20 जुलै 2021
सामान्य काळातील सोळाव्या आठवड्याचा मंगळवार
आजची वाचने
संत अपोलिनारिस, बिशप आणि रक्तसाक्षी—ऐच्छिक स्मरण

“माझी आई कोण? माझे भाऊ कोण?” मग आपल्या शिष्यांकडे हात करून तो म्हणाला, “हे पाहा, माझी आई आणि माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, तोच माझा भाऊ, माझी बहीण आणि माझी आई आहे.” मत्तय 12:48–50
येशू एका घरात शिकवत होता. तिथे जमलेल्या लोकांना त्याने हे प्रश्न विचारले. त्याची आई आणि भाऊ घराबाहेर आले होते आणि त्यांनी त्याच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की प्राचीन हिब्रू, अरामाईक आणि इतर भाषांमध्ये “भाऊ” या शब्दाचा अर्थ नेहमीच सख्खे भाऊ असा होत नसे. चुलत भावांसारख्या विस्तारित कुटुंबातील नातेवाइकांसाठीही हाच शब्द वापरला जात असे. त्यामुळे येशूची आई आणि त्याचे काही पुरुष नातेवाईक त्याला भेटायला आले होते, हे स्पष्ट होते.
या संधीचा उपयोग करून येशू जमलेल्या लोकांना देवाच्या कुटुंबाविषयी आणखी शिकवतो. तो स्पष्ट सांगतो की स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागल्यानेच आपण त्याच्या कुटुंबाचे सदस्य होतो. अशा रीतीने, येशूच्या दृष्टीने कुटुंब हे रक्ताच्या नात्यांपुरते मर्यादित नाही. आपली इच्छा पित्याच्या इच्छेशी जुळवून जे कोणी येशूशी आध्यात्मिकरीत्या एकरूप होतात, त्या सर्वांचा त्याच्या कुटुंबात समावेश होतो.
हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण यातून आपली खरी ओळख आपल्याला कळते. आपण त्याच्या कुटुंबातले व्हावे, अशी देवाची इच्छा आहे. आपण कोण व्हावे म्हणून त्याने आपल्याला बोलावले आहे, हे त्याला आपल्याला समजावे असे वाटते. पित्याची मुले, ख्रिस्ताचे भाऊ-बहीण आणि आध्यात्मिक अर्थाने आपल्या प्रभूचे आई-वडील होण्याचेही आपल्याला बोलावणे आहे. पित्याच्या इच्छेचे पालन करून आपण प्रभूला या जगात आणतो, या अर्थाने आपण त्याचे आई-वडील होतो.
अगदी लहान वयापासूनच मुलांना कुणीतरी आपले असावे असे वाटते. त्यांना मित्र हवे असतात, इतरांनी आपल्याला सामावून घ्यावे असे वाटते आणि इतरांशी नाती जोडावीशी वाटतात. आपल्या निर्मितीच्या क्षणापासूनच ही उपजत ओढ आपल्यात आहे आणि ती आपल्या असण्याचा एक मूलभूत भाग आहे. देवाच्या कुटुंबाचे आध्यात्मिक सदस्य झाल्यानेच ही ओढ पूर्णपणे तृप्त होऊ शकते.
क्षणभर तुम्हालाही मैत्रीची किती ओढ आहे, याचा विचार करा. दोन व्यक्तींमध्ये अगदी जिवाभावाची मैत्री असते, तेव्हा त्या अनेकदा एकमेकींना भाऊ किंवा बहीण मानतात. मैत्रीचे नाते आपल्याला मनापासून समाधान देते, कारण अशा नात्यांसाठीच आपण घडवले गेलो आहोत. पण खरी मैत्री आणि आध्यात्मिक कुटुंबातील खरी नाती आपल्याला सर्वांत निर्मळ समाधान तेव्हाच देतात, जेव्हा ती पित्याच्या इच्छेशी आपल्या एकरूपतेतून निर्माण होतात. तुम्ही आणि दुसरी एखादी व्यक्ती, दोघेही पित्याच्या इच्छेशी एकरूप असता, तेव्हा तुमच्यात कुटुंबाचे असे नाते निर्माण होते की ते तुमच्या अंतःकरणातील सर्वांत खोल ओढ पूर्ण करते. हे नाते आपल्याला इतर ख्रिस्ती बांधवांशी तर जोडतेच, पण येशू या शुभवर्तमानाच्या उताऱ्यात सांगतो त्याप्रमाणे, ते आपल्याला त्याच्याशीही अतिशय जवळून जोडते.
येशूचे हे शब्द म्हणजे त्याने तुम्हाला दिलेले वैयक्तिक आमंत्रण आहे, असे समजून आज त्यांवर मनन करा. तो तुम्हाला आपल्या कुटुंबात येण्याचे आमंत्रण देत आहे. तुम्ही त्याच्या कुटुंबातले व्हावे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची खरी ओळख सापडावी, अशी त्याची इच्छा आहे. पित्याच्या इच्छेचे पूर्णपणे पालन करण्याचा प्रयत्न करताना, पित्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतरांशी तुमच्या नात्यांवर त्याचा काय परिणाम होतो, याचाही विचार करा. तुम्ही सर्व जण देवाच्या इच्छेचे पालन करता, त्यातून निर्माण होणाऱ्या नात्यांचा आनंद घ्या आणि ती नाती कृतज्ञतेने जपा.
हे माझ्या प्रेमळ प्रभू, एकतेत आणि प्रेमात जगण्यासाठी तू मानवकुटुंब निर्माण केलेस. तू सर्व लोकांना प्रेमाने तुझ्या कुटुंबात सामील होण्याचे आमंत्रण देतोस. हे प्रिय प्रभू, मी तुझे पवित्र आमंत्रण स्वीकारतो आणि स्वर्गातील पित्याच्या इच्छेचे मनापासून पालन करण्याचे वचन देतो. असे करताना, तुझ्याशी आणि तुझ्याशी एकरूप झालेल्या सर्वांशी माझे नाते अधिक दृढ होत जाते, या फळाचा मला आनंद आहे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन
आजचे संत – संत अपोलिनारिस, बिशप व रक्तसाक्षी
वरील चित्र: एका मेंढपाळासह पवित्र कुटुंब — टिशियन यांचे चित्र, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने




