मराठी

धन्य माते, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

गुरुवार, 8 सप्टेंबर 2022

धन्य कुमारी मरियेच्या जन्माचा सण

आजची वाचने

व्हिडिओ

“पाहा, कुमारी गर्भवती होईल व एका पुत्राला जन्म देईल, आणि ते त्याचे नाव इम्मानुएल ठेवतील.” मत्तय 1:23

वाढदिवस साजरे करायला आपल्या सर्वांनाच आवडते. आज आपण आपल्या लाडक्या मातेचा वाढदिवस साजरा करतो. डिसेंबरमध्ये आपण तिच्या निष्कलंक गर्भधारणेचा सण साजरा करतो. जानेवारीत आपण देवाची माता म्हणून तिचा गौरव करतो. ऑगस्टमध्ये तिला शरीर आणि आत्म्यासह स्वर्गात घेतले गेल्याचा सण आपण साजरा करतो. वर्षभरात इतरही अनेक दिवशी आपण तिच्या जीवनातील एखाद्या विशेष पैलूचा गौरव करतो. पण आज आपण फक्त तिचा वाढदिवस साजरा करतो!

तिचा वाढदिवस साजरा करताना आपण ती जशी आहे तसा तिचा गौरव करतो. आज तिच्या जीवनातील एखाद्या आगळ्या, सुंदर आणि गहन पैलूवर लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही. तिने जे काही साध्य केले, देवाला तिने दिलेला पूर्ण ‘होकार’, स्वर्गातील तिचा राज्याभिषेक, तिला स्वर्गात घेतले जाणे किंवा अशा इतर कोणत्याही विशिष्ट गोष्टींवर आज लक्ष देण्याची गरज नाही. तिच्या जीवनातील प्रत्येक पैलू गौरवशाली, सुंदर आणि विस्मयकारक आहे; प्रत्येकाचा स्वतंत्र सण आणि सोहळा साजरा करावा, इतका तो मोलाचा आहे.

पण आज आपण आपल्या धन्य मातेचा आनंद साजरा करतो, तो केवळ यासाठी की देवाने तिला निर्माण केले आणि या जगात आणले. आनंद साजरा करण्यासाठी एवढे कारणही पुरेसे आहे. आपण तिचा सन्मान करतो, कारण आपले तिच्यावर प्रेम आहे. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो आणि जिची काळजी घेतो, तिचा वाढदिवस जसा साजरा करू, तसाच आपण आपल्या मातेचा वाढदिवस साजरा करतो.

मरिया माता तुमची आई आहे, या सत्यावर आज मनन करा. ती खरोखरच तुमची आई आहे. आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस जसा साजरा कराल, तसाच तिचाही वाढदिवस साजरा करा. आज मरियेचा सन्मान केल्याने तिच्याशी असलेले तुमचे नाते अधिक दृढ होते आणि तिला तुमच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असावे, अशी तुमची इच्छा आहे, याची तुम्ही तिला खात्री देता.

धन्य माते, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे!

हे कृपापूर्ण मरिये, तुला प्रणाम. प्रभू तुझ्याबरोबर आहे.  स्त्रियांमध्ये तू धन्य आहेस आणि तुझ्या उदराचे फळ येशू धन्य आहे.  हे पवित्र मरिये, देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मृत्यूच्या वेळी प्रार्थना कर.  आमेन.  हे प्रिय येशू, आमची माता निष्कलंक कुमारी मरिया हिच्या हृदयाद्वारे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो!

दुःखित मातेची नवसाधना
परंपरेनुसार ही प्रार्थना 7–15 सप्टेंबरदरम्यान केली जाते
दुसरा दिवस—8 सप्टेंबर

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आजचा सण –  धन्य कुमारी मरियेचा जन्म

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

चित्र: बार्तोलोमे एस्तेबान मुरियो यांचे ‘कुमारी मरियेचा जन्म’ हे चित्र, विकिमीडिया कॉमन्सवरून