मराठी

आपण बोलतो ते शब्द

7 जुलै 2026
सामान्य काळातील चौदाव्या आठवड्याचा मंगळवार
आजची वाचने

दुष्ट आत्म्यांनी पछाडलेला आंधळा व मुका मनुष्य, जेम्स तिसो यांचे चित्र

व्हिडिओ

दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या एका माणसाला येशूकडे आणण्यात आले. त्याला बोलता येत नव्हते. दुष्ट आत्म्याला हाकलून दिल्यावर तो मुका मनुष्य बोलू लागला. लोकसमुदाय थक्क झाला आणि म्हणाला, “इस्राएलमध्ये असे काही यापूर्वी कधीही पाहिले गेले नाही.” मत्तय 9:32–33

आपल्याला बोलताच येत नाही, अशी कल्पना करा. आपला दिवस कसा गेला हे आपल्या जिवलगांना सांगता येणार नाही; आपल्या आशा, आनंद किंवा दुःखही त्यांच्याशी वाटून घेता येणार नाही. त्यामुळे आपण इतरांपासून तुटून पडू आणि आपल्याला तीव्र एकटेपणा जाणवेल. दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या त्या माणसाला हीच व्यथा भेडसावत होती.

रूपकाच्या दृष्टीने पाहिले, तर दुष्ट आत्म्याने पछाडलेला हा मनुष्य अशा वेळी आपले प्रतीक ठरतो, जेव्हा दुसऱ्या व्यक्तीसमोर किंवा देवासमोर आपल्या मनातले नीट व्यक्त करायला आपल्याला शब्द सापडत नाहीत. आपले हे ‘मुकेपण’ अनेकदा विचारांतील गोंधळातून येते. त्या गोंधळामुळे देवाच्या शाश्वत सत्याच्या प्रकाशात आपण स्वतःला समजून घेऊ शकत नाही. आध्यात्मिक मुकेपणा म्हणजे जणू दैवी ज्ञानात ज्यांची मुळे नाहीत असे पोकळ शब्द बोलणे. आपण पुष्कळ बोलू शकतो; पण आपले हृदय देवाशी जुळलेले नसेल, तर आपल्या शब्दांत प्रार्थनेऐवजी गोंगाट, सत्य उलगडण्याऐवजी केवळ प्रतिक्रिया, आणि मनातले प्रामाणिकपणे सांगण्याऐवजी(v) बडबड असते.

दुसऱ्या व्यक्तीशी खरा संवाद साधणे म्हणजे काय? त्याचा अर्थ शब्दांची रास लावणे, दुसऱ्याला बोलू न देता स्वतःच बोलत राहणे, वाद जिंकणे किंवा इतरांसमोर स्वतःचे आणि आपल्या विचारांचे प्रदर्शन करणे असा नाही. आपल्या आत्म्यात देवाचे सत्य जिवंत असते, तेव्हा खऱ्या संवादाची सुरुवात होते. श्रद्धेच्या देणगीने आपले मन उन्नत होते आणि दैवी ज्ञानाने आपले हृदय परिपूर्ण होते, तेव्हा आपल्या शब्दांना अर्थ प्राप्त होतो. मग आपण थोडे बोललो किंवा पुष्कळ बोललो, तरी केवळ शब्द उच्चारत नाही किंवा विचार मांडत नाही. आपल्या बोलण्यातून आपण कोण आहोत, देवाशी आपले ऐक्य, इतरांवरील आपले प्रेम आणि देवाने आपल्या अंतःकरणात रुजवलेले प्रेम हे सारे व्यक्त होते.

शेवटी, आपल्या शब्दांचा उपयोग देवाचे राज्य उभारण्यासाठी व्हायला हवा. “आज रात्री जेवायला तुला काय आवडेल?” असा रोजचा साधा प्रश्नही आपण अशा रीतीने विचारू शकतो की त्यातून देवाचे राज्य उभारण्यास हातभार लागेल. पण शब्द जसे कृपा पोहोचवू शकतात, तसेच ते इजा करण्याचे साधनही बनू शकतात. केवळ स्वतःचा विचार करून, रागाच्या भरात किंवा इतरांची निंदा करताना आपण जे बोलतो, त्याने उभारणी होण्याऐवजी मोडतोड होते आणि देवाच्या राज्याची हानी होते.

आजच्या शुभवर्तमानात, दुष्ट आत्म्याने पछाडलेल्या त्या माणसाकडे एक प्रतीक म्हणून पाहण्याचे आमंत्रण आपल्याला मिळते. देवाचे वचन बोलण्याऐवजी आपण पोकळ किंवा इजा करणारे शब्द बोलतो, तेव्हा आपण त्याच्यासारखे असतो. अगदी सहज गप्पांतही आपण देवाचे वचन बोलतो, तेव्हा आपल्या आत्म्यात झळकणारे देवाचे प्रेम व्यक्त होते. मायेने दिलेले प्रोत्साहन, दुसऱ्याचा दिवस कसा गेला याची आस्थेने केलेली आणि त्याला दिलासा देणारी विचारपूस, एखाद्या आनंददायी भेटीबद्दल सांगणे—अशा रीतींनी किंवा इतर कोणत्याही रीतीने आपल्या मानवी हृदयातून देवाचे प्रेम झळकते. असाच संवाद साधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

त्या माणसातून दुष्ट आत्म्याला खरोखरच हाकलून देऊन येशूने आपल्या दैवी सामर्थ्याची साक्ष दिली आणि त्याला त्याच्या आध्यात्मिक व्यथेतून मुक्त केले. देहधारी वचन दुष्ट आत्म्याला हाकलून देते आणि तो मनुष्य बोलू लागतो, तेव्हा केवळ त्याची वाचा परत मिळण्याचा चमत्कार घडत नाही, तर त्याला त्याची ओळखही पुन्हा मिळते. ख्रिस्त, ते शाश्वत वचन, मानवी वाणीला तिचा पवित्र हेतू पुन्हा प्राप्त करून देतो: सत्याला वाचा फोडणे, माणसांना प्रेमात एकत्र आणणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देवाचा गौरव करणे.

हे रूपक पुढे नेले, तर येशूला आपल्यातले मुकेपणही दूर करायचे आहे. हे मुकेपण म्हणजे आपले पाप आणि दैवी सत्य प्रेमाने व्यक्त करण्याऐवजी पोकळ किंवा इजा करणारे शब्द बोलण्याचा प्रत्येक दुष्ट मोह. जेव्हा आपल्या शब्दांत त्या दुष्टाचे खोटे बोल आणि मोह यांचे प्रतिध्वनी उमटतात, तेव्हा आपले आध्यात्मिक मुकेपण सर्वांत कर्णकर्कश होते.

आपले हृदय आणि मन शुद्ध करू देण्यासाठी आपण ख्रिस्ताला वाव देतो, तेव्हा तो आपली वाणीही मोकळी करतो. मनापासून प्रार्थना करण्याची, स्पष्टपणे बोलण्याची आणि धैर्याने साक्ष देण्याची कृपा तो आपल्याला देतो. हेच खऱ्या मुक्तीचे फळ आहे: आपण दुष्टतेपासून मुक्त होतो आणि देवाशी व एकमेकांशी ऐक्य साधण्याचे सामर्थ्य आपल्याला मिळते.

“इस्राएलमध्ये असे काही यापूर्वी कधीही पाहिले गेले नाही!” असे उद्गार काढणाऱ्या लोकांच्या विस्मयावर आज चिंतन करा. देव आपल्याला पोकळ किंवा इजा करणाऱ्या बोलण्याच्या ओझ्यातून मुक्त करतो, तेव्हा आपणही स्वाभाविकपणे थक्क होऊ आणि त्याची स्तुती करू. प्रेम आणि सत्य व्यक्त करण्यासाठी आणि त्या प्रेमात व सत्यात आपले जीवन इतरांशी वाटून घेण्यासाठी आपल्याला घडवले आहे. जेव्हा हे घडते, तेव्हा पूर्वी आपण कोणत्या मुकेपणाशी झुंजत होतो याची जाणीव होते आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद आपण अनुभवतो.

हे पित्याच्या शाश्वत वचना, माझ्या हृदयाच्या शांततेत माझ्याशी बोल. तुझ्यासमोर मला मुके करणारा सगळा गोंधळ, भीती आणि पाप दूर कर. माझ्या आत्म्याला बरे कर, माझी वाणी मोकळी कर आणि तुझे सत्य प्रेमाने बोलायला मला शिकव. तुझ्या चांगुलपणाची घोषणा करण्यास, इतरांना उभारी देण्यास आणि तुझ्या पवित्र नावाचा गौरव करून तुझे राज्य बळकट करण्यास मी कधीही भिऊ नये. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्सातील वाचनांचे पर्याय