मराठी

वेदनेचे आनंदात रूपांतर

22 मे 2020
पास्का काळाच्या सहाव्या आठवड्यातील शुक्रवार
आजची वाचने

कॅशियाची संत रीटा — ऐच्छिक स्मरण

“प्रसूतीच्या वेळी स्त्रीला वेदना होतात, कारण तिची घटका आली असते. पण बाळाला जन्म दिल्यावर, जगात एक बाळ जन्माला आले या आनंदामुळे तिला त्या वेदनांची आठवण राहत नाही. तसेच तुम्हीही आता दुःखात आहात. पण मी तुम्हाला पुन्हा भेटेन. तेव्हा तुमची अंतःकरणे आनंदित होतील आणि तुमचा आनंद कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही.” योहान 16:21–22

जीवनात दुःख असणे स्वाभाविक आहे. दररोज लहानसहान प्रसंगांत आपल्याला त्याचा अनुभव येतो. तर कधी एखाद्या प्रसंगामुळे आपल्याला अतिशय तीव्र वेदना सहन कराव्या लागतात.

तुम्हाला दुःख होत आहे, याचा अर्थ तुम्ही देवाच्या कृपेत नाही असा होतो का? देवाने तुम्हाला सोडून दिले आहे, असा त्याचा अर्थ होतो का? की तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात? नक्कीच नाही. हे समजून घेण्यासाठी येशूच्या जीवनाकडे पाहणे पुरेसे आहे. आपल्या पित्याने सोपवलेल्या कार्यात येशू अधिकाधिक पूर्णपणे स्वतःला वाहत गेले आणि पृथ्वीवरील आपल्या संपूर्ण जीवनात त्यांनी सतत क्लेश सोसले. आपले सार्वजनिक सेवाकार्य सुरू करण्याच्या अगोदर त्यांनी वाळवंटात चाळीस दिवस क्लेश सहन केले. सार्वजनिक सेवाकार्याच्या संपूर्ण काळात त्यांनी पृथ्वीवरील जीवनातील वेदना आणि थकवा अनुभवला. त्यांना लोकांची टीका, गैरसमज, थट्टा, नकार, कठोर वागणूक आणि आणखी कितीतरी गोष्टी सहन कराव्या लागल्या. अखेरीस क्रूसावर त्यांचे काय झाले, हे आपल्याला माहीत आहे.

आपल्या धन्य मातेचे अंतःकरण ‘दुःखाच्या तलवारीने’ भेदले. विवाह झालेला नसताना ती गूढ रीतीने गर्भवती राहिल्यामुळे सुरुवातीपासूनच लोकांनी तिच्याविषयी गैरसमज करून घेतले आणि तिची थट्टा केली. तिचे आपल्या पुत्रावर परिपूर्ण प्रेम होते आणि तो मोठा होत असताना त्याच्या भवितव्याच्या चिंतेने तिला वेदना होत होत्या. अनेकांनी त्याच्यावर प्रेम केले, तर इतरांनी त्याचा छळ केला, हे तिने पाहिले. त्याच्यावर चालवलेल्या खटल्याचा फार्स आणि त्याला क्रूसावर खिळले जाणे, हेही तिने पाहिले.

पण आता त्यांच्या जीवनाचा विचार करा. आता ते स्वर्गातून अनुक्रमे सर्व संतांची गौरवशाली राणी आणि विश्वाचा राजा म्हणून राज्य करतात. आता ते अनंतकाळ गौरवात जगत आहेत. त्यांच्या दुःखाचे परिपूर्ण आनंदात रूपांतर झाले आहे.

आज तुमच्या स्वतःच्या जीवनातील परीक्षांवर चिंतन करा. वर दिलेल्या पवित्र शास्त्राच्या उताऱ्यात, या परीक्षा श्रद्धेने सहन करणाऱ्यांना देव कोणते अभिवचन देतो, हे दिसून येते. आपल्या वाट्याला अन्यायकारक परिस्थिती आली आहे किंवा आपल्याला अन्यायाची वागणूक मिळाली आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर असा अनुभव घेणारे तुम्ही एकटे नाही; येशू आणि मरिया यांनीही तो घेतला आहे. महत्त्वाची गोष्ट ही की, देवाच्या कृपेने आणि सन्मानाने या जीवनाची वाट चालत राहावे. जीवनातील परीक्षा किंवा वेदना यांमुळे खचून जाऊ नका. देवाने तुमच्यासाठी ठरवलेल्या मार्गावर तुम्ही विश्वासू राहून चालत राहिलात, तर शेवटी तुम्हाला आनंद होईल, हे लक्षात ठेवा. हे निश्चित आहे. ही आशा घट्ट धरून ठेवा आणि अंतिम ध्येयावर लक्ष ठेवा. शेवटी या प्रयत्नांचे सार्थक होईल.

हे प्रभू, माझ्या वेदना आणि माझी ओझी मी तुला अर्पण करतो. ती मी तुझ्या क्रूसाशी जोडतो. माझ्या जीवनाच्या वाटचालीत प्रत्येक प्रसंगी तू माझ्याबरोबर असशील, असा मला विश्वास आहे. माझे लक्ष ध्येयावर राहो आणि तुझ्या अढळ प्रेमात मला आनंद लाभो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पवित्र आत्म्याची नोव्हेना
पेन्टेकॉस्टच्या तयारीसाठी म्हटली जाणारी प्रार्थना
पहिला दिवस – शुक्रवार, 22 मे

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आजची संत – कॅशियाची संत रीटा

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

चित्र: एलिझाबेत्ता सिरानी यांचे ‘कुमारी मरिया आणि बाळ येशू’