8 ऑक्टोबर 2023
सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार (वर्ष अ)
आजची वाचने

येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही पवित्र शास्त्रात कधी वाचले नाही काय: बांधणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला आहे; हे प्रभूने केले आहे आणि आमच्या दृष्टीने ते अद्भुत आहे? म्हणून मी तुम्हाला सांगतो, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल आणि त्याचे फळ देणाऱ्या लोकांना ते दिले जाईल.” मत्तय 21:42–43
या जगात आजवर घडलेली सर्वांत विस्मयकारक घटना म्हणजे देवाच्या पुत्राचा मृत्यू. अनेक कारणांनी ही घटना विस्मयकारक आहे. दुष्ट लोकांनी आपल्या पुत्राचा निर्घृण वध करावा, हे देवपित्याने होऊ दिले, ही विस्मयाची गोष्ट आहे. आपला छळ थांबवण्यासाठी पुत्राने असंख्य देवदूतांना बोलावले नाही, हेही विस्मयकारक आहे. स्वतःची आई पाहत असताना येशूने क्रुसावरून क्षमेचे शब्द उच्चारले, हेही विस्मयकारक आहे. पण या घटनेतील कदाचित सर्वांत विस्मयकारक गोष्ट ही की, तिच्यामुळे चिरंतन तारणाची देणगी आपल्याला मिळणे शक्य झाले.
केवळ देवच आपल्या आकलनापलीकडच्या ज्ञानाने आणि सामर्थ्याने सर्वांत मोठ्या दुष्कृत्यातून सर्वांत मोठे कल्याण घडवू शकतो. देवाच्या पुत्राच्या निर्घृण वधापेक्षा अधिक दुष्ट कृत्य असू शकत नाही. आणि त्या घृणास्पद कृत्याचे रूपांतर मानवजातीच्या तारणाच्या निर्णायक कृत्यात होण्यापेक्षा अधिक गौरवशाली असे काही असू शकत नाही. येशू हा “बांधणाऱ्यांनी नाकारलेला दगड” होता. पण ज्या नव्या कृपामय जीवनासाठी आपल्याला बोलावले आहे, त्या जीवनाची “कोनशिला” पित्याने याच नाकारलेल्या दगडाला बनवले.
वर उद्धृत केलेल्या उताऱ्याने द्राक्षमळ्याच्या कुळांचा दृष्टांत संपतो. या दृष्टांतात तारणाच्या इतिहासाची रूपरेषा दिसते. पिता हा द्राक्षमळ्याचा मालक आहे, आणि द्राक्षमळा इस्राएलच्या लोकांचे प्रतीक आहे. कुळे म्हणजे त्या काळचे धर्मनेते. देवाच्या राज्याचे फळ गोळा करण्यासाठी पाठवलेल्या संदेष्ट्यांचा त्यांनी छळ केला. दृष्टांतातील मुलगा म्हणजे देवाचा पुत्र. येशूला ठार मारल्याने आपली सत्ता टिकून राहील, या चुकीच्या समजुतीने इस्राएलच्या नेत्यांनी त्याला ठार मारले. पण प्रत्यक्षात त्यांनी स्वतःचाच नाश ओढवून घेतला, आणि ज्याचा वध झाला तो पुत्र चर्चची कोनशिला आणि नवजीवनाचा स्रोत झाला.
आज देवाने आपला नवा द्राक्षमळा, म्हणजे चर्च, ज्यांच्या हाती सोपवला आहे, त्यांच्यापैकी तुम्ही एक आहात. तुम्ही विपुल प्रमाणात चांगले फळ द्यावे, अशी देवाची अपेक्षा आहे. चर्चची जबाबदारी पोप, बिशप आणि धर्मगुरू यांच्यावर विशेष रीतीने सोपवली असली, तरी सामान्य विश्वासू जनांवरही ती सोपवली आहे, प्रत्येकाच्या भूमिकेनुसार. प्रत्येकाने देवाच्या राज्यासाठी फळ दिले पाहिजे आणि आपल्यावर सोपवलेली जबाबदारी कशी पार पाडली, याचा हिशेब प्रत्येकाला द्यावा लागेल.
आपल्याकडे देण्यासारखे फारसे काही नाही, अशा विचाराच्या सापळ्यात आपण कधी कधी अडकतो. आपण पोप, बिशप किंवा निदान धर्मगुरू असतो, तर देवासाठी मोठी कामे करू शकलो असतो, असे आपल्याला वाटते. हे खरे असले, तरी राज्यासाठी विपुल प्रमाणात चांगले फळ देणे प्रत्येकाला शक्य आहे, हेही तितकेच खरे आहे. देव आपल्या सर्वांकडून हीच अपेक्षा करतो. याबद्दल तुम्हाला किंचितही शंका वाटत असेल, तर हे निर्विवाद सत्य पुन्हा आठवा: आजवर घडलेल्या सर्वांत मोठ्या दुष्कृत्यातून पित्याने आजवर ज्ञात असलेले सर्वांत मोठे कल्याण घडवले. देव मृत्यूतून नवे जीवन निर्माण करू शकतो, तर तो तुमच्याद्वारेही नक्कीच सामर्थ्यशाली कार्य करू शकतो. खरे तर, तुम्ही जितके दुर्बल असाल आणि स्वतःला जितके नगण्य समजाल, तितके अधिक चांगले फळ देव तुमच्याद्वारे घडवू शकतो.
आज या गौरवशाली सत्यावर चिंतन करा: देव स्वतःच्या दुःखसहनातून आणि मृत्यूतून जगाचे तारण घडवू शकतो, तर तुमच्या कल्पनेपलीकडच्या रीतीने तो तुमच्याद्वारेही कार्य करू शकतो. कदाचित तुम्ही प्रसिद्ध सुवार्ताप्रचारक होणार नाही. नावाजलेल्या एखाद्या सेवाकार्यात तुम्हाला यश मिळेलच असेही नाही. खरे तर, आयुष्यभर तुम्हाला पुष्कळ दुःख, छळ आणि हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात. तुमच्या जीवनाची परिस्थिती कशीही असो, तुमच्याद्वारे मोठी कार्ये घडवावीत आणि आपल्या राज्यासाठी विपुल चांगले फळ यावे, अशी देवाची इच्छा आहे. या कार्यासाठी स्वतःला समर्पित करा आणि या जगात देवाच्या कृपेची कोनशिला म्हणून त्याला तुमच्याद्वारे कार्य करू द्या.
हे माझ्या प्रभू, चर्चच्या कोनशिले, इस्राएलच्या नेत्यांनी तुला नाकारले आणि अत्यंत भयावह रीतीने तुझा वध केला. तरीही तू आपल्या गौरवशाली सामर्थ्याने त्या दुष्कृत्यातून सर्वांत मोठे कल्याण घडवलेस. माझे दुबळेपण आणि माझ्या वेदना, माझ्या क्षमता आणि माझे श्रम, हे सर्व मी तुला अर्पण करतो; माझे संपूर्ण जीवन मी तुला अर्पण करतो. माझ्याद्वारे कार्य कर आणि तुझ्या जीवनात सहभागी होण्यास मला मदत कर, म्हणजे तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्यासोबत मीही तुझ्या कृपेची कोनशिला होऊ शकेन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन
वरील विशेष चित्रे: गालील सरोवराच्या काठी उपदेश करणारा ख्रिस्त. रंगीत काचेतील चित्र कलाकार: हाउगिल





