22 ऑगस्ट 2021
सामान्य काळातील एकविसावा रविवार (वर्ष ब)
आजची वाचने

यामुळे त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण आपल्या पूर्वीच्या जीवनाकडे परतले आणि पुन्हा त्याच्याबरोबर गेले नाहीत. तेव्हा येशूने बारा प्रेषितांना विचारले, “तुम्हालाही निघून जायचे आहे का?” शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “गुरुदेव, आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने तुझ्याजवळ आहेत. तू देवाचा पवित्र जन आहेस, असा विश्वास आम्ही ठेवू लागलो आहोत आणि याची आम्हाला खात्री पटली आहे.” योहान 6:66–69
कशामुळे असे झाले? येशूने पवित्र युखरिस्ताविषयी दिलेल्या शिकवणीमुळे “त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण आपल्या पूर्वीच्या जीवनाकडे परतले आणि पुन्हा त्याच्याबरोबर गेले नाहीत.” पवित्र युखरिस्ताविषयीची शिकवण ही येशूने दिलेली सर्वांत गहन आणि सुंदर शिकवण होती; पण काहींना ती स्वीकारणे फारच कठीण गेले. म्हणून पुष्कळ जण त्याला सोडून गेले. पण या उताऱ्यात प्रेषितांचा, विशेषतः पेत्राचा, सुंदर विश्वासही दिसून येतो.
सर्वप्रथम, पवित्र युखरिस्ताविषयी दिलेल्या आपल्या सुंदर आणि अतिशय गहन शिकवणीपासून येशू जराही मागे हटत नाही. आपण जे सांगितले त्यावर तो ठाम राहतो: “जर तुम्ही मानवपुत्राचे मांस खाल्ले नाही आणि त्याचे रक्त प्यायले नाही, तर तुमच्यामध्ये जीवन नाही” (योहान 6:53). तो पुढे म्हणतो, “कारण माझे मांस हे खरे अन्न आहे आणि माझे रक्त हे खरे पेय आहे” (योहान 6:55).
यानंतर येशू आपल्या शिष्यांकडे वळतो आणि त्याने नुकतीच दिलेली शिकवण स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे स्वातंत्र्य त्यांना देतो. खऱ्या विश्वासाकडे वाटचाल करण्यासाठी त्यांना हे स्वातंत्र्य मिळणे आवश्यक होते. येशूने शिष्यांवर दबाव आणला असता किंवा त्यांना चलाखीने वळवले असते, तर त्याला आणि त्याच्या सर्व शिकवणीला स्वेच्छेने स्वीकारणे त्यांना कठीण झाले असते.
आपल्याबाबतीतही हेच खरे आहे. आपण त्याच्या मागे गेलेच पाहिजे, अशी सक्ती येशू करत नाही. विश्वास ठेवायला तो आपल्याला भाग पाडणार नाही किंवा चलाखीने त्याकडे वळवणार नाही. तो आपल्यावर दबाव आणणार नाही. उलट, येशू स्वतःला आणि आपली शिकवण आपल्यासमोर ठेवतो आणि आपल्याला विश्वास ठेवण्याचे आमंत्रण देतो.
या पार्श्वभूमीवर पेत्र आपल्या विश्वासाची गहन कबुली देतो: “गुरुदेव, आम्ही कोणाकडे जावे?” दुसऱ्या शब्दांत, पेत्र असे म्हणत होता, “प्रभू, तुझी शिकवण स्वीकारणे कठीण असले, तुझ्या मागे जाणे लोकांना पसंत नसले, आणि आम्हाला दुःख सोसावे लागले, लोकांनी आम्हाला नाकारले किंवा आमच्याविषयी गैरसमज करून घेतला, तरीही तुझी निवड करणेच सर्वांत चांगले आहे.” याचा विचार करा. येशूची गहन शिकवण संपूर्णपणे स्वीकारण्याच्या निवडीची बरोबरी दुसरा कोणता पर्याय करू शकेल? त्याच्या शिकवणीचा केवळ काही भाग स्वीकारणे अधिक चांगले आहे का? तसे करणे म्हणजे एका अर्थाने त्यालाच नाकारणे होय.
जीवनात एकच चांगला पर्याय आहे, असा विश्वास पेत्राला पटला आहे, आणि त्याची साक्ष तो आपल्याला देतो. काहीही झाले तरी येशूच्या मागे जाण्याची निवड करणे, हाच तो पर्याय आहे. ख्रिस्ताऐवजी निवडावे असे जीवनात दुसरे काहीही नाही. निवड करण्यास खरोखर योग्य असा तो एकटाच आहे, हे सत्य उमगावे म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत.
आज पेत्राच्या या शब्दांवर चिंतन करा: “प्रभू, आम्ही कोणाकडे जावे?” येशू देव आहे, तो मशीहा आणि तारणारा आहे. सार्वकालिक जीवनाची वचने त्याच्याजवळ आहेत. निवड करण्यासाठी तोच सर्वांत चांगला “पर्याय” आहे. पेत्राचे ते शब्द उच्चारा आणि ते उच्चारताना येशूची निवड करा. ही निवड लोकांना आवडो वा न आवडो, इतर जण ती करो वा न करो, तुम्ही ती करा. प्रवाहाबरोबर वाहत गेलो, तर तो आपल्याला चुकीच्या दिशेने नेतो. योग्य निवड केल्याने आपल्याला भक्कम आधार मिळतो.
प्रभू, तुझ्याकडे येण्याशिवाय आणि तुझ्या मार्गाने चालण्याशिवाय मला दुसरी वाट नाही. तू सर्वांचा प्रभू आहेस आणि तूच मशीहा आहेस. मी तुझी निवड करतो आणि तू शिकवलेले सर्व स्वीकारतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन
आजचे संत – धन्य कुमारी मरियेचे राणीपद
यंदा हे स्मरण रविवारी येत असल्याने उपासनाविधीत साजरे केले जात नाही
नवीन!
सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीतील चिंतने आता ई-पुस्तक & मऊ मुखपृष्ठाच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध आहेत.
कॅथलिक दैनिक चिंतन
सामान्य काळ: 1 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर 2021
खालील विक्रेत्यांकडे ई-पुस्तक & पेपरबॅक स्वरूपात उपलब्ध:
अॅमेझॉन पेपरबॅक – किंडल – गूगल प्ले बुक्स – आयबुक्स – बार्न्स & नोबल




