२ मे २०२२
पास्का काळाच्या तिसऱ्या आठवड्यातील सोमवार
आजची वाचने
संत अथानासियस, बिशप आणि धर्माचार्य — स्मृतिदिन

येशूने त्यांना उत्तर दिले, “आमेन, आमेन, मी तुम्हांला सांगतो, तुम्ही माझा शोध घेत आहात, तो तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे, तर तुम्ही भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून. नाश पावणाऱ्या अन्नासाठी श्रम करू नका, तर सार्वकालिक जीवनासाठी टिकणाऱ्या अन्नाकरिता श्रम करा. ते अन्न मानवपुत्र तुम्हांला देईल.” योहान 6:26–27
पवित्र शास्त्रातील हे वचन आपल्या जीवनात आपण कशाला प्राधान्य देतो, या मूळ प्रश्नालाच हात घालते. तुम्ही कशासाठी श्रम करता? “नाश पावणाऱ्या अन्नासाठी” तुम्ही खूप श्रम करता आणि “सार्वकालिक जीवनासाठी टिकणाऱ्या अन्नाकरिता” अगदी थोडेच श्रम करता का? की याच्या उलट?
काही कारणाने या जगातल्या “गोष्टी” मिळवण्याचा ध्यास आपल्याला सहज लागू शकतो. वरच्या उताऱ्यात लोक येशूचा शोध घेत होते, कारण आदल्या दिवशी त्याने त्यांना खाऊ घातले होते आणि आता त्यांना पुन्हा भूक लागली होती. ते शब्दशः अन्नाच्याच शोधात होते. येशू त्यांना सौम्यपणे खडसावतो आणि त्यांनी त्याचा शोध का घ्यावा, याचे खरे कारण या निमित्ताने त्यांना दाखवून देतो. ते खरे कारण असे की, त्याला त्यांना सार्वकालिक जीवनाचे आध्यात्मिक अन्न द्यायचे आहे. तुम्ही कोणत्या अन्नाचा शोध घ्यावा, अशी येशूची इच्छा आहे? या प्रश्नाचे उत्तर आपल्या प्रभूला तुमच्या हृदयात देऊ द्या.
त्याला आपल्याला उत्तर देता यावे म्हणून आपण दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर मनन करायला हवे. पहिला प्रश्न असा: “मला जीवनात काय हवे आहे?” या प्रश्नावर विचार करण्यासाठी वेळ द्या. थोडा वेळ एकांतात घालवा आणि या प्रश्नाचे प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय हवे आहे? तुमच्या मनाची खोलवरची इच्छा काय आहे? तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून आपल्या इच्छांकडे नीट पाहिले, तर तुमच्या काही, कदाचित अनेक इच्छाही ख्रिस्ताने तुमच्या हृदयात रुजवलेल्या नाहीत, हे बहुधा तुमच्या लक्षात येईल. या इच्छा कोणत्या आहेत हे ओळखणे, ही येशूला तुम्हाला जे खरे अन्न द्यायचे आहे ते शोधण्याची पहिली पायरी आहे.
दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा: “तुम्ही योग्य कारणासाठी येशूचा शोध घेत आहात का?” आपण आजारी पडतो तेव्हा बरे होण्यासाठी डॉक्टरांकडे जातो. एखाद्या मुलाला दुखापत झाली की ते अनेकदा धीर मिळावा म्हणून आईकडे किंवा वडिलांकडे धाव घेते. यात काही गैर नाही. आपणही असेच करतो. काय करावे हे सुचत नाही आणि मन गोंधळून जाते, तेव्हा आपण अनेकदा उत्तरांसाठी आणि मदतीसाठी देवाकडे वळतो. पण केवळ बरे होण्यासाठी किंवा दिलासा मिळवण्यासाठी नव्हे, तर त्याहीपलीकडे जाऊन आपण देवाचा शोध घ्यायला हवा. शेवटी प्रेमापोटी आपण देवाचा शोध घेऊ. आपले त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्यावर आणखी प्रेम करावे अशी आपली इच्छा आहे, एवढ्याच कारणासाठी आपण त्याचा शोध घेऊ.
येशूचा शोध घेण्याची इच्छा तुमच्या मनात आहे की नाही, यावर आज मनन करा. येशूवर तुमचे प्रेम आहे आणि त्याच्यावर आणखी प्रेम करावे अशी तुमची इच्छा आहे, एवढ्याच कारणासाठी तुम्ही त्याचा शोध घेऊ लागता, तेव्हा तुम्ही योग्य वाटेवर असता. आणि त्या वाटेवर पुढे चालत राहिल्यावर तुम्हाला उमगते की ही वाट परम आनंदाची आणि परिपूर्ण तृप्तीची आहे.
हे येशू, तुझा शोध घेण्यास मला मदत कर. मला ज्या मदतीची आणि बरे होण्याची गरज आहे, त्यासाठी तुझा शोध घेण्यास मला मदत कर. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, केवळ प्रेमापोटी तुझा शोध घेण्यास मला मदत कर. माझ्या येशू, माझे तुझ्यावर खरोखर प्रेम आहे. तुझ्यावर आणखी प्रेम करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – संत अथानासियस, बिशप व धर्मपंडित




