मराठी

या आगमनकाळात आपल्या पापांचा पश्चात्ताप करा

14 डिसेंबर 2019
आगमनकाळाच्या दुसऱ्या आठवड्यातील शनिवार 
आजची वाचने

संत जॉन ऑफ द क्रॉस, धर्मगुरू व धर्मसभेचे विद्वान—स्मृतिदिन

“मी तुम्हांला सांगतो की एलिया आधीच आला आहे; पण त्यांनी त्याला ओळखले नाही आणि त्याच्याशी मन मानेल तसे वागले. त्याचप्रमाणे मानवपुत्रालाही त्यांच्या हातून दुःख सोसावे लागेल.” तेव्हा येशू बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाविषयी बोलत होता, हे शिष्यांना समजले. मत्तय 17:12-13

बाप्तिस्मा देणाऱ्या संत योहानाविषयी आपण चिंतन करत राहतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की त्याने एलियाची भूमिका पार पाडली, हे शास्त्र्यांना उमगले नाही. प्रभूचा मार्ग तयार करण्याचे एलियाचे कार्य योहान करत होता, हे त्यांना दिसले नाही.

ख्रिस्ताच्या आगमनाची तयारी करण्यात योहानाची भूमिका अनन्य व निर्णायक होती. त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या निरंतर आगमनाची तयारी करण्यात आपल्यापैकी प्रत्येकाचीही एक भूमिका आहे. येशू एकदा अनेक वर्षांपूर्वी आला, पण आपल्या जीवनात येत राहण्याची त्याची इच्छा आहे. आपण त्याच्यासाठी योग्य तयारी केली, तरच तो येऊ शकतो.

तुम्ही “प्रभूचा मार्ग” कसा तयार करता? बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचे कार्य तुम्ही पुढे कसे चालवता? विशेषतः आगमनकाळात योहानाचा मुख्य संदेश मनावर घेऊन तुम्ही हे करता. त्याचा मुख्य संदेश काय होता? आपल्या पापांचा पश्चात्ताप करा, असा त्याचा संदेश होता.

आपल्या पतित मानवी स्वभावामुळे आपण सर्वजण पापाशी झुंजतो. तरीही परिपूर्ण होण्यासाठी आपल्याला पाचारण केले आहे, हे आपण कधीही विसरू नये. स्वर्गातील पिता जसा परिपूर्ण आहे, तसे आपणही परिपूर्ण व्हावे, असे आपल्याला पाचारण आहे. आपली पापे ओळखण्यास, ती कबूल करण्यास आणि त्यांची आसक्ती सोडण्याचा प्रयत्न करण्यास आपल्याला पाचारण केले आहे.

हे करण्यासाठी वर्षातील सर्वांत महत्त्वाच्या काळांपैकी एक म्हणजे आगमनकाळ. या पवित्र काळात समेटाच्या संस्कारातून मिळणारी कृपा प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणे विशेष महत्त्वाचे आहे.

आपल्या पापांचा पश्चात्ताप करणे किती महत्त्वाचे आहे, हे स्वतःच्या आत्म्याला सांगण्याची तुमची किती तयारी आहे आणि तुम्ही ते किती इच्छेने कराल, यावर आज चिंतन करा. या पवित्र काळात पश्चात्तापाचा स्वीकार करणे, ही ख्रिस्ताच्या तुमच्या जीवनातील निरंतर आगमनाची तयारी करण्याची सर्वोत्तम वाट आहे.

हे प्रभू, या आगमनकाळात आम्ही अधिक खोलवर प्रवेश करत असताना माझे पाप मला दिसू दे. ज्या अनेक गोष्टी मला तुझ्यापासून दूर ठेवतात, त्यांची मला जाणीव होऊ दे आणि त्या मी मनापासून सोडून द्याव्यात म्हणून मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आगमनकाळासाठी उपयुक्त साहित्य

आजचे संत आणि सण