मराठी

आपली धन्य माता: विनामोल लाभलेली देणगी

बुधवार, 8 डिसेंबर 2021

धन्य कुमारी मरियेच्या निष्कलंक गर्भसंभवाचा महोत्सव

आजची वाचने

व्हिडिओ

मरिया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी आहे. आपल्या वचनाप्रमाणे माझ्या बाबतीत घडो.” लूक 1:38a

महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! आज आनंदोत्सवाचा दिवस आहे! आज आपण आपल्या धन्य मातेच्या गौरवशाली आणि चमत्कारमय निष्कलंक गर्भधारणेचा सन्मान करतो. हे देवाच्या अपार दयेचे कृत्य आहे.

मरियेच्या निष्कलंक गर्भसंभवाकडे अपार दयेचे कृत्य म्हणून पाहणे योग्य आहे. असे का? या महासणाचा दयेशी इतका जवळचा संबंध कशामुळे आहे?

दया ही देवाने विनामोल दिलेली देणगी आहे. ‘विनामोल’ म्हणजे ती आपल्या पात्रतेमुळे मिळत नाही, किंवा आपण ती कमावतही नाही. देव आपल्याला दया देण्यास बांधील नाही. तसे असते, तर ती दया ठरली नसती; तो आपला हक्क ठरला असता. पण दयेवर आपला हक्क नाही. देव ती स्वेच्छेने आणि भरभरून देतो.

निष्कलंक गर्भधारणेच्या या गौरवशाली महोत्सवात आपण जे साजरे करतो, ती विनामोल देणगी आहे, हे दोन दृष्टींनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. पहिले म्हणजे, ‘निष्कलंक गर्भधारण’ याचा अर्थ असा की, देवाने धन्य कुमारी मरियेला तिच्या गर्भधारणेच्या क्षणापासूनच पापरहित असे घडवले. ज्याला आपण ‘पूर्वगामी कृपा’ म्हणतो, त्या कृपेने हे घडले. तिला ही कृपा देणे हे देवाच्या परिपूर्ण, विनामोल दयेचे कृत्य आहे. मरियेने ही कृपा कमावली नव्हती, किंवा स्वतःच्या पात्रतेने ती मिळवली नव्हती. उलट, आपल्या चांगुलपणामुळे देवाने तिला मूळ पापाविना निर्माण करण्याचे ठरवले, जेणेकरून तिच्या रूपाने देवपुत्राला जगात येण्यासाठी योग्य माध्यम लाभावे. मरियेनेही ही देणगी खुल्या मनाने स्वीकारली आणि आयुष्यभर आपल्या स्वतंत्र इच्छेने पापरहित राहण्याची निवड सतत केली.

दुसरे म्हणजे, देवाने आपल्या धन्य मातेला निष्कलंक असे निर्माण केले, पण तिला केवळ स्वतःपुरते ठेवले नाही. तिच्याबाबतीत त्याने स्वार्थ दाखवला नाही. उलट, आपल्या सृष्टीतील या परिपूर्ण व्यक्तीला त्याने आपलीही माता केले. देवाच्या कृपेच्या आणि दयेच्या व्यवस्थेत निष्कलंक माता मरिया आता आपली आध्यात्मिक माता आहे. हेही आपल्या प्रेमळ देवाच्या परिपूर्ण, विनामोल दयेचे कृत्य आहे. अशी आध्यात्मिक माता आणि रक्षणकर्ती लाभण्यास आपण पात्र नाही, तरीही ती आपल्याला लाभली आहे. एका परिपूर्ण मातेप्रमाणे ती सदैव आपल्यासाठी मध्यस्थी करते आणि देवाकडून आपल्याला अनेक कृपादाने मिळवून देते.

देवाच्या दयेच्या या दुहेरी, विनामोल देणगीवर आज चिंतन करा: 1) दयेपोटी त्याने मरियेला निष्कलंक असे निर्माण केले आणि 2) तिला आपली माता आणि राणी म्हणून आपल्याला दिले. आज आणि वर्षभर तिच्या मायेचा आधार मागा!

हे माझ्या परमप्रिय माते, माझ्या राणी, तू देवाची एक निर्मिती असलीस, तरी सर्व बाबतींत परिपूर्ण आहेस. तुझे सौंदर्य आणि पावित्र्य मी न्याहाळतो. देवाने तुला ही अद्वितीय कृपा विनामोल दिली आणि तू त्या कृपेला पूर्ण सहकार्य केलेस. तुझ्या मायेवर आणि काळजीवर मी सदैव विसंबून राहावे, आणि पित्याच्या योजनेनुसार तू माझ्यावर देवाची कृपा बरसवावी म्हणून मी सदैव मन उघडे ठेवावे. हे परमप्रिय माते, तू आम्हा सर्वांना विनामोल लाभलेली दयेची देणगी आहेस! हे मरिये माते, माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

आगमनकाळासाठीचे आमचे सर्व साहित्य पाहा

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आपल्या धन्य मातेला प्रार्थना

अधिक वाचन – परमधन्य कुमारी मरियेच्या निष्कलंक गर्भसंभवाचा महासण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील चित्र: निष्कलंक गर्भसंभव, चित्रकार पीटर पॉल रुबेन्स, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने