3 जुलै 2022
सामान्य काळातील चौदावा रविवार, वर्ष क
आजची वाचने

“जा; पाहा, लांडग्यांमध्ये कोकरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवत आहे. पैशाची थैली, झोळी किंवा पादत्राणे घेऊ नका; आणि वाटेत कोणालाही अभिवादन करू नका.” लूक 10:3-4
देवावर पूर्ण भरवसा ठेवणे ही जीवनातली सर्वांत कठीण गोष्टींपैकी एक आहे. पण आपल्या श्रद्धेच्या जीवनासाठी ती तितकीच फलदायी आहे. देवावर भरवसा ठेवणे आपोआप जमत नाही. आपला प्रभू आपल्याला त्याच्यावर अधिकाधिक भरवसा ठेवण्यास बोलावतो, तेव्हा आपण सतत स्वतःला त्याच्या हाती सोपवले पाहिजे आणि आपला निश्चय दृढ ठेवला पाहिजे.
वरील उताऱ्याच्या सुरुवातीलाच येशू ठामपणे सांगतो: “लांडग्यांमध्ये कोकरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवत आहे.” या प्रभावी प्रतिमेतून हे स्पष्ट होते की आपला प्रभू आपल्यावर जे कार्य सोपवणार आहे, ते आपण आपल्या बळावर पार पाडू शकत नाही. एखादे लहान कोकरू लांडग्यांच्या कळपात शिरले, तर त्याचा निभाव लागणार नाही… मेंढपाळ अगदी त्याच्या शेजारी असेल तरच ते निभावून जाईल.
येशू हे दाखवून देतो की त्याने सोपवलेले कार्य पार पाडण्यासाठी मोठे धैर्य लागेल; एवढेच नव्हे, तर त्याच्याशिवाय ते पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून तो पुढे अशी व्यावहारिक सूचना देतो: “पैशाची थैली, झोळी किंवा पादत्राणे घेऊ नका; आणि वाटेत कोणालाही अभिवादन करू नका.” या वचनाकडे आध्यात्मिक दृष्टीने पाहिले, तर येशू आपल्याला दोन गोष्टी सांगत आहे, असे लक्षात येते. पहिली, “तुमच्या जीवनात तुम्हाला सोपवलेले कार्य करताना माझ्या दैवी व्यवस्थेवर भरवसा ठेवा.” दुसरी, “तुमच्या अंतिम ध्येयावर लक्ष ठेवा आणि इतर गोष्टींमुळे विचलित होऊ नका.” सोबत पैसे घेण्यात किंवा अनोळखी व्यक्तींशी बोलण्यात मुळात काही वाईट नाही. उलट, या शब्दांमधला सखोल आध्यात्मिक अर्थ आपण समजून घ्यावा: त्याच्यावर भरवसा ठेवून त्याने सोपवलेले कार्य पूर्ण करण्याचा दृढनिश्चय करावा.
देवाच्या इच्छेचा धैर्याने स्वीकार करण्याचा प्रयत्न करताना तुम्ही त्याच्या दैवी व्यवस्थेवर किती भरवसा ठेवता, यावर आज चिंतन करा. आपल्या प्रभूने सोपवलेले कार्य पूर्ण करण्याचा निश्चय करून तुम्ही शेवटपर्यंत वाटचाल करण्यास किती कटिबद्ध आहात, याचाही विचार करा. श्रद्धेच्या जीवनातील या दोन्ही गोष्टी नव्याने अंगीकारा, आणि उत्तम मेंढपाळ प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत असेल.
हे माझ्या उत्तम मेंढपाळा, तुझ्या परमपवित्र इच्छेचा सर्व शक्तीनिशी स्वीकार करण्याचा मी निश्चय करतो. तू मला जिथे नेशील तिथे तुझ्यामागे चालण्यासाठी मला धैर्य, भरवसा आणि दृढनिश्चय दे. प्रिय प्रभू, मी स्वतःला तुझ्या हाती सोपवतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन
आजचे संत – संत थोमा प्रेषित — सण
यंदा हा सण रविवारी येत असल्याने उपासनाविधीत साजरा केला जात नाही
मुख्य चित्र: जेम्स टिसो, सार्वजनिक मालकीचे, विकिमीडिया कॉमन्सवरून




