7 सप्टेंबर 2022
सामान्य काळातील तेविसाव्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने

“जे तुम्ही गरीब आहात, ते तुम्ही धन्य आहात…
जे तुम्ही आता भुकेले आहात, ते तुम्ही धन्य आहात…
जे तुम्ही आता रडत आहात, ते तुम्ही धन्य आहात…
लोक तुमचा द्वेष करतात, तेव्हा तुम्ही धन्य आहात…
त्या दिवशी आनंद करा आणि आनंदाने उड्या मारा!” (पाहा लूक 6:20-23)
वरची वचने छपाईच्या चुकीमुळे अशी दिसतात का? येशू खरोखरच असे म्हणाला का?
सुरुवातीला ही धन्यवचने आपल्याला बुचकळ्यात टाकू शकतात. आणि त्यांनुसार जगण्याचा प्रयत्न केला, तर ते फार कठीण वाटू शकते. गरीब आणि उपाशी असण्यात धन्यता ती कसली? रडणारी आणि लोकांच्या द्वेषाला सामोरी जाणारी व्यक्ती धन्य कशी? हे प्रश्न कठीण आहेत, पण त्यांची उत्तरे परिपूर्ण आहेत.
खरे तर, देवाच्या इच्छेनुसार प्रत्येक धन्यवचन आपण पूर्णपणे स्वीकारले, तर त्याचे फल गौरवशाली असते. दारिद्र्य, भूक, दुःख आणि छळ हे स्वतःत आशीर्वाद नाहीत. पण ते आपल्या वाट्याला येतात, तेव्हा देवाकडून असा आशीर्वाद मिळण्याची संधी मिळते, जो त्या संकटामुळे सुरुवातीला भोगाव्या लागणाऱ्या कोणत्याही कष्टांपेक्षा कितीतरी मोठा असतो.
दारिद्र्यामुळे इतर सर्व गोष्टींपेक्षा स्वर्गाच्या संपत्तीचा शोध घेण्याची संधी मिळते. भूक माणसाला देवाकडून मिळणाऱ्या अन्नाचा शोध घ्यायला प्रवृत्त करते; ते अन्न जग देऊ शकते त्यापेक्षा कितीतरी अधिक आधार देते. स्वतःच्या किंवा इतरांच्या पापांमुळे आपण रडतो, तेव्हा ते अश्रू आपल्याला न्याय, पश्चात्ताप, सत्य आणि दया यांचा शोध घ्यायला मदत करतात. ख्रिस्तामुळे आपला छळ होतो, तेव्हा आपली श्रद्धा शुद्ध होण्याची आणि देवावर असा भरवसा ठेवण्याची संधी मिळते की आपण आशीर्वादांनी आणि आनंदाने भरून जातो.
सुरुवातीला धन्यवचने आपल्याला समजत नाहीत असे वाटू शकते. ती आपल्या मानवी बुद्धीच्या विरुद्ध आहेत, असे नाही. उलट, ती आपल्या बुद्धीला सहज समजते त्यापलीकडे जातात आणि श्रद्धा, आशा व प्रेम यांनी भरलेले एक नवे जीवन जगण्यास आपल्याला समर्थ करतात. देवाचे ज्ञान आपल्या मर्यादित मानवी आकलनाच्या कितीतरी पलीकडे आहे, हे ती आपल्याला शिकवतात.
आध्यात्मिक जीवनातील या अत्यंत गहन शिकवणींमधून प्रकट होणाऱ्या देवाच्या अद्भुत ज्ञानावर आज चिंतन करा. निदान एवढ्या गोष्टीवर तरी विचार करा की देवाचे ज्ञान तुमच्या ज्ञानापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. तुमच्या जीवनातील एखादी वेदनादायक आणि कठीण गोष्ट समजून घेणे तुम्हाला अवघड जात असेल, तर हे लक्षात ठेवा: तुम्ही देवाच्या ज्ञानाचा शोध घेतला, तर त्याच्याकडे उत्तर आहे.
हे प्रभू, जीवनातील अनेक आव्हानांत आणि हालअपेष्टांत दडलेले आशीर्वाद शोधायला मला मदत कर. माझ्या जीवनातील क्रूसांकडे अनिष्ट म्हणून पाहण्याऐवजी, त्यांचे रूपांतर घडवणारा तुझा हात मला दिसू दे आणि सर्व गोष्टींत तुझी कृपा अधिक विपुलपणे ओतली जात असल्याचा अनुभव मला येऊ दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
दुःखी मातेची नोव्हेना
परंपरेनुसार 7–15 सप्टेंबर या काळात केली जाणारी प्रार्थना
पहिला दिवस—7 सप्टेंबर
चित्र: ‘धन्य आहात’ असा उपदेश करताना ख्रिस्त, फ्लिकरवरून




