24 डिसेंबर 2019
आगमनकाळातील वारदिवस – सकाळचा मिस्सा
सकाळच्या मिस्साची वाचने

“बाळा, तुला परात्पर देवाचा संदेष्टा म्हणतील. कारण प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी तू त्याच्यापुढे जाशील आणि त्याच्या लोकांना त्यांच्या पापांच्या क्षमेद्वारे तारणाची जाणीव करून देशील. आपल्या देवाच्या कोमल करुणेमुळे स्वर्गातून उषःप्रभा आपल्यावर उजाडेल, अंधारात आणि मृत्यूच्या छायेत राहणाऱ्यांवर प्रकाश टाकील आणि आपली पावले शांतीच्या मार्गाकडे वळवील.” लूक 1:76-79
आपला पुत्र योहान याच्या जन्माविषयी श्रद्धा व्यक्त केल्यावर जखऱ्याची वाचा परत आली आणि त्याने हे स्तुतिगीत म्हटले. या स्तुतिगीतात तो देवाचा गौरव करतो. त्यातून त्याची श्रद्धाच नव्हे, तर त्या श्रद्धेचे फळही दिसून येते: स्वर्गीय पिता कशा प्रकारे कार्य करतो याची सखोल, स्पष्ट आणि अंतर्दृष्टीपूर्ण जाण, जी जखऱ्या नेमक्या शब्दांत व्यक्त करतो.
जखऱ्या अशी सत्ये सांगतो, जी त्याला केवळ श्रद्धेच्या देणगीमुळेच कळू शकली. गाब्रिएल देवदूतामुळे त्याची वाचा गेल्यानंतर त्याला दीर्घकाळ मौनात राहावे लागले. त्या मौनामुळेच त्याने आपल्यासमोर उलगडत असलेल्या रहस्याचा शोध घेतला, त्याविषयी ऐकले आणि ते समजून घेतले, यात फारशी शंका नाही. प्रभू येण्याआधी त्याचा मार्ग तयार करणारा हाच आपला लहानगा आहे, हे त्याला उमगले. जगाच्या तारणामध्ये या बाळाची संदेष्टा म्हणून असलेली अद्वितीय भूमिका त्याला समजली. उगवत्या सूर्याची चाहूल देणारी ‘पहाट’ म्हणून त्याने आपल्या पुत्राकडे पाहिले.
या दुःखाच्या महिन्यांत जखऱ्याच्या जीवनात बरेच काही घडले. प्रभूने त्याच्या अंतःकरणात कार्य केले आणि त्याला ही स्तुतीची प्रार्थना अर्पण करण्यास समर्थ केले. जगभरातील धर्मगुरू आणि व्रतस्थ स्त्री-पुरुष आजही ती दररोज गातात. ठेच लागल्यानंतर पुन्हा उभे राहून जखऱ्याने आपल्यावर सोपवलेले कार्य खरोखर पूर्ण केले.
आपल्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीतही असेच घडले पाहिजे. जखऱ्याला रागाच्या आणि निराशेच्या आहारी जाणे सहज शक्य होते. त्याची आशा सहज मावळली असती आणि देवाने आपल्याला सोडून दिले आहे असेही त्याला वाटले असते. पण तसे झाले नाही. देव आपल्या वचनाशी विश्वासू आहे, या भरवशावर तो वाट पाहत राहिला. आणि त्याची वेळ आली तेव्हा त्याने हे सुंदर, श्रद्धेने भरलेले स्तुतिगीत म्हटले.
जखऱ्याच्या श्रद्धेचे आणि चिकाटीचे अनुकरण तुम्ही कसे करावे, अशी देवाची इच्छा आहे, यावर आज चिंतन करा. त्याने शंका घेतली म्हणून त्याला कमी लेखणे सोपे आहे. पण देवाने तसे केले नाही. उलट, या स्तुतिगीताद्वारे युगानुयुगे देवाचा गौरव करण्याची संधी त्याने जखऱ्याला दिली. तुमच्या भूतकाळातील अपयशांतूनही देव कोणत्या प्रकारे कार्य करू इच्छितो, याचा शोध घ्या. ती अपयशे त्याला अर्पण करा. या पवित्र पुरुषाच्या उदाहरणाचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करताना देव तुमच्याद्वारे आपले सर्वसामर्थ्य प्रकट करील, असा भरवसा ठेवा.
हे प्रभू, माझा भूतकाळ आणि तुझ्यावर भरवसा ठेवण्यात मी जिथे जिथे कमी पडलो ते सारे मी तुला अर्पण करतो. माझा दुबळेपणा, माझा अहंकार आणि माझी हताशा मी तुझ्या हाती देतो. माझी सर्व पापे मी तुझ्या हाती सोपवतो आणि स्वतःला पूर्णपणे तुला समर्पित करतो, जेणेकरून तू माझ्या बाबतीत तुझ्या इच्छेप्रमाणे करावे. तुझी कृपा माझ्यात कार्य करीत राहो आणि जखऱ्याप्रमाणे मी तुझ्या पवित्र नावाचा गौरव सदैव गात राहो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.




