7 एप्रिल 2024
दैवी दयेचा रविवार (वर्ष ब)
पास्काच्या अष्टकाचा आठवा दिवस

संत फौस्तिना आपल्या दैनंदिनीत लिहितात:
“माझी दया इतकी महान आहे की मनुष्याच्या किंवा देवदूताच्या बुद्धीलाही अनंतकाळात तिचा थांग लागणार नाही. जे काही अस्तित्वात आहे, ते सर्व माझ्या अत्यंत कोमल दयेच्या गाभ्यातून आले आहे. प्रत्येक आत्मा माझ्याशी असलेल्या आपल्या नात्यात माझ्या प्रेमाचे आणि दयेचे चिंतन अनंतकाळ करील. दयेचा सण माझ्या अंतःकरणातील कोमलतेच्या गाभ्यातून उदयाला आला. पास्कानंतरच्या पहिल्या रविवारी हा सण विधिपूर्वक साजरा व्हावा, अशी माझी इच्छा आहे. माझ्या दयेच्या झऱ्याकडे वळल्याशिवाय मानवजातीला शांती लाभणार नाही” (दैनंदिनी, परिच्छेद 699).
देवाच्या प्रेमाचे आणि दयेचे अनंतकाळ चिंतन करणे कसे असेल? काहींना ही कल्पना सुरुवातीला फारशी आकर्षक वाटणार नाही. अनंतकाळ आपण केवळ देवाच्या दयेचे चिंतन करत राहिलो, तर त्याचा कंटाळा येणार नाही का? तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल, तर ही कल्पना सुरुवातीला आकर्षक न वाटण्याचे कारण हेच आहे की हे चिंतन किती तृप्तिदायक आणि गौरवमय असेल, याची तुम्हाला कल्पना येत नाही. येशू म्हणाला, “माझी दया इतकी महान आहे की मनुष्याच्या किंवा देवदूताच्या बुद्धीलाही अनंतकाळात तिचा थांग लागणार नाही.”
पास्काच्या अष्टकाचा आठवा दिवस असलेला हा रविवार दयेचा सण म्हणून साजरा व्हावा, अशी देवाची इच्छा होती. पास्काच्या अष्टकाच्या शेवटच्या दिवशी हा सण ठेवून देव आपल्याला सांगतो की या सणाचा संदेश आपल्या जीवनाचा अंतिम हेतू उलगडून दाखवतो. पास्काचा सण हा आपल्या उद्धाराच्या परिपूर्ण योजनेचा परमोच्च बिंदू आहे. आणि दैवी दयेचा रविवार ही त्या परिपूर्ण योजनेची परिणती आहे. म्हणून या सणातून मिळणारा संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करण्याइतकी महत्त्वाची दुसरी कोणतीही गोष्ट नाही.
उदाहरणार्थ, तुम्हाला नवी गाडी मिळाली, पण ती तुम्ही कधी चालवलीच नाही, तर त्या गाडीचा काहीच उपयोग होणार नाही. किंवा तुम्हाला लॉटरी लागली, पण ते पैसे न वापरता खात्यातच पडून राहिले, तर त्याचा काय फायदा? किंवा तुम्ही गंभीर आजारी असताना तो आजार बरा करणारे औषध तुम्हाला मिळाले, पण तुम्ही ते घेतलेच नाही, तर तुम्ही आजारीच राहाल. त्याचप्रमाणे, येशूच्या मृत्यूवर आणि पुनरुत्थानावर आपला विश्वास असला, तरी त्या कृतीतून आपल्याला लाभलेल्या दयेला आपण आपले जीवन बदलू दिले नाही, तर त्याचा खरा अर्थच आपल्या लक्षात आलेला नाही. दैवी दया हाच जीवनाचा खरा अर्थ आहे. तिचाच शोध घेणे सार्थ आहे. समाधान आणि तृप्ती यांचा तोच एकमेव झरा आहे. आपल्या व्याधींवर तीच एकमेव औषध आहे. खऱ्या संपत्तीचा तोच एकमेव स्रोत आहे. तीन शब्दांत सांगायचे तर: तीच सर्वकाही आहे!
आपला अनंतकाळ त्याच्या दयेच्या चिंतनात जाईल, असे येशू म्हणतो, तेव्हा हे चिंतन आपण मृत्यूनंतरच करू, असा त्याचा अर्थ नाही. हे खरे आहे की जेव्हा आपल्याला देवाचे आनंदमय प्रत्यक्ष दर्शन लाभेल आणि आपण अनंतकाळ देवाचे चिंतन करू, तेव्हा त्याची दया आपल्यासमोर पूर्णपणे उलगडली जाईल. पण ‘अनंतकाळात’ आजचाही समावेश आहे. आपण जिथे आहोत, तो हा क्षणही त्यात येतो. म्हणून आज आपल्या जीवनात दैवी दयेचे चिंतन करणे हेच सर्वांत महत्त्वाचे ध्येय असले पाहिजे. ते आपले मुख्य ध्येय झाले की जीवनातील इतर सर्व गोष्टी आपापल्या जागी बसतील आणि या ध्येयाला पूरक ठरतील.
दैवी दयेचे चिंतन हे आपल्या जीवनाचे सर्वांत महत्त्वाचे ध्येय बनवायचे असेल, तर ही दया समजून घेण्यास तुम्ही सुरुवात केली पाहिजे. म्हणूनच आपल्याला हा खास दिवस, दयेचा हा परम पवित्र सण, देण्यात आला आहे. म्हणून या देणगीचे अधिक सखोल चिंतन करण्याची संधी म्हणून या दिवसाचा उपयोग करा. संत फौस्तिना यांच्याद्वारे देवाची दया जशी आपल्याला प्रकट झाली, त्याविषयी वाचण्यापासून सुरुवात करा. येशूचे शब्द वाचण्यासाठी वेळ काढा: त्याने आपल्या दयेविषयी दिलेले स्पष्टीकरण, केलेले वर्णन आणि प्रकट केलेल्या गोष्टी वाचा. असे करताना ही दया अजूनही आपल्या आकलनापलीकडे आहे असे वाटले, तर काळजी करू नका. ती आपल्या आकलनापलीकडेच आहे! तरीही, आपला अनंतकाळ त्याच्या दयेच्या चिंतनात जाईल असे येशूने आपल्याला वचन दिले आहे. म्हणून आपण असा विश्वास ठेवला पाहिजे की आताच आपण त्या चिंतनात जितके अधिक खोल जाऊ, तितके आपले जीवन अधिक गौरवमय होईल. या दयेची खरी गोडी आपल्याला चाखता आली, तिच्या महानतेची थोडीशी झलक दिसली आणि तिच्या अर्थाचा अगदी छोटासा पैलू जरी समजला, तरी या प्रयत्नातून आपल्याला खरोखर मोठे समाधान मिळेल.
आज दैवी दयेचे चिंतन करा. त्याची दया तुम्हाला कधीही पूर्णपणे समजणार नाही, हे देवासमोर आणि स्वतःशीही कबूल करा आणि अशा रीतीने प्रार्थनेत नम्र व्हा. ही कबुली प्रार्थनेत द्या. देवाच्या दयेविषयी वाचणे महत्त्वाचे आहे; पण प्रार्थनेतूनच आपल्या चिंतनाची सुरुवात होईल. आणि या चिंतनातूनच आपण आपल्या जीवनाच्या मुख्य हेतूनुसार जगू लागू.
हे गौरवशाली दैवी दये, माझ्यावर विपुलपणे बरस; तुझी खोली आणि विशालता जाणण्यासाठी माझे मन उघड. तुझ्या परिपूर्ण स्वरूपाचे चिंतन करायला मला मदत कर, जेणेकरून तुझ्यासोबतचे माझे अनंत जीवन आताच सुरू होऊ शकेल. हे माझ्या प्रेमळ तारणाऱ्या, तू तुझ्या दयेविषयी कितीतरी गोष्टी प्रकट केल्या आहेत. या देणगीविषयी केवळ जाणून घेण्यावर मी थांबू नये, तर ती माझ्या जीवनात स्वीकारावी. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
+++
देवाच्या दैवी दयेवर विश्वास ठेवण्यासाठी प्रार्थना
हे परमदयाळू येशू,
मला आधाराची गरज आहे म्हणून मी तुझ्याकडे वळतो.
मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवावा, असा तू आहेस.
तू सर्व बाबतींत विश्वासू आहेस.
माझ्या जीवनात गोंधळ माजतो तेव्हा मला स्पष्ट दृष्टी आणि श्रद्धा दे.
निराशेला शरण जाण्याचा मोह होतो तेव्हा माझा आत्मा आशेने भरून टाक.
हे परमदयाळू येशू,
सर्व बाबतींत माझा तुझ्यावर विश्वास आहे.
माझ्या जीवनासाठी असलेल्या तुझ्या परिपूर्ण योजनेवर माझा विश्वास आहे.
तुझी दैवी इच्छा मला समजत नाही, तेव्हाही माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सगळेच हातचे गेले असे वाटते, तेव्हाही माझा तुझ्यावर विश्वास आहे.
हे येशू, माझा स्वतःपेक्षाही तुझ्यावर अधिक विश्वास आहे.
हे परमदयाळू येशू,
तू सर्वज्ञ आहेस.
तुझ्या नजरेतून काहीही सुटत नाही.
तू सर्वांवर प्रेम करतोस.
माझ्या जीवनात अशी कोणतीही गोष्ट नाही जिची तुला काळजी नाही.
तू सर्वसमर्थ आहेस.
असे काहीही नाही जिथे तुझी कृपा पोहोचू शकत नाही.
हे परमदयाळू येशू,
माझा तुझ्यावर विश्वास आहे,
माझा तुझ्यावर विश्वास आहे,
माझा तुझ्यावर विश्वास आहे.
मला सदैव आणि सर्व बाबतींत तुझ्यावर विश्वास ठेवता येऊ दे.
तुझ्या दैवी दयेला मला दररोज स्वतःला सोपवता येऊ दे.
हे परमधन्य कुमारी मरिये, दयामाते,
आमच्या गरजेच्या वेळी आम्ही तुझ्याकडे वळतो; आमच्यासाठी प्रार्थना कर.
आमेन.
दयेच्या सणाविषयी येशूने संत फॉस्टिनांना आणखी काय सांगितले
दैवी दयेच्या रविवारनिमित्त पापांच्या ऐहिक दंडातून सूट
संत फॉस्टिनाची दैवी दयेची विनवणीमाला
जपमाळ – गौरवाची रहस्ये (पवित्र शास्त्रातील उताऱ्यांसह)
आजचे संत – संत जॉन बाप्तिस्त द ला साल, धर्मगुरू
यंदा हा दिवस रविवारी येत असल्याने त्यांचे विधिपूर्वक स्मरण साजरे केले जात नाही
पुनरुत्थानकाळासाठी पवित्र शास्त्रावरील मनन




