4 जून 2026
सामान्य काळातील नवव्या आठवड्याचा गुरुवार
आजची वाचने

येशूची परीक्षा पाहण्यासाठी शास्त्री उभा राहिला — चित्रकार: जेम्स तिसो
शास्त्र्यांपैकी एक जण येशूकडे आला आणि त्याने विचारले, “सर्व आज्ञांमध्ये पहिली आज्ञा कोणती?” मार्क 12:28
येशूला अटक होऊन त्याचा वध होण्याच्या काही दिवस आधी, वल्हांडण सणाच्या काळात मंदिराच्या परिसरात त्याचे निरनिराळ्या लोकांशी झालेले संवाद, त्याची शिकवण आणि त्याच्या संदेष्ट्याला साजेशा कृती यांविषयी आपण पुढे वाचत आहोत. त्या आठवड्यात येशूने नाणे बदलणाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना हाकलून मंदिर शुद्ध केले आणि त्याला विविध धार्मिक व राजकीय गटांच्या विरोधाला सामोरे जावे लागले.
प्रथम मुख्य याजक, शास्त्री आणि वडीलजन यांच्या एका गटाने येशूला मंदिर शुद्ध करण्याचा अधिकार कोणी दिला, असा जाब विचारला. मग त्यांनी काही परुशी आणि हेरोदपंथीय यांच्याशी संगनमत करून त्याला नियमशास्त्राच्या पेचात अडकवण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला. त्यानंतर काही सदूकी त्याच्यासमोर आले; परंतु येशूच्या उत्तराने पवित्र शास्त्र आणि देवाचे सामर्थ्य यांविषयीचा त्यांचा गैरसमज उघड झाला. आजच्या शुभवर्तमानात तो संवाद ऐकून येशूच्या उत्तराने प्रभावित झालेला एक शास्त्री पुढे येतो. येशूला पेचात पकडण्याचा प्रयत्न न करता तो प्रामाणिकपणे विचारतो, “सर्व आज्ञांमध्ये पहिली आज्ञा कोणती?”
नियमशास्त्रात कोणत्या आज्ञेला किती महत्त्व आहे, याविषयी त्या काळी रब्बींमध्ये नेहमी चर्चा होत असे. शास्त्र्याचा प्रश्न त्याच चर्चेतून आला होता. याजक, शास्त्री, परुशी आणि सदूकी या विविध धार्मिक गटांमध्ये अनेक बाबतींत मतभेद होते. कदाचित त्यामुळेच, यहुदी परंपरेनुसार तोरामध्ये असलेल्या 613 आज्ञांना कोणते तत्त्व आधारभूत आहे, हे शोधण्याचा विद्वान वारंवार प्रयत्न करत. मूर्तिपूजेला मनाई करणाऱ्या आज्ञेसारख्या काही आज्ञा अधिक महत्त्वाच्या वाटत, तर आहारासंबंधीच्या नियमांसारख्या इतर आज्ञा कमी महत्त्वाच्या मानल्या जात.
येशूचे उत्तर आज्ञांचा केवळ महत्त्वक्रम लावत नाही; त्या आज्ञा अशा रीतीने एकत्र आणते की संपूर्ण नियमशास्त्राची परिपूर्ती होते आणि आज्ञांचा खरा हेतू स्पष्ट होतो. नियमांच्या अर्थावर वाद घालत बसण्याऐवजी येशू चर्चा अधिक खोलवर नेतो आणि दोन आज्ञांत नियमशास्त्राचे सार सांगतो: “तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने आणि पूर्ण शक्तीने प्रेम कर” आणि “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम कर” (मार्क 12:30–31). अशा प्रकारे येशू दाखवतो की प्रेम हाच प्रत्येक आज्ञेचा पाया आणि तिची परिपूर्ती आहे: सर्वप्रथम देवावर प्रेम करणे आणि त्या आज्ञेचा विस्तार म्हणून शेजाऱ्यावर प्रेम करणे.
“गुरुजी, तुम्ही बरोबर सांगितले,” या शास्त्र्याच्या उत्तरात नम्रता आणि सुज्ञता दोन्ही दिसतात. त्याला हे नीट समजले आहे, याची पुष्टी येशू करतो: “तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” येशू आणि धार्मिक नेते यांच्यात यापूर्वी झालेल्या वादांपेक्षा हा संवाद अगदी वेगळा आहे. येशूला पेचात पकडण्याचा किंवा त्याची बदनामी करण्याचा प्रयत्न न करता शास्त्री लक्षपूर्वक ऐकतो आणि प्रामाणिकपणे उत्तर देतो. त्यानंतर “त्याला आणखी प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी केले नाही” (मार्क 12:32, 34).
आठवडाभर येशूचे विविध धार्मिक आणि राजकीय गटांशी झालेले संवाद गर्दीतल्या अनेकांनी पाहिले असावेत. त्याची बदनामी करण्याचे वारंवार होणारे प्रयत्न पाहून सुरुवातीला त्यांना अस्वस्थ वाटले असेल. पण येशू अधिकारवाणीने आणि सत्याला धरून उत्तर देत असताना, स्वतःच्या हेतूंसाठी नियमशास्त्राचा हवा तसा वापर करू पाहणारे आणि या शास्त्र्याप्रमाणे ते खरोखर समजून घेऊ इच्छिणारे यांच्यातला फरक त्यांना अधिकाधिक स्पष्ट दिसू लागला.
आपल्याही जीवनात कधीकधी वाद आणि फूट यांचे ओझे जाणवते. राजकारण, धर्म, शिक्षण किंवा दैनंदिन जीवन यांपैकी कुठेही मतभेद होऊ शकतात आणि त्यांचे सहज भांडणात रूपांतर होऊ शकते. या संघर्षांना वेळीच आवर घातला नाही, तर त्यांतून फूट, वैर आणि आपली मनःशांती हिरावून घेणारे हट्टही वाढू शकतात. येशूचा या शास्त्र्याशी झालेला संवाद आपल्याला पुढची वाट दाखवतो: नम्रपणे प्रश्न विचारण्याची, प्रामाणिकपणे संवाद साधण्याची आणि प्रेमाच्या आधाराने सत्याचा शोध घेण्याची वाट. वाद जिंकण्याच्या इच्छेने नव्हे, तर देवासाठी अंतःकरण खुले ठेवून आपण संवाद साधतो, तेव्हा आपण त्याच्या राज्याच्या अधिक जवळ येतो.
या शास्त्र्याने आपल्या कृतीतून दिलेल्या साक्षीवर आज चिंतन करा. देवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम करण्याची येशूची शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे; सत्याच्या शोधात या शास्त्र्याने घालून दिलेला आदर्शही तितकाच महत्त्वाचा आहे. इतरांशी होणाऱ्या आपल्या रोजच्या संवादांकडे पाहा आणि देवाच्या सत्याकडे आपण कसे पाहतो, याचा विचार करा. तुम्हाला वाद घालण्याची सवय आवरता येत नाही का? तुम्ही डावपेचांचा आधार घेता का, किंवा ‘मीच बरोबर’ असा आग्रह धरून आपलेच म्हणणे खरे करण्याच्या हट्टाला पेटता का? की परस्परांना समजून घेण्यास आणि एकता साधण्यास मदत करणारे सत्य तुम्ही शोधता? या शास्त्र्याच्या नम्रतेचे आणि प्रामाणिकपणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. मग तुम्हीही देवाच्या राज्यापासून दूर नसाल.
हे परिपूर्ण प्रेमाच्या प्रभू, तुझ्या नियमशास्त्राची परिपूर्ती देवावर आणि शेजाऱ्यावर केलेल्या निर्मळ व पवित्र प्रेमात होते. सर्वांपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करायला आणि त्या प्रेमातून, तू इतरांकडे जसा पाहतोस तसे पाहायला व त्यांच्याशी तू जसा वागतोस तसे वागायला मला मदत कर. तुझ्यावरील माझे प्रेम माझ्यात असा बदल घडवो की मी तुझ्या दैवी प्रेमाचे साधन बनावे आणि माझ्याद्वारे तुझे प्रेम लोकांच्या जखमा भरून काढो, त्यांना एकत्र आणो आणि शांती देवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
येशूच्या पवित्र हृदयाची नोव्हेना
नोव्हेनेसाठी सुचवलेला कालावधी: 3 – 11 जून 2026
येशूच्या परमपवित्र हृदयाचा महोत्सव 12 जून 2026 रोजी आहे



