मराठी

चिन्हाची मागणी

१८ जुलै २०२२
सामान्य काळातील सोळाव्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने

संत कामिलस दे लेलिस, याजक—अमेरिकेतील ऐच्छिक स्मरणदिन
(अमेरिकेबाहेर 14 जुलै रोजी साजरा केला जातो)

व्हिडिओ

“गुरुजी, तुम्ही आम्हाला एखादे चिन्ह दाखवावे, अशी आमची इच्छा आहे.” त्याने त्यांना उत्तर दिले, “ही दुष्ट आणि अविश्वासू पिढी चिन्ह मागते; पण योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय तिला दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही.” मत्तय 12:38-39

योना स्वतःच ते चिन्ह होता. त्याने एका देवमाशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री घालवल्या. ज्यांनी त्याला होडीतून पाण्यात फेकले होते, त्यांनी तो मेला असे नक्कीच समजले असेल. पण पश्चात्तापाचा उपदेश करण्यासाठी योनाला निनवेला पोहोचवून त्या देवमाशाने देवाची इच्छा पूर्ण करण्याचे साधन म्हणून काम केले. आणि तिथल्या लोकांनी खरोखरच पश्चात्ताप केला आणि आपले जीवन बदलले! शेवटी, देवमाशाच्या पोटातील अंधार आशीर्वाद ठरला आणि पुढच्या पिढ्यांसाठी एक चिन्ह बनला.

योनाच्या कथेनंतरच्या काळात घडलेल्या वरच्या प्रसंगाकडे आता वळूया. त्यात येशूचे अनुयायी त्याच्याकडे चिन्ह मागतात. तो कोण आहे याचा काहीतरी “पुरावा” त्यांना हवा आहे. किंवा कदाचित त्यांना नुसते कुतूहल असेल आणि चमत्कार पाहून त्यांना आपली “करमणूक” करून घ्यायची असेल. कारण काहीही असो, आपण योनाचेच चिन्ह देऊ, हे येशू स्पष्ट करतो.

योनाच्या कथेत येशूचा मृत्यू, कबरेतील त्याचे तीन दिवस आणि त्याचे पुनरुत्थान यांचे पूर्वचित्र स्पष्टपणे दिसते.  येशू हीच खूण देईल आणि आजही ती देत आहे.  तिचा खरा अर्थ आपल्याला उमगला, तर ती मोठ्या आशेची खूण ठरते. 

पण वरच्या प्रसंगातील येशूच्या अनुयायांप्रमाणेच आपणही अनेकदा त्याच मोहाला बळी पडू शकतो. येशूने आपल्याला जी चिन्हे दिली आहेत, त्यांपेक्षा वेगळे चिन्ह आपल्यालाही अनेकदा हवे असते. देवाची इच्छा काय आहे, याचा आणखी काही पुरावा त्याने द्यावा, असे आपल्याला वाटते. त्याने आपल्याशी मोठ्या आवाजात आणि स्पष्टपणे बोलावे, अशी आपली इच्छा असते. पण नेहमीच तसे घडत नाही. उलट, बहुतेकदा देव मौन बाळगत आहे असे आपल्याला वाटते. आपल्या मनात प्रश्न येतो, “प्रभू, तू कुठे आहेस? तू माझ्याशी का बोलत नाहीस?” पण येशू आपल्याशी त्याच प्रकारे बोलेल. तो आपल्याला आपल्या जीवनाची, मृत्यूची आणि पुनरुत्थानाची हळुवारपणे आठवण करून देईल. त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, याची तो आपल्याला आठवण करून देईल. आपण देवमाशाच्या पोटात आहोत किंवा कबरीत मृतावस्थेत आहोत असे वाटले, तरी आशा संपलेली नाही. देव सर्व गोष्टींत उपस्थित आहे. तो मौन बाळगत आहे असे वाटते, तेव्हाही तो आपल्याजवळ असतो आणि कार्य करत असतो.

स्वर्गातून आपल्याला हवे असलेले चिन्ह मिळाले नाही, तरी आपली श्रद्धा किती दृढ आहे, यावर आज चिंतन करा. येशूचे जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थान यांद्वारे पित्याने तुमच्याशी स्पष्टपणे संवाद साधला होता, हे लक्षात ठेवा. आजही तो तुमच्याशी अशाच प्रकारे बोलत आहे. त्यातून मिळणारी शिकवण ऐका आणि ती जी सत्ये जाहीर करते त्यांचा स्वीकार करा. आपण कबरीत आहोत असे वाटले किंवा देव मौन बाळगत आहे असे भासले, तरी तो खरेतर मौन नाही, हे जाणून घ्या. तो तुमच्याशी सतत बोलत असतो. तुम्हाला फक्त त्याचा आवाज ओळखता आला पाहिजे.

हे पवित्र मौनाच्या प्रभू, मला चमत्कार किंवा स्वर्गातून येणारी कोणतीही खूण दिसत नसली, तरी तुझ्यावर श्रद्धा ठेवण्यास मला मदत कर.  माझ्या जीवनात कितीही शंका किंवा दुर्बलता असल्या, तरी तुझ्यावर श्रद्धा ठेवण्यास मला मदत कर.  माझ्या जीवनात तू मला दिलेल्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी मला दृढ श्रद्धा दे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत: संत कामिलुस दे लेलिस

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

मुख्य छायाचित्र: लॉरेन्स ओ. पी. यांनी घेतलेले, फ्लिकरच्या सौजन्याने