12 नोव्हेंबर 2020
सामान्य काळातील बत्तिसाव्या आठवड्याचा गुरुवार
आजची वाचने
संत योसाफात, बिशप व रक्तसाक्षी — स्मृतिदिन

देवाचे राज्य केव्हा येईल, असे परुश्यांनी विचारल्यावर येशूने उत्तर दिले, “देवाचे राज्य येताना ते डोळ्यांना दिसणार नाही आणि ‘पाहा, ते इथे आहे’ किंवा ‘ते तिथे आहे,’ असे कोणी जाहीर करणार नाही. कारण पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्येच आहे.” लूक 17:20-21
देवाचे राज्य तुमच्यामध्येच आहे! याचा अर्थ काय? देवाचे राज्य कुठे आहे आणि ते आपल्यामध्ये कसे आहे?
देवाच्या राज्याविषयी दोन प्रकारे बोलता येते. काळाच्या शेवटी ख्रिस्ताचे अंतिम आगमन होईल, तेव्हा त्याचे राज्य कायमचे असेल आणि सर्वांना दिसेल. तो सर्व पापाचा आणि दुष्टतेचा नाश करील आणि सर्व काही नवे होईल. तो सदासर्वकाळ राज्य करील आणि प्रत्येकाच्या मनावर व हृदयावर देवावरील व शेजाऱ्यावरील प्रेमाचे अधिराज्य असेल. किती आनंददायी देणगी! किती आशेने आपण तिची वाट पाहू शकतो!
पण हा उतारा विशेषतः आपल्या सहवासात आधीपासूनच असलेल्या देवाच्या राज्याविषयी सांगतो. हे कोणते राज्य आहे? हे ते राज्य आहे जे कृपेने आपल्या हृदयांत जिवंत आहे आणि दररोज असंख्य प्रकारे आपल्याला अनुभवायला मिळते.
पहिली गोष्ट म्हणजे, आपल्या हृदयात राज्य करण्याची आणि आपल्या जीवनाचे संचालन करण्याची येशूची उत्कट इच्छा आहे. खरा प्रश्न असा आहे: मी माझ्या जीवनाची सूत्रे त्याच्या हाती देतो का? तो हुकूमशहासारखी आपली सत्ता लादणारा राजा नाही. तो आपला अधिकार गाजवून आज्ञापालनाची सक्ती करत नाही. अर्थात, शेवटी येशू पुन्हा येईल तेव्हा तो आपला अधिकार प्रस्थापित करील; पण सध्या तो आपल्याला केवळ आमंत्रण देतो. आपल्या जीवनाचा राजा म्हणून त्याचा स्वीकार करावा, असे आमंत्रण तो देतो. आपल्या जीवनाची सारी सूत्रे त्याच्या हाती द्यावीत, असे तो आपल्याला सांगतो. आपण तसे केले, तर तो आपल्याला आज्ञा देईल, पण त्या प्रेमाच्या आज्ञा असतील. त्या आपल्याला सत्य आणि सौंदर्याकडे घेऊन जातात. त्या आपल्याला ताजेतवाने करतात आणि नवे बनवतात.
दुसरी गोष्ट म्हणजे, येशू आपल्या सभोवताली सर्वत्र उपस्थित आहे. जिथे जिथे देवावरील व शेजाऱ्यावरील प्रेम दिसते, तिथे तिथे त्याचे राज्य असते. जिथे जिथे कृपा कार्य करते, तिथे तिथे त्याचे राज्य असते. या जगातील दुष्टतेने आपण इतके भारावून जाऊ शकतो की देवाचे सान्निध्य आपल्या लक्षातही येत नाही. आपल्या सभोवताली असंख्य प्रकारे देवाची जिवंत उपस्थिती जाणवते. ही उपस्थिती ओळखण्याचा, तिच्यापासून प्रेरणा घेण्याचा आणि या सान्निध्यावर प्रेम करण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे.
आज तुमच्यामध्ये असलेल्या देवाच्या राज्यावर चिंतन करा. ते तुम्हाला तुमच्या हृदयात दिसते का? तुमच्या जीवनावर राज्य करण्यासाठी तुम्ही दररोज येशूला आमंत्रण देता का? तो तुमचा प्रभू आहे, हे तुम्ही मान्य करता का? तुमच्या दैनंदिन परिस्थितीतून, इतर व्यक्तींमधून आणि रोजच्या प्रसंगांतून तो कोणकोणत्या प्रकारे तुमच्याकडे येतो, हे तुम्हाला दिसते का? त्याचा सतत शोध घ्या. त्यामुळे तुमचे हृदय आनंदाने भरेल.
हे प्रभू, आज माझ्या हृदयात येऊन राज्य कर, अशी मी तुला विनंती करतो. माझ्या जीवनाची सारी सूत्रे मी तुझ्या हाती देतो. तू माझा प्रभू आणि माझा राजा आहेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्या परिपूर्ण व पवित्र इच्छेनुसार जगण्याची माझी इच्छा आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – संत योसाफात, बिशप व रक्तसाक्षी
वरील चित्र: ‘परुशी येशूला प्रश्न विचारतात’ — जेम्स टिसो यांचे चित्र




