सोमवार, 25 एप्रिल 2022

“जे विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील: माझ्या नावाने ते भुते घालवतील आणि नव्या भाषांत बोलतील. ते सापांना हातांनी उचलतील, आणि त्यांनी एखादा प्राणघातक पदार्थ प्यायला तरी त्याने त्यांना काहीही अपाय होणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.” मार्क 16:17–18
येशूचे हे शब्द अक्षरशः घ्यायचे आहेत का? होय, नक्कीच. ख्रिस्तसभेच्या संपूर्ण इतिहासात आपण पाहिले आहे की देवाच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या काळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी येशूच्या अनुयायांनी त्याच्या नावाने मोठे चमत्कार आणि सामर्थ्यशाली कृत्ये केली. म्हणून होय, येशू जे म्हणाला ते त्याला खरोखरच अभिप्रेत होते.
पण या शब्दांचा आणखी एक अर्थ आहे, आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात हे अक्षरशः घडणार नसले, तरी त्यांच्या जीवनात या शब्दांचा अधिक खोल, आध्यात्मिक अर्थ प्रत्यक्षात उतरेल.
येथे येशू चार मुख्य आश्वासने देतो. विश्वास ठेवणारे १) दुष्टावर विजय मिळवतील, २) नव्या रीतीने संवाद साधतील, ३) जगातील धोक्यांना सामोरे जातील आणि त्या धोक्यांपासून त्यांचे रक्षण होईल, आणि ४) इतरांच्या आरोग्यलाभाचे साधन बनतील, असे तो वचन देतो.
पहिली गोष्ट अशी की, सैतान खरोखरच अस्तित्वात आहे आणि तो सतत आपल्याला घाबरवून आपल्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याची तुलना तीन पौंड वजनाच्या कुत्र्याशी करता येईल. तो कुत्रा आक्रमकपणे आणि त्रासदायक रीतीने भुंकतो, पण त्याच्या चावण्यात फारसा जोर नसतो. हे ‘भुंकणे’ कधीकधी भीतीदायक वाटू शकते, पण ख्रिस्ताचे सामर्थ्य पोलादी टोक असलेल्या बुटासारखे आहे. ते या धोक्याला सहज तोंड देऊ शकते.
दुसरी गोष्ट अशी की आपल्याला ‘नव्या भाषांत बोलण्याचे’ पाचारण आहे. म्हणजेच, आपल्या नैसर्गिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन देवाचे शब्द आणि त्याचे सत्य इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला बोलावले आहे. देवाच्या भाषेत बोलावे, त्याच भाषेत संवाद साधावा आणि ज्या जगाला त्याची गरज आहे त्या जगात त्याची वाणी व्हावे, असे आपल्याला पाचारण आहे.
तिसरी गोष्ट अशी की या जीवनात आपल्याला अनेक संघर्षांना सामोरे जावे लागेल. हे संघर्ष केवळ दुष्टाकडून येत नाहीत; जगामुळे आणि आपल्या स्वतःच्या मनातील विपरीत ओढाताणीमुळेही ते उद्भवतात. आपण येशूला आपल्या जीवनात कार्य करू दिले, तर जीवनात येणाऱ्या अनेक धोक्यांवर आणि संघर्षांवर मात करण्याची कृपा तो आपल्याला देईल, असे तो पुन्हा आश्वासन देतो.
शेवटी, येशू आपल्याला बरे करण्यासाठी, विशेषतः आपल्या आत्म्यांना आरोग्य देण्यासाठी आला. रोज आपल्या भेटीत येणाऱ्या लोकांना बरे करण्याचे साधन आपण व्हावे, अशी त्याची इच्छा आहे.
आज आपण ज्यांचा सन्मान करतो ते संत मार्क ख्रिस्ताच्या सुवार्तेचे एक महान प्रचारक होते. सुवार्ता प्रसाराच्या कार्यात सहभागी होण्याचे पाचारण आपल्या सर्वांना आहे, यावर आज चिंतन करा. जीवनात आपल्याला मिळणाऱ्या, वर वर्णन केलेल्या या पाचारणांचा विचार करा. त्यांपैकी एखादे विशेष ठळकपणे जाणवले आणि तुमच्या अंतःकरणाला वेगळ्या रीतीने भिडले, तर त्याकडे लक्षपूर्वक कान द्या. कदाचित देव तुम्हाला त्याच्या दैवी कार्यात अधिक पूर्णपणे सहभागी होण्यासाठी बोलावत असेल.
प्रभू, माझा विश्वास आहे. तुझ्या कृपेचे साधन म्हणून तू माझा उपयोग करावा, अशी माझी निवड आहे. तू मला दिलेला विश्वास, कृपेची गरज असलेल्या या जगासाठीही कृपेचा झरा ठरो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
अधिक वाचन: शुभवर्तमानकार संत मार्क
वर दाखवलेले चित्र: पर्वतावर ख्रिस्ताची झालेली परीक्षा — चित्रकार: दुच्चो




