3 ऑक्टोबर 2021
सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार, वर्ष ब
आजची वाचने

“पण सृष्टीच्या आरंभापासूनच देवाने त्यांना पुरुष आणि स्त्री असे घडवले. म्हणून पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी एकरूप होईल आणि ते दोघे एकदेह होतील. त्यामुळे ते आता दोघे नाहीत, तर एकदेह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते कोणत्याही मनुष्याने वेगळे करू नये.” मार्क 10:6–9
“आरंभापासून” या शब्दांत आपल्या काळासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. देवाने आपल्याला दिलेल्या केवळ अलौकिक देणग्यांचीच नव्हे, तर नैसर्गिक देणग्यांचीही जाणीव श्रद्धावंतांना असणे महत्त्वाचे आहे. ख्रिस्ताच्या क्रुसाद्वारे आपल्याला मिळालेल्या सर्व देणग्या या अलौकिक देणग्या आहेत. त्याचे जीवन, मरण आणि पुनरुत्थान यांद्वारे स्वर्गातून आपल्यावर कृपेचा वर्षाव झाला आणि पावित्र्य, तारण व स्वर्गप्राप्ती शक्य झाली. पण देवाने आपल्याला दिलेली आणखी एक, अगदी वेगळ्या प्रकारची ‘देणगी’ आहे, जी आपण अनेकदा गृहीत धरतो. ती म्हणजे निसर्गाची देणगी.
सृष्टी स्वतः, विश्वाची सुव्यवस्था, आपले मनुष्यत्व आणि देवाने घडवलेली नैसर्गिक रचना या सर्व देणग्या आहेत. निसर्गातील रहस्ये आणि गूढ गोष्टी उलगडण्यात विज्ञान बरीच मदत करू शकते. तरीही, निसर्गाचे पूर्ण आकलन होणे हीसुद्धा एक गूढ, सखोल आणि विस्मयकारक गोष्ट आहे.
आपली लैंगिकता हा देवाने आपल्याला दिलेल्या नैसर्गिक जगाचा एक पैलू आहे. “देवाने त्यांना पुरुष आणि स्त्री असे घडवले…” ही नैसर्गिक रचना सृष्टीकर्त्याच्या गौरवशाली प्रज्ञेचा आविष्कार आहे. ती पूर्णपणे समजून घेतली पाहिजे, तिच्यावर प्रेम केले पाहिजे आणि तिचा आदर केला पाहिजे. ‘पुरुष आणि स्त्री’ असणे ही सहज लक्षात येणारी आणि स्वाभाविकपणे समजणारी गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीत काही गुण, इच्छा, प्रवृत्ती वगैरे असतात, जे ती व्यक्ती पुरुष किंवा स्त्री असण्याशी स्वाभाविकपणे जोडलेले असतात.
विशेषतः आपल्या काळात, स्त्री आणि पुरुष यांचे वेगळेपण आणि ते एकमेकांना पूरक असणे यांवर अनेक प्रकारे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत; कधी कधी तर त्यांकडे दुर्लक्षही केले गेले आहे. पण मनाच्या खोलवर आपल्या सर्वांना हे समजते की स्त्री किंवा पुरुष असणे हा आपण कोण आहोत याचा एक भाग आहे. व्यक्ती म्हणून आपल्या ओळखीचा तो अविभाज्य भाग आहे आणि त्यातून आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतात. स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांनाही कधी कधी विकृत रूप येऊ शकते आणि त्यांच्याविषयी गोंधळ निर्माण होऊ शकतो. पण आपल्या व्यक्तित्वाची ही मूलभूत वैशिष्ट्ये झुगारून देता येत नाहीत किंवा नाकारताही येत नाहीत. खरे तर, स्वभावतः आपण जे आहोत त्याचा स्वीकार करणे म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणे. अशा स्वीकारामुळे आपल्या निसर्गदत्त स्वभावाशी खऱ्या अर्थाने एकनिष्ठ राहण्याच्या वाटेवर आपल्याला पुढे जाता येते.
आज चिंतन करा: ‘पुरुष आणि स्त्री’ असणे हे किती प्रकारे देवाकडून मिळालेले नैसर्गिक आशीर्वाद आहेत. आजच्या जगात या नैसर्गिक देणग्यांवर कशा प्रकारे प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्यांचे महत्त्व कसे कमी केले जाते, यावरही चिंतन करा. तुम्ही जे आहात त्याचा स्वीकार करा, देवाने तुम्हाला जसे घडवले आहे तसे स्वतःला स्वीकारा आणि देवाची ही नैसर्गिक देणगी तुमच्या जीवनात बहरू द्या.
हे प्रभू, तुझ्या अगणित देणग्यांबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझ्या क्रुसाद्वारे तू मिळवून दिलेल्या कृपेच्या देणगीबद्दल, निसर्गाच्या देणगीबद्दल आणि तू मला ज्या प्रकारे घडवलेस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझ्या योजनेनुसार माझ्या संपूर्ण ओळखीचा स्वीकार करण्यास मला मदत कर आणि असा स्वीकार करताना माझी स्वतःची प्रतिष्ठा मला अधिकाधिक उमगत जाऊ दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन
वरील प्रमुख चित्र: एदेन बागेतील आदाम आणि हव्वा, फ्लिकरवरून




