20 जुलै 2022
सामान्य काळातील सोळाव्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने
संत अपोलिनारिस, बिशप आणि रक्तसाक्षी—ऐच्छिक स्मरण

“पण काही बी सुपीक जमिनीत पडले आणि त्याला शंभरपट, साठपट किंवा तीसपट फळ आले. ज्याला कान आहेत त्याने ऐकावे.” मत्तय 13:8-9
येशू ज्या ‘कानां’विषयी बोलतो, ते केवळ आपल्या शरीराचे कान नाहीत. तो आपल्या अंतर्जीवनाविषयी बोलत आहे. आपल्या अंतःकरणातच आपण त्याची पवित्र इच्छा ऐकू शकतो, समजून घेऊ शकतो, स्वीकारू शकतो आणि तिच्याप्रमाणे वागण्याचे निवडू शकतो. तो आपल्याला अनेक मार्गांनी आपले वचन सांगतो. आपण ते ऐकत आहोत का आणि त्याचे वचन आपल्या अंतःकरणात मुरू द्यायला तयार आहोत का, यावर चिंतन करायला हवे. त्याच्या वचनाकडे लक्ष दिले तरच आपण त्याची इच्छा मनापासून स्वीकारू शकतो.
आपले आत्मे सुपीक जमिनीसारखे असले पाहिजेत. पवित्र शास्त्रातील ही प्रतिमा आपल्या परिचयाची आहे, पण तिच्यावर निवांतपणे, बराच वेळ चिंतन करणे मोलाचे आहे. आपले अंतःकरण सुपीक जमिनीसारखे बनवणे सोपे नाही. ते कोरड्या, काटेरी, खडकाळ आणि बीजाला थारा न देणाऱ्या जमिनीसारखे होणे कितीतरी सोपे आहे. पण आपल्या अंतःकरणाची जमीन खरोखर कसदार आणि सुपीक व्हावी, यासाठी खूप काळजी घ्यावी लागते आणि लक्ष द्यावे लागते. हे कसे साधावे?
आपल्या अंतःकरणाची जमीन सुपीक करण्यासाठी सर्वांत महत्त्वाच्या पहिल्या पावलांपैकी एक म्हणजे खऱ्या नम्रतेसाठी प्रयत्न करणे. नम्रता म्हणजे मुळात आपण खरोखर कोण आहोत हे ओळखणे आणि विशेषतः आपल्या जीवनात देवाच्या कृपेची किती गरज आहे हे जाणणे. देवाच्या कृपेशिवाय आपण असमर्थ आहोत, हे नम्रपणे मान्य केल्याशिवाय आपल्या अंतःकरणाची जमीन सुपीक होणार नाही.
यानंतर आपण देवावर पूर्ण भरवसा ठेवायला शिकले पाहिजे. आपण प्रथम नम्र झालो आणि आपण पूर्णपणे देवावर अवलंबून आहोत हे ओळखले, तर तो बोलतो तेव्हा आपल्याला त्याच्यावर भरवसा ठेवता येईल. आणि तो बोलेल तेव्हा आपण आनंदाने त्याचे ऐकू आणि त्याच्या आज्ञेचे पालन करू. तेव्हाच त्याच्या दयेचे चांगले फळ आपल्या जीवनात आणि आपल्यामार्फत इतरांच्या जीवनातही येऊ शकेल.
आज आपल्या अंतर्जीवनावर चिंतन करा. आपल्या अंतःकरणात काय आहे? ते कोरड्या, खडकाळ जमिनीसारखे आहे का? की तुम्ही आपल्या आत्म्याचे पोषण करण्याचा आणि देवाचे पवित्र वचन स्वीकारण्यासाठी त्याला तयार करण्याचा नियमित प्रयत्न करता? आपले अंतःकरण सुपीक जमिनीसारखे तयार करण्याचा प्रयत्न करा; तुमच्या जीवनात चांगले फळ आणण्याची काळजी प्रभू घेईल.
हे प्रभू, खऱ्या समृद्धीच्या स्वामी, तुझ्या परमपवित्र वचनासाठी मला खरोखर सुपीक जमीन बनू दे. तू जे काही सांगतोस ते सर्व मला स्वीकारता येऊ दे आणि श्रद्धेचे बीज माझ्या अंतःकरणात खोलवर रुजू दे. ही श्रद्धा वाढावी आणि तू देऊ इच्छित असलेले आशीर्वाद तिच्यातून फळाला यावेत, यासाठी मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत: संत अपोलिनारिस
मुख्य चित्र: चांगले बी पेरणारा ख्रिस्त, फ्लिकर




