मराठी

ख्रिस्ताची शांती

९ मे २०२३
पुनरुत्थान काळातील पाचव्या आठवड्याचा मंगळवार
आजची वाचने

व्हिडिओ

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हांला शांती देऊन जातो; माझी शांती मी तुम्हांला देतो. जग जशी देते, तशी मी तुम्हांला देत नाही.” योहान 14:27

मग येशू तुम्हांला देतो ती शांती आणि जग देते ती वरवरची शांती यांत काय फरक आहे? आपल्या सर्वांनाच जीवनात शांती हवी असते. अंतःकरणात शांती असावी, ही ओढ आपल्या स्वभावातच रुजलेली आहे. तरीही अनेक जण असे निर्णय घेतात की त्यामुळे त्यांच्या मनात अस्वस्थता, इतकेच नव्हे तर गोंधळही निर्माण होतो. खरे समाधान कशाने मिळते याबद्दलच्या गैरसमजातूनच बहुतेकदा ते असे निर्णय घेतात.

उदाहरणार्थ, अमली पदार्थांचे किंवा मद्याचे व्यसन जोपासणाऱ्यांनी अनेकदा सुख मिळेल या चुकीच्या समजुतीतून सुरुवात केलेली असते. त्यातून क्षणभर दिलासा मिळतो आणि तेवढ्यापुरते बरे वाटते. पण नीट पाहिले तर हे स्पष्ट होते की अशा कृतींतून मिळणारी क्षणिक “शांती” शेवटी त्यांना ज्या सुखाची ओढ आहे, त्यापासूनच वंचित करते. आणि अशा निवडींचे व्यसनात रूपांतर झाले की, ती व्यक्ती अनेकदा अशा दुष्टचक्रात अडकते की तिची अवस्था अधिकाधिक बिघडत जाते.

जीवनात समाधान आणि परिपूर्ती मिळवण्यासाठी लोक आणखी कितीतरी मार्ग शोधतात. पैसा, स्वैर लैंगिक संबंध, लबाडी, स्वार्थी वागणूक, राग आणि फसवणूक अशा गोष्टींचा आधार घेताना त्यांना त्यांतून काहीतरी समाधान मिळेल अशी आशा असते. या फसव्या कृतींचे खरे स्वरूप आणि त्यांचे परिणाम ओळखणे, हे आपले रोजचे ध्येय असले पाहिजे. “जग” आपल्याला ज्या अनेक मार्गांनी शांती देऊ करते, त्यांपैकी हे काही मार्ग आहेत.

जीवनातील खऱ्या आनंदाचा विचार केला तर, अंतःकरणातील खरी शांती हे देवाचे असे वरदान आहे की त्यावरून आपण योग्य मार्गावर आहोत आणि योग्य निर्णय घेत आहोत, हे अगदी स्पष्टपणे कळते. दिवसेंदिवस देवाच्या इच्छेनुसार वागण्याची निवड करणे कठीण जाऊ शकते आणि त्यासाठी सुरुवातीला बराच त्याग करावा लागू शकतो. प्रेम करणे कठीण असू शकते. देवाच्या नैतिक नियमाशी निष्ठावान राहणे आव्हानाचे ठरू शकते. पापाला नकार देणेही कठीण असते. पण दररोज दिवसभर देवाच्या इच्छेनुसार वागण्याची निवड करत राहिलो, तर ख्रिस्ताच्या शांतीचे वरदान आपल्या अंतःकरणात फुलू लागेल. ती शांती आपल्याला दिलासा आणि आधार देईल.

खरी शांती आपल्याला बळ देते. ती अंतःकरणात सच्चेपणा आणि एकसंधपणा आणते. ती आपल्या विचारांना स्पष्टता देते आणि आपल्या धारणांबद्दलची खात्री दृढ करते. देवाची शांती आणखी शांती निर्माण करते. तिच्यामुळे आपण विचारपूर्वक प्रेमाने वागण्याची निवड करतो. शांती आपल्याला देवाच्या इच्छेकडे नेते आणि देवाची इच्छा आपल्याला शांतीकडे नेते. हे चक्र जसजसे चालू राहते, तसतसा त्याचा परिणाम कितीतरी पटींनी वाढतो. जीवनात आनंद कुठे शोधावा हे दाखवणाऱ्या सर्वांत स्पष्ट खुणांपैकी ही एक आहे.

आज तुमच्या अंतःकरणात खरोखर शांती आहे का, यावर चिंतन करा. तुमच्या आत्म्यात देवाचे शांत, सामर्थ्यशाली आणि आधार देणारे सान्निध्य तुम्हांला जाणवते का? तुमच्या रोजच्या निवडींमुळे तुमचे अंतःकरण अधिक सच्चे होते का आणि तुमचे विचार अधिक स्पष्ट होतात का? जीवनातील सर्वांत मोठ्या आव्हानांना तोंड देतानाही तुम्ही आनंदी आणि शांत असता का? या शांतीचा शोध घ्या, कारण तसे करताना तुमच्या अंतःकरणात हे गौरवशाली वरदान फुलवणाऱ्या परमदयाळू देवाचाच तुम्ही शोध घेत असाल.

हे खऱ्या शांतीच्या प्रभू, तू आणि तुझी पवित्र इच्छा हाच माझ्या जीवनातील सर्व आकांक्षांना खऱ्या अर्थाने पूर्णत्व देणारा एकमेव मार्ग आहे. माझ्या चुकीच्या निवडींमुळे अस्वस्थता आणि गोंधळ निर्माण होतो, तेव्हा संपूर्ण अंतःकरणाने तुझ्याकडे वळण्यास मला मदत कर. ज्या भ्रमांशी माझा संघर्ष चालू आहे, त्यांचे खरे स्वरूप मला दाखव आणि केवळ तुझाच व तुझ्या शांतीचाच शोध घेण्यासाठी लागणारे बळ मला दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पुनरुत्थानकाळातील प्रार्थना

पुनरुत्थानकाळासाठी पवित्र शास्त्रावरील मनन

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वर दिलेली प्रमुख चित्रे: हाइनरिख होफमान यांचे “ख्रिस्ताची प्रतिमा” हे चित्र, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने,


  Subscribe to our YouTube channel  
  to be notified about new content.