19 नोव्हेंबर 2025
सामान्य काळातील तेहतिसाव्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने
विलेम दे पोर्टर, सार्वजनिक मालकीतील कलाकृती, विकिमीडिया कॉमन्समार्फत
“एक उमराव स्वतःसाठी राजपद मिळवून परत येण्याच्या हेतूने दूरच्या देशात गेला. त्याने आपल्या दहा सेवकांना बोलावले, त्यांना सोन्याची दहा नाणी दिली आणि सांगितले, ‘मी परत येईपर्यंत ही नाणी व्यापारात लावा.’ पण त्याच्या देशबांधवांना त्याचा तिरस्कार होता. त्यांनी त्याच्यामागून एक शिष्टमंडळ पाठवून कळवले, ‘हा माणूस आमचा राजा व्हावा, अशी आमची इच्छा नाही.’” लूक 19:12–14
या दाखल्यात तीन प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारात असे लोक येतात, ज्यांना सोन्याचे एक नाणे मिळाले आणि ‘मी परत येईपर्यंत ते व्यापारात लावा’ ही धन्याची सूचना त्यांनी पाळली. दुसऱ्या प्रकारात असे लोक येतात, ज्यांना तीच आज्ञा मिळाली, पण आळसामुळे आपल्या प्रभूने त्यांना जे दिले त्यातून ते कोणतेही चांगले फळ मिळवू शकले नाहीत. तिसऱ्या प्रकारात असे लोक येतात, जे आपल्या प्रभूचा ‘तिरस्कार करतात’ आणि तो आपला राजा असावा असे त्यांना वाटत नाही.
राजा परतल्यावर पहिल्या प्रकारचे लोक कोण, हे त्या दोन सेवकांवरून दिसते. त्यांनी सोन्याची नाणी व्यापारात लावली आणि एकाने आणखी पाच, तर दुसऱ्याने आणखी दहा नाणी मिळवली. हे लोक प्रेषितकार्याच्या उत्साहाने भरलेले असतात. आपल्याला मिळालेल्या देणग्यांचा उपयोग करून पृथ्वीवर त्याचे राज्य वाढवावे, असे पाचारण देव आपल्याला करतो; एवढेच नव्हे, तर आपण तसे करावे अशी त्याची अपेक्षाही आहे. ही अपेक्षा म्हणजे प्रेमाची आज्ञा आहे. ज्यांना ही आज्ञा समजते, त्यांना ती अनेकांच्या जीवनात अनंतकाळ टिकणारा बदल घडवण्याचे गौरवशाली आमंत्रण वाटते. ज्या प्रेषितकार्याकरिता त्यांना पाचारण केले आहे, ते त्यांना ओझे वाटत नाही. उलट, त्या कामात त्यांना आनंद मिळतो आणि तो आनंद त्यांच्या प्रयत्नांना बळ देतो. परिणामी, त्यांच्या कार्याचे फळ देवाच्या राज्यासाठी अनेक पटींनी वाढेल.
दुसऱ्या प्रकारचे लोक कसे असतात, हे भीतीपोटी आपले एक सोन्याचे नाणे ‘रुमालात गुंडाळून ठेवणाऱ्या’ सेवकावरून दिसते. हे लोक भीतीमुळे शुभवर्तमानाचा प्रसार करणे आणि देवाचे राज्य वाढवणे टाळतात. भीती माणसाला निष्क्रिय करते. पण भीतीपुढे शरण जाणे हे पाप आहे. त्यातून देवावरील श्रद्धेचा आणि भरवशाचा अभाव दिसतो. देवाची सेवा करायला आपल्याला धैर्य लागणारच. त्यासाठी आपल्याला आपल्या सवयीच्या चौकटीतून बाहेर पडावे लागेल आणि जे करायला सुरुवातीला संकोच वाटेल, तेही करावे लागेल. पण दाखल्यातील त्या सेवकाने आधीच म्हटल्याप्रमाणे, देव आपल्याकडून हिशेब मागतो. देवाचे राज्य उभारण्यासाठी आपण उत्साहाने हातभार लावला नाही, तर भीतीची सबब तो मान्य करणार नाही.
तिसऱ्या प्रकारच्या लोकांमध्ये मात्र आपण मुळीच असू नये. हे लोक देवाच्या राजसत्तेला खीळ घालण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात आणि देव म्हणून त्याला नाकारतात. जगात असे लोक पुष्कळ आहेत. या प्रकारच्या लोकांविषयी आपल्या प्रभूने जे म्हटले, तेवढेच सांगणे पुरेसे आहे: “आता, मी त्यांचा राजा व्हावे अशी इच्छा नसलेल्या माझ्या त्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा.”
आज चिंतन करा: तुमचे जीवन यांपैकी कोणत्या प्रकारच्या लोकांशी सर्वाधिक जुळते? बहुधा पहिल्या दोन प्रकारांपैकी एखाद्याशी. देवाच्या राज्यासाठी तुमच्या मनात मोठा उत्साह आहे का? त्याचे राज्य उभारण्यासाठी तुमच्या परीने शक्य ते सर्व करण्याची तुमची तयारी आहे का? त्यासाठी मोठा वैयक्तिक त्याग करावा लागला तरी तुम्ही तयार आहात का? तसे असेल, तर आनंद करा आणि लक्षात ठेवा की मोठे प्रतिफळ तुमची वाट पाहत आहे. पण तुम्ही भीतीशी झगडत असाल, विशेषतः शुभवर्तमानाचा प्रसार करण्याची, ते इतरांना सांगण्याची आणि नम्रतेने व प्रेमाने आपली श्रद्धा उघडपणे जगण्याची तुम्हाला भीती वाटत असेल, तर या दाखल्यावर आणि रुमालात नाणे लपवणाऱ्या त्या सेवकाचे काय झाले यावर आणखी वेळ देऊन चिंतन करा. प्रेषितकार्यात सहभागी व्हा. देवाचे राज्य वाढवण्यासाठी स्वतःला वाहून घ्या. सगळी भीती दूर करा आणि लक्षात ठेवा की देवाच्या सेवेत आणि त्याचे राज्य उभारण्यात स्वतःला तनमनाने झोकून दिल्याचा तुम्हाला कधीही पश्चात्ताप होणार नाही.
हे माझ्या प्रभू, तू माझ्यावर पुष्कळ काही सोपवले आहेस. तुझ्या कृपेचे राज्य उभारण्यास हातभार लावण्यासाठी तू मला दिलेल्या सर्व गोष्टींचा मी उपयोग करावा, अशी तुझी आज्ञा आहे. या प्रेषितकार्यासाठी तू मला पाचारण करतोस आणि माझ्याद्वारे ते कार्य करतोस, हे माझे केवढे भाग्य! प्रिय प्रभू, मला सर्व भीतीतून मुक्त कर, म्हणजे तू ज्या प्रकारे मला सेवा करण्यास बोलावतोस, त्या प्रकारे तुझी सेवा करायला मी कधीही कचरणार नाही. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
ख्रिस्त राजाची नोवेना
परंपरेनुसार ख्रिस्त राजाच्या महोत्सवापूर्वीच्या नऊ दिवसांत म्हटली जाते
१४ ते २२ नोव्हेंबर २०२५ या काळात दररोज ही नोवेना म्हटली जाते
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन



