गुरुवार, 27 नोव्हेंबर 2025
आजची वाचने
अमेरिका: कृतज्ञता दिन—ऐच्छिक स्मरणदिन
(अमेरिकेबाहेरील देशांसाठी सामान्य काळातील चौतिसाव्या आठवड्याच्या गुरुवारचे चिंतन पाहा.)
जेम्स टिसो, सार्वजनिक मालकीची कलाकृती, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने
“दहाजण शुद्ध झाले ना? मग बाकीचे नऊ कुठे आहेत? या परदेशीयाशिवाय देवाचे आभार मानण्यासाठी दुसरा कोणीच परत आला नाही काय?” मग येशू त्याला म्हणाला, “ऊठ आणि जा; तुझ्या श्रद्धेने तुझे तारण केले आहे.” लूक 17:17–19
त्याने आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि त्याच्या श्रद्धेने त्याचे तारण झाले! आज कृतज्ञता दिनाची राष्ट्रीय सुट्टी साजरी करताना चिंतन करण्यासाठी हा किती सुंदर प्रसंग आहे!
कृतज्ञता दिन हा खास चर्चचा पवित्र दिवस नसला, तरी कृतज्ञतेला आपल्या ख्रिस्ती श्रद्धेत नक्कीच मध्यवर्ती स्थान आहे. आजच्या शुभवर्तमानात येशूने दहा कुष्ठरोग्यांना बरे केले, त्या प्रसंगातून हे दिसून येते. बरे झाल्यावर त्यांनी कसा प्रतिसाद दिला, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांच्यापैकी नऊ जण बरे झाल्यावर आपापल्या कामाला निघून गेले. ज्याने त्यांना बरे केले, त्याचे आभार मानायला ते परत आले नाहीत. पण एक जण परत आला. क्षणात कुष्ठरोगातून मुक्त झालेला हा मनुष्य येशूकडे परत आला, त्याचा गौरव केला, त्याच्या चरणी पडला आणि त्याचे आभार मानले. तो परदेशी होता, एक सामरी होता. तरीही त्याने दाखवलेल्या श्रद्धेचे अनुकरण करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. बरे होण्याची कृपा मिळाल्याबद्दल मनात कृतज्ञता असणे पुरेसे नाही, ती व्यक्तही केली पाहिजे, हे त्याला उमगले होते. यातून त्या सामरी मनुष्याची श्रद्धा दिसून आली.
कृतज्ञता दिन साजरा करताना आपल्याला याची आठवण होते की, ज्या अनेक गोष्टींबद्दल आपण कृतज्ञ असायला हवे, त्यांपैकी देवाने आपल्याला दिलेल्या अपरिमित कृपादानांबद्दल त्याचे आभार मानण्याइतके महत्त्वाचे दुसरे काही नाही. पण देवाच्या आशीर्वादांना आपण कसा प्रतिसाद देतो, याचे महत्त्व किती सहज दुर्लक्षित होते, हे या प्रसंगातून स्पष्ट होते. कुष्ठरोग्यांपैकी केवळ दहा टक्के जणांनी अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली. म्हणून आज आपण कोणकोणत्या कारणांसाठी कृतज्ञ असायला हवे, याचा विचार करूया आणि ती कृतज्ञता देवापुढे व्यक्त करण्याचा प्रयत्न करूया.
सर्वप्रथम, देवाने प्रेमापोटी आपल्याला निर्माण केले. ही काही लहान देणगी नाही. त्याने आपल्याला दिलेली ही पहिली देणगी आहे आणि अनेकदा आपण ती गृहीत धरतो. आपल्याला निर्माण करण्याची देवाला गरज नव्हती. तुम्हालाही निर्माण करण्याची त्याला गरज नव्हती. तरी त्याने तुम्हाला निर्माण केले. जीवनाची देणगी, अमर आत्म्याची देणगी, यांकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये आणि त्यांचा सदैव आनंद मानावा.
दुसरे म्हणजे, धन्य कुमारी मरियेच्या गर्भात देहधारण करून देव आपल्या पतित अवस्थेत आला. असे करून त्याने आपल्या पतित मानवी स्वभावाला पूर्वी कधीही लाभली नव्हती अशी उंची प्राप्त करून दिली. देहधारी देवपुत्र आणि मानवपुत्राच्या एकाच व्यक्तीत मानवता आणि देवत्व एकत्र आले. आपल्या कोणत्याही पात्रतेशिवाय लाभलेल्या या विस्मयकारक देणगीबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे.
तिसरे म्हणजे, पुढे काय घडले हे आपल्याला ठाऊक आहे. देवाने देहधारी पुत्राच्या व्यक्तीत दुःख सोसले, मरण पत्करले आणि पुन्हा उठला. असे करून त्याने आपले प्रत्येक पाप पुसले जाणे शक्य केले. त्याच्यासोबत मरताना त्याच्यासोबत पुन्हा उठण्याचे आमंत्रण आपल्याला मिळते. आणि त्याच्यासोबत पुन्हा उठताना स्वर्गातील त्याच्या गौरवात सहभागी होण्याचे आमंत्रण आपल्याला मिळते.
शेवटी, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात दररोज असंख्य कृपादाने आपल्याला मिळतात. पण लाडावलेल्या मुलांप्रमाणे आपण अनेकदा या आशीर्वादांकडे दुर्लक्ष करतो आणि ते गृहीत धरतो. यासाठी केवळ उदाहरणे देणे पुरेसे नाही. तुमचे अंतःकरण कृतज्ञ असावे असे तुम्हाला वाटत असेल, तर स्वतःच्या जीवनात हे आशीर्वाद ओळखायला शिकणे आवश्यक आहे. बरेचदा आपले लक्ष आपल्या संघर्षांवर आणि दुःखांवरच राहते. पण आशीर्वाद विपुल आहेत. आपण जितके पूर्णपणे स्वतःला समर्पित करून आपल्या प्रभूकडे वळतो, तितके अधिक आशीर्वाद आपल्याला लाभतात.
देवाने तुम्हाला दिलेल्या अनेक आशीर्वादांकडे तुम्ही कोणत्या वृत्तीने पाहता, यावर आज चिंतन करा. देवाने आपल्याला निर्माण केले आणि प्रेमाने आपल्या तारणासाठी जे केले, त्या मूलभूत आशीर्वादांपासून सुरुवात करा. मग देव किती छोट्याछोट्या मार्गांनी तुमच्यासोबत राहिला आहे, त्याने तुम्हाला कसे मार्गदर्शन केले, बळ दिले आणि भरभरून आशीर्वाद दिले, यावर विचार करा. हे तुम्हाला स्पष्टपणे दिसत नसेल, तर आज देवाचे म्हणणे जाणीवपूर्वक ऐकण्यासाठी वेळ द्या, म्हणजे तो तुम्हाला हे आशीर्वाद दाखवू शकेल. ते ओळखू लागल्यावर त्या एका कुष्ठरोग्यासारखा प्रतिसाद द्या. येशूकडे वळा, त्याचा गौरव करा, प्रार्थनेत त्याच्या चरणी पडा आणि त्याचे आभार माना. असे केल्याने त्या कुष्ठरोग्याला लाभलेली तारणदायी श्रद्धा तुमच्याही अंतःकरणात भरून राहील.
हे माझ्या परम उदार प्रभू, तू मला माझ्या कल्पनेपलीकडचे आशीर्वाद दिले आहेत. तू माझ्याशी किती चांगुलपणाने वागला आहेस, हे मला कधीच पूर्णपणे उमगणार नाही आणि माझी कृतज्ञताही मला कधीच पुरेशी व्यक्त करता येणार नाही, याची मला जाणीव आहे. कृपा करून माझे अंतःकरण कृतज्ञतेने भरून टाक. माझ्या जीवनातील तुझे कार्य ओळखायला आणि त्या एका कुष्ठरोग्यासारखा तुला प्रतिसाद द्यायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
अधिक वाचन – कृतज्ञता दिन
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन
अमेरिकेबाहेरील देशांसाठी सामान्य काळातील चौतिसाव्या आठवड्याच्या गुरुवारचे चिंतन पाहा
सदैव तयार राहणे
गुरुवार, 27 नोव्हेंबर 2025
सामान्य काळातील चौतिसाव्या आठवड्याचा गुरुवार
© झुझे लुईझ बेर्नार्देश रिबेरू
“तेव्हा मनुष्यपुत्र सामर्थ्याने आणि मोठ्या वैभवाने मेघात येताना त्यांना दिसेल. पण ही चिन्हे दिसू लागतील तेव्हा ताठ उभे राहा आणि आपली मस्तके उंच करा, कारण तुमची मुक्ती जवळ आली आहे.” लूक 21:28
या जगात पुढे येणाऱ्या दुःखांबद्दल आणि छळाबद्दल येशूने दिलेल्या शिकवणीची सांगता वरील उताऱ्याने होते. पण या शेवटच्या शब्दांतून, येशू वैभवाने परत येईल या प्रतीक्षेत असणाऱ्यांना मोठी आशा मिळते. या उताऱ्यात दानिएलच्या भविष्यसूचक दृष्टान्ताचा (दानिएल 7:13–14) उल्लेख आहे. तो दृष्टान्त पाहून दानिएल भयभीत झाला. त्याने पुढे होणारा भयंकर छळ पाहिला, तसेच मनुष्यपुत्राच्या पुनरागमनाच्या वेळी सर्व दुष्टतेचा नाश होईल, हेही पाहिले.
ख्रिस्ताचे अंतिम आगमन आणि आपला स्वतःचा मृत्यू या दोन्हींचा विचार करता तुमच्या मनात काय येते? एखाद्या देवदूताने तुम्हाला सांगितले की तो दिवस उद्याच आहे, की मनुष्यपुत्र आपल्या संपूर्ण तेजाने आणि वैभवाने परत येईल, या जगाचा अंत करील आणि त्याचा न्याय करील, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही भयभीत व्हाल? तुम्हाला अत्यानंद होईल? आशा वाटेल? गोंधळून जाल? कदाचित यांपैकी प्रत्येक भावना थोडीफार जाणवेल. त्या वेळेविषयी येशूने म्हटले की “राष्ट्रे हवालदिल होतील” आणि “जगावर जे ओढवणार आहे त्याच्या धास्तीने लोक भयाने मरतील.” तर आपल्या प्रभूने वचन दिलेल्या त्या दिवसाविषयी तुमची प्रतिक्रिया काय आहे?
जे “भयाने मरतील”, ते त्या दिवसाला सामोरे जाण्यास अजिबात तयार नसतील, हे स्पष्ट आहे. कोणतीही तयारी नसताना मनुष्यपुत्राला, म्हणजेच देवाच्या पुत्राला, जगाच्या तारणाऱ्याला आणि सनातन न्यायाधीशाला भेटणे भयावह ठरेल. उदाहरणार्थ, कल्पना करा की तुम्ही अनेक पाहुण्यांना जेवायला बोलावले आहे, पण तारखेचा घोळ झाला आहे. तो दिवस उजाडला. पुढच्या आठवड्यापर्यंत कोणी येणार नाही असे तुम्हाला वाटत असतानाच पाहुणे मोठ्या संख्येने येऊ लागले. अशा वेळी तुमची किती धांदल उडेल आणि तुम्हाला किती ओशाळल्यासारखे वाटेल, याची कल्पना करा. आपल्या मृत्यूच्या वेळी आणि नंतर जगाच्या अंताला होणाऱ्या अंतिम न्यायाच्या वेळी आपण ख्रिस्तासमोर उभे राहू. तेव्हा त्याच्या न्यायाला सामोरे जाण्याची तयारी नसेल, तर त्या अनुभवापुढे जेवणाच्या प्रसंगाचा गोंधळ काहीच नाही.
आनंदाची बातमी अशी आहे की जे श्रद्धेने जगून आणि देवाची इच्छा निःस्वार्थपणे पूर्ण करून खरोखर तयार झाले आहेत, त्यांना त्या दिवशी असे सांगितले जाईल: “ताठ उभे राहा आणि आपली मस्तके उंच करा, कारण तुमची मुक्ती जवळ आली आहे.” त्या दिवसासाठी तुम्ही शक्य ते सर्व केले, तर तुम्ही मोठ्या आशेने आणि उत्सुकतेने त्याची वाट पाहाल. तुम्ही खरोखर ताठ उभे राहू शकाल, येणाऱ्या सर्वांच्या न्यायाधीशाकडे नजर लावू शकाल आणि तो तुम्हाला इतक्या उत्कटतेने देऊ इच्छित असलेले शाश्वत प्रतिफळ स्वीकारू शकाल. पण ख्रिस्ताचे पूर्णपणे अनुकरण करत जगून तुम्ही त्या दिवसासाठी खरोखर तयार असाल, तरच तुम्हाला असा अनुभव येईल.
आज त्या अंतिम दिवसाचे चिंतन करा. देवाने निर्माण केलेली प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभी आहे, अशी कल्पना करा. त्या दिवशी प्रत्येक पाप आणि प्रत्येक सद्गुण उघड होईल. देव सर्वांच्या मनातील आणि हृदयातील गोष्टी उघड करील, आणि त्या सर्वांना स्पष्ट दिसतील. ज्यांनी निष्ठेने जीवन जगले आहे, ते देवाचे न्यायनिर्णय जाहीर होताना त्याचा न्याय आणि त्याची दया एकत्र प्रकट होत असल्याचे पाहून आनंदित होतील. त्या दिवसाची तुम्हाला भीती वाटत असेल, तर ती का वाटते याचा विचार करा. या निर्णायक क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत नसाल, तर पूर्णपणे तयार होण्यासाठी तुम्हाला काय करायला हवे, याचा अधिक खोलवर विचार करा. आजच तयारी करा. वाट पाहू नका. आपला प्रभू कोणत्याही क्षणी परत येऊ शकतो. तो येईल तेव्हा तुम्ही बेसावध असू नका.
हे माझ्या सनातन न्यायाधीशा, न्याय पूर्णत्वाला नेण्यासाठी एका निर्णायक क्षणी पृथ्वीवर परत येण्याचे वचन तू दिले आहेस. तुझ्याशी आणि तुझ्या पवित्र इच्छेशी एकरूप होऊन जगत असताना, मी त्या दिवसासाठी सदैव तयार असावे. हे प्रिय प्रभू, तो दिवस लवकर यावा आणि तू येशील तेव्हा तुझी सर्व लेकरे तुला भेटण्यास तयार असावीत, अशी मी प्रार्थना करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आगमनकाळातील प्रार्थना आणि चिंतन
अमेरिकेतील वाचकांसाठी: कृतज्ञता दिनाचे चिंतन पाहा.




