचालीला ‘हो’ म्हणा आणि देव तुम्हाला मार्ग दाखवेल असा विश्वास ठेवा.
हे माझ्या प्रभू, तू आम्हाला तारणाचा मार्ग हळूहळू उलगडून दाखवला आहेस. आदाम आणि हव्वा यांच्या काळापासून तू मनुष्यरूपाने आलास त्या वेळेपर्यंत, तुझ्याशी पुन्हा पूर्ण ऐक्य साधता यावे म्हणून तू आम्हाला मार्ग दाखवलास. माझ्या जीवनात पावित्र्याचा मार्ग मला दाखव आणि त्यावर चालण्याचे धैर्य मला दे. एकेक पाऊल टाकत संतत्वाकडे वाटचाल करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
एकोणिसाव्या दिवसाचे चिंतन:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसाजवळचे 40 दिवस
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावर आधारित चिंतने





