मराठी

पवित्र शनिवार : आशेने वाट पाहणे

४ एप्रिल २०२६

पवित्र शनिवार

पवित्र त्रिदिनासाठी आणखी वाचन

थडग्यात निश्चेष्ट पडलेला येशू ख्रिस्त आणि त्याच्याजवळ त्याची आई मरिया

व्हिडिओ

काल पवित्र मिस्साबली अर्पण करण्यात आला नाही, तरी प्रभूच्या दुःखसहनाच्या स्मरणविधीत श्रद्धावंतांनी पवित्र प्रभुभोजन ग्रहण केले. आज मात्र ख्रिस्तसभा गहन मौनात जाते. दिवसभर कोणताही उपासनाविधी होत नाही. पवित्र साक्रामेंत ठेवण्याचे देवघर रिकामे असते आणि ख्रिस्तसभा शांतपणे पुनरुत्थानाच्या आनंदघोषणेची वाट पाहते. हे मौन आपल्याला ख्रिस्त मृतात्म्यांकडे उतरला या रहस्यात अधिक खोलवर शिरण्यास आणि त्याच्या बलिदानाच्या अथांग गहनतेवर चिंतन करण्यास आमंत्रण देते.

जे दररोज मिस्साला उपस्थित राहतात, त्यांना या दिवशी अनेकदा एक पोकळी जाणवते. पवित्र प्रभुभोजनाची ओढ लागते आणि त्या ओढीतून आत्म्याची आध्यात्मिक भूक व्यक्त होते. तरीही ख्रिस्तसभा आपल्या सुज्ञपणाने या दिवशी मिस्साबली अर्पण करत नाही आणि प्रभुभोजनही दिले जात नाही. असे का? कारण पवित्र शनिवार स्वतःच एक वेगळी कृपा देतो. या दिवसाची शांतता म्हणजे आपल्याला कशापासून वंचित ठेवणे नव्हे, तर कृपा स्वीकारण्याचा एक गहन मार्ग आहे. मौनात दिलेली ही देणगी आपल्याला भरवसा ठेवायला, वाट पाहायला आणि आशा धरायला आमंत्रण देते.

पवित्र त्रिदिन आपल्याला दाखवतो की उपासनावर्ष हे स्वतःच कृपेचा झरा आहे. या तीन पवित्र दिवसांपैकी प्रत्येक दिवशी पास्काचे रहस्य टप्प्याटप्प्याने उलगडते. संत थॉमस अक्विनास हे असे स्पष्ट करतात: “ज्या वास्तवाकडे एखादे प्रतीक निर्देश करते, ते वास्तव प्रकट झाल्यावर त्या प्रतीकाचे कार्य संपते. पण वर सांगितल्याप्रमाणे, हा संस्कार आपल्या प्रभूच्या दुःखसहनाचे प्रतीक आहे आणि ते आपल्यासमोर साकार करतो. म्हणून आपल्या प्रभूचे दुःखसहन प्रत्यक्ष जसे घडले तसे ज्या दिवशी स्मरले जाते, त्या दिवशी या संस्काराचे पवित्रीकरण केले जात नाही” (सुम्मा थिओलॉजिका III.83.2). दुसऱ्या शब्दांत, पवित्र शुक्रवारी प्रभूच्या दुःखसहनात सहभागी झाल्याने त्याच्या तारणदायी बलिदानाची संपूर्ण कृपा आपल्याला मिळते. म्हणून त्या दिवशी पवित्र युखरिस्ताचा विधी साजरा करण्याची आवश्यकता नसते.

त्याचप्रमाणे, पवित्र शनिवार आपल्याला एक विशेष कृपा देतो. ती आपल्याला आशेने वाट पाहण्याच्या रहस्यात घेऊन जाते. पुनरुत्थानाच्या जागरणविधीपर्यंत कोणताही उपासनाविधी साजरा होत नसला, तरी हा मौनाचा दिवस आपल्याला ख्रिस्ताच्या अंतिम विजयाच्या आशेत विसावण्यास आमंत्रण देतो. माता मरिया आणि शिष्य यांच्यासोबत जागरण करण्याचे आवाहन आपल्याला केले जाते. या निःशब्दतेतही देव कार्य करीत आहे आणि पुनरुत्थानाचे वचन लवकरच पूर्ण होईल, असा भरवसा आपण बाळगू या.

आशेने वाट पाहणे ही आपल्या जीवनातील एक अत्यावश्यक आध्यात्मिक देणगी आहे. तिच्यामुळे परीक्षांत टिकून राहण्याची, हालअपेष्टा धीराने सहन करण्याची आणि कितीही संघर्षांना तोंड द्यावे लागले तरी आशेत अढळ राहण्याची कृपा आपल्याला मिळते. आशा हा तीन ईश्वराभिमुख सद्गुणांपैकी एक आहे. श्रद्धा हा आशेचा पाया आहे आणि आशा आपल्याला श्रद्धा कृतीत उतरवण्याची प्रेरणा देते. त्यातून प्रीती जन्म घेते, जी सर्व सद्गुणांमध्ये श्रेष्ठ आहे. अलौकिक आशेशिवाय आपण प्रीती पूर्णत्वाने प्राप्त करू शकत नाही, ना ती टिकवून ठेवू शकतो.

पण आशा म्हणजे केवळ मनासारखे घडावे अशी इच्छा किंवा सगळे चांगले होईल असा आशावादी विचार नव्हे. अलौकिक आशेचा आधार देवाची वचने आहेत. ती आशा आपल्याला श्रद्धेद्वारे मिळते आणि प्रार्थना व देवावरील भरवसा यांमुळे वाढते. आपली धन्य माता मरिया या आशेचा आदर्श आहे. पवित्र शनिवारी तिचे हृदय शंकेने नव्हे, तर अढळ आशेने भरलेले होते. त्या आशेने तिला प्रार्थनेत जागरण करायला आणि आपल्या पुत्राचे वचन पूर्ण होण्याची वाट पाहायला प्रेरित केले. ही आशा केवळ प्रतीक्षेपुरती मर्यादित राहिली नाही, तर तिच्यातून अलौकिक प्रीती फुलली. देवाच्या इच्छेत रुजलेल्या या प्रीतीला दुःख आणि अनिश्चितता असतानाही फळ आले.

आज पवित्र शनिवारच्या मौनावर चिंतन करा. त्या मौनात तुम्हाला भेडसावणाऱ्या चिंता, जाणवणारी अधीरता किंवा तुम्ही सोसत असलेले कष्ट यांचाही विचार करा. या परीक्षांमध्ये आशा लाभावी म्हणून प्रार्थना करा आणि देवाचे तारणदायी वचन तुमच्या जीवनात पूर्ण होण्याची वाट पाहा. देवावर भरवसा ठेवा आणि त्याची वाट पाहा. तुमच्या श्रद्धेतून आणि आशेतून तुमचे हृदय देवावरील आणि इतरांवरील प्रीतीने भरू द्या. ख्रिस्ताच्या दुःखसहनातून त्याच्या पुनरुत्थानाच्या गौरवात प्रवेश करण्यासाठी ही प्रीती आवश्यक आहे.

हे माझ्या मौनधारी प्रभू, तुझे शरीर थडग्यात विसावले होते, तेव्हा तुझा आत्मा तुझ्याआधी मरण पावलेल्या श्रद्धावंतांच्या आत्म्यांकडे उतरला. त्यांच्यासाठी आणि श्रद्धा, आशा व प्रीतीने तुझ्यामागे येणाऱ्या सर्वांसाठी तू नंदनवनाची दारे उघडलीस. मौनात वाट पाहण्याच्या या दिवशी मला आशेने भरून टाक, विशेषतः जेव्हा निराशेला शरण जाण्याचा मोह मला होतो. या पवित्र शनिवारी माझा सगळा भरवसा तुझ्यावर ठेवण्याची आणि तुझी कृपा विपुल प्रमाणात स्वीकारण्याची देणगी मला लाभो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

चाळिसावा दिवस — चिंतन:
वाळवंटातील ४० दिवस & क्रूसापाशी ४० दिवस

दुसरा दिवस: दैवी दयेच्या रविवाराच्या तयारीसाठी नोव्हेना

पवित्र सप्ताहासाठी आणखी साहित्य

पवित्र शनिवारासाठी प्रार्थनामय चिंतन

जपमाळ – दुःखाची रहस्ये (पवित्र शास्त्रातील वचनांसह)

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

संत इसिदोर, बिशप आणि ख्रिस्तसभेचे धर्माचार्य
(यंदा हा स्मृतिदिन साजरा केला जात नाही)

आजचे संत व सण