मराठी

गौरवमय रूपांतर

28 फेब्रुवारी 2021
प्रायश्चित्तकाळातील दुसरा रविवार (वर्ष ब)
आजची वाचने

व्हिडिओ आवृत्ती

येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना सोबत घेतले आणि त्यांना एका उंच डोंगरावर एकांतात नेले. त्यांच्यादेखत त्याचे रूपांतर झाले आणि त्याची वस्त्रे इतकी लखलखीत पांढरी झाली की पृथ्वीवरचा कोणताही परीट ती इतकी पांढरी करू शकला नसता. मार्क 9:2–3

येशूच्या अनेक शिकवणी स्वीकारणे पुष्कळांना कठीण गेले. आपल्या शत्रूंवर प्रेम करावे, आपला क्रूस उचलून त्याच्यामागे चालावे आणि दुसऱ्यासाठी आपला जीव द्यावा या त्याच्या आज्ञा, तसेच परिपूर्ण होण्याचे त्याचे आवाहन पाळणे सोपे नव्हते. म्हणून शुभवर्तमानातील आव्हाने स्वीकारण्यास आपल्या सर्वांना मदत व्हावी यासाठी येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना निवडले आणि तो खरोखर कोण आहे याची त्यांना थोडीशी झलक दाखवली. त्याने त्यांना आपल्या महानतेचे आणि गौरवाचे दर्शन घडवले. ते दृश्य त्यांच्या मनात नक्कीच कोरले गेले असेल. आपल्या प्रभूने त्यांच्यासमोर ठेवलेल्या पवित्र अपेक्षांमुळे जेव्हा जेव्हा त्यांना खचून जाण्याचा किंवा आशा सोडून देण्याचा मोह झाला, तेव्हा त्या दृश्याने त्यांना नक्कीच आधार दिला असेल.

रूपांतरापूर्वी येशूने आपल्या शिष्यांना काय शिकवले होते, ते आठवा. त्याला दुःख सहन करावे लागेल आणि मरण पत्करावे लागेल, आणि त्यांनीही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालले पाहिजे, असे त्याने त्यांना सांगितले होते. म्हणून येशूने त्यांना आपल्या अकल्पनीय गौरवाची थोडीशी अनुभूती दिली. देवाच्या गौरवाची आणि तेजाची खरोखर कल्पनाही करता येत नाही. त्याचे सौंदर्य, भव्यता आणि तेज आपल्या आकलनापलीकडचे आहे. स्वर्गातही, जेव्हा आपण येशूला समोरासमोर पाहू, तेव्हा देवाच्या गौरवाचे ते अगम्य रहस्य आपण अनंतकाळ अधिकाधिक खोलवर अनुभवत राहू.

त्या तीन प्रेषितांना जसे त्याच्या गौरवाचे दर्शन घडले, तसे दर्शन घेण्याचे भाग्य आपल्याला लाभलेले नाही. तरी त्यांच्या अनुभवाचे फळ आपल्यालाही मिळावे म्हणून तो अनुभव आपल्याला चिंतनासाठी दिला आहे. ख्रिस्ताचा गौरव आणि तेज ही केवळ डोळ्यांना दिसणारी गोष्ट नसून मूलतः एक आध्यात्मिक वास्तव आहे. म्हणून तो आपल्यालाही आपल्या गौरवाची झलक दाखवू शकतो. जीवनात कधी कधी येशू आपले सांत्वन करतो आणि तो कोण आहे याची स्पष्ट जाणीव आपल्या अंतःकरणात जागवतो. विशेषतः आपण स्वतःसाठी काहीही राखून न ठेवता त्याच्यामागे चालण्याचा ठाम निर्णय घेतो, तेव्हा तो प्रार्थनेतून स्वतःची ओळख आपल्याला करून देतो. असा अनुभव रोज येईलच असे नाही; पण श्रद्धेद्वारे ही देणगी तुम्हाला कधी लाभली असेल, तर जीवनात कठीण प्रसंग येतात तेव्हा तिची आठवण करा.

आज स्वर्गात आपल्या गौरवाच्या पूर्ण तेजाने झळकणाऱ्या येशूचे चिंतन करा. जेव्हा निराशेला किंवा शंकेला बळी पडण्याचा मोह होतो, किंवा येशू आपल्याकडून फारच जास्त अपेक्षा करतो असे वाटते, तेव्हा त्याचे ते तेजस्वी रूप आठवा. येशू खरोखर कोण आहे, याची स्वतःला पुन्हा आठवण करून द्या. त्या प्रेषितांनी काय पाहिले आणि काय अनुभवले, याची कल्पना करा. त्यांचा अनुभव तुम्हीही आपलासा करा, म्हणजे आपला प्रभू जिथे नेईल तिथे त्याच्यामागे जाण्याची निवड तुम्हाला दररोज करता येईल.

हे माझ्या प्रभू, तुझे गौरवमय रूप माझ्या आकलनापलीकडचे आहे. तुझा गौरव आणि तुझे तेज माझ्या कल्पनेतही मावू शकत नाहीत. माझ्या अंतःकरणाची दृष्टी सदैव तुझ्यावर खिळलेली राहू दे. निराश होण्याचा मोह मला होतो तेव्हा तुझ्या रूपांतराच्या स्मरणातून मला बळ मिळू दे. हे माझ्या प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझी सारी आशा मी तुझ्यावर ठेवतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

क्रुसाच्या पायथ्याशी 40 दिवस – अकरावे चिंतन – वनवासातील जीवन

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावर आधारित चिंतने

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील चित्र: पीटर पॉल रुबेन्स यांचे ‘ख्रिस्ताचे रूपांतर’