2 मे 2021
पुनरुत्थानकाळातील पाचवा रविवार (वर्ष ब)
आजची वाचने
“मी द्राक्षवेल आहे, तुम्ही तिच्या फांद्या आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि ज्याच्यामध्ये मी राहतो, त्याला पुष्कळ फळ येईल, कारण माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही.” योहान 15:5
किती मोजक्या शब्दांत किती मोलाची आठवण… “माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही.”
हे ऐकून सुरुवातीला आपल्याला वाईट वाटू शकते. आपल्या अहंकाराला ठेच लागू शकते आणि ही गोष्ट स्वीकारायला आपले मन तयार होणार नाही. हे खरे आहे का? देवाशिवाय आपण खरोखरच काहीही करू शकत नाही का? याचे उत्तर अर्थातच “होय” असे आहे. येशू खोटे बोलत नाही. आपल्या जीवनात देवाशिवाय आपण काहीही करू शकत नाही.
खरे तर, देवाला क्षणभर जरी आपला विसर पडला, तरी आपले अस्तित्वच नाहीसे होईल. आपण अस्तित्वात असावे अशी देवाची इच्छा आहे, म्हणूनच आपण अस्तित्वात आहोत. आणि चांगले काम करणे, इतरांच्या जीवनात चांगला बदल घडवणे, फलदायी जीवन जगणे या सगळ्यांचा विचार केला, तर देवाच्या कृपेशिवाय आपण काहीही चांगले करू शकत नाही.
सुरुवातीला हे ऐकणे कठीण वाटले, तरी आपण यावर नियमितपणे चिंतन केले पाहिजे. आपण असे चिंतन केले आणि हे सत्य मनापासून स्वीकारले, तर आपल्या अंतःकरणात दोन बदल घडतील. पहिला म्हणजे आपली नम्रता वाढेल. आपण जोपासू शकतो असा सर्वांत महत्त्वाचा सद्गुण म्हणजे नम्रता. तिला “सर्व सद्गुणांची जननी” म्हटले जाते, कारण इतर सर्व सद्गुण तिच्यातूनच उगम पावतात. देवच सर्वस्व आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून आहोत, हे ओळखणे म्हणजे नम्रता. नम्रतेने हे सत्य स्वीकारल्याने आपल्याला प्रत्येक गोष्टीत देवाचा शोध घेता येईल आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागात त्याला मनापासून आमंत्रित करता येईल.
देवाशिवाय आपण काहीही करू शकत नाही हे उमगल्यावर आपल्या अंतःकरणात आणखी एक बदल घडेल: आपली कृतज्ञता वाढेल. देवच सर्वस्व आहे आणि आपल्या जीवनात तो आपल्याला सतत कृपा देत असतो, हे जेव्हा आपल्या लक्षात येऊ लागेल, तेव्हा “देवा, तुझे आभार!” हीच आपली योग्य प्रतिक्रिया असेल. जे काही चांगले आहे ते त्याचीच देणगी आहे, हे उमगल्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानू.
आज नम्रता आणि कृतज्ञता यांविषयीच्या या सत्यांवर चिंतन करा आणि ती मनात खोलवर रुजू द्या. असे करताना, या सद्गुणांना तुमच्या जीवनात अधिक फळ येऊ द्या.
हे प्रभू, तुझ्याशिवाय मी काहीही करू शकत नाही, यावर माझा विश्वास आहे. हा विश्वास आणखी दृढ होण्यासाठी मला मदत कर आणि त्याबरोबर माझी नम्रता व कृतज्ञताही वाढू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – संत अथानासियुस, बिशप आणि चर्चचे धर्माचार्य
यंदा हा दिवस रविवारी येत असल्याने उपासनेत त्यांचे स्मरण साजरे केले जात नाही
वरील चित्रे: ख्रिस्त, खरी द्राक्षवेल.





