२३ एप्रिल २०२०
पुनरुत्थानकाळातील दुसऱ्या आठवड्याचा गुरुवार
आजची वाचने
संत जॉर्ज, रक्तसाक्षी — ऐच्छिक स्मरणदिन
संत अॅडलबर्ट, बिशप आणि रक्तसाक्षी — ऐच्छिक स्मरणदिन

शीर्षक: पवित्र आत्म्याचा वर्षाव; चित्रकार: अँथनी व्हॅन डाइक
तो पवित्र आत्म्याचे दान मोजूनमापून देत नाही. योहान 3:34
युद्धकाळात सैनिकांकडे अन्नाचा साठा कमी असतो, तेव्हा त्यांना तो पुरवून वापरावा लागतो. तो शक्य तितके दिवस टिकावा म्हणून ते दररोज मोजून थोडेच अन्न खातात. तसे केले नाही, तर अन्न संपून त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येऊ शकते.
देव आणि त्याची कृपा यांच्या बाबतीतही असेच असते तर? पवित्र आत्मा आपल्याला असे म्हणाला तर, “पाहा, आता मी तुम्हाला थोडीच मदत करणार आहे. मी देत असलेली कृपा वापरून संपवलीत की मग तुम्हाला स्वतःच सगळे सांभाळावे लागेल.” अरेरे! किती अडचणीचे झाले असते!
पण आनंदाची बातमी ही आहे की देव आपल्याशी याच्या अगदी उलट वागतो. तो पवित्र आत्म्याचा भरभरून वर्षाव करण्यास कटिबद्ध आहे आणि आपल्याला कधीही लागेल किंवा हवी असेल तितकी कृपा तो देऊ करतो. अडचण अशी आहे की तरीही आपण अनेकदा त्याची कृपा ‘मोजूनमापून’च स्वीकारतो. देवाच्या सामर्थ्याला मर्यादा आहेत असे आपल्याला वाटते म्हणून आपण असे करत नाही. उलट, देवाने आपल्या जीवनात त्याचे सर्वशक्तिमान सामर्थ्य पूर्णपणे प्रकट करावे, याचीच आपल्याला अनेकदा भीती वाटते.
आज यावर चिंतन करा: देवाला तुमच्या जीवनात त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करू दिले, तर तुमचे जीवन कसे असेल? काय बदलेल? तुमचे दैनंदिन जीवन, तुमची नाती, तुमचे बोलणे, तुमच्या कृती आणि तुमचे भविष्य कसे वेगळे असेल? सर्व बाबतींत देवाची इच्छा पूर्णपणे स्वीकारणे योग्य आहे, हे आपल्याला बुद्धीने पटते. पण प्रत्यक्षात तसे करण्याची वेळ येते, तेव्हा अनेकदा आपण फार कचरतो. पुढे काय होईल हे माहीत नसल्याची भीती त्यामागे असू शकते. किंवा मनापासून बदलण्याची आपली तयारी नसेल. कारण काहीही असो, पवित्र आत्म्याचा भरभरून वर्षाव करून देव तुम्हाला अमर्याद कृपा देऊ करीत आहे. ती मोजूनमापून स्वीकारायची की नाही, हे तुमच्या हाती आहे.
हे प्रभू, माझ्या जीवनात तुला जे काही करायचे आहे ते करू देण्याची माझी खरोखर इच्छा आहे. तुझ्या कृपेत मला पूर्णपणे बुडून जायचे आहे. त्यातून पुढे काहीही घडले तरी तुला ‘हो’ म्हणण्यास मला मदत कर. तू मला जो गौरवशाली ‘हो’ म्हणायला बोलावत आहेस, तो विश्वासाने म्हणण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.




