मराठी

ऐक्यातून सुवार्तेचा प्रसार

बुधवार, 15 मे 2019

पुनरुत्थानकाळातील चौथ्या आठवड्याचा बुधवार

आजची वाचने

संत इसिदोर – अमेरिकेतील ऐच्छिक स्मृतिदिन

येशू मोठ्या आवाजात म्हणाला, “जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो केवळ माझ्यावरच नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्यावरही विश्वास ठेवतो; आणि जो मला पाहतो, तो ज्याने मला पाठवले त्यालाही पाहतो.” योहान 12:44-45

हे शब्द शब्दशः घेतले, तर त्यांचा अर्थ समजणे कठीण आहे. येशूकडे पाहणाऱ्यांना पिताही कसा दिसत होता? येशूला पाहणे म्हणजे स्वर्गातील पित्याला पाहणे, हे कसे शक्य आहे?

उत्तर अगदी सोपे आहे. पिता आणि पुत्र यांच्यातील ऐक्य परिपूर्ण आहे. ते स्वतंत्र दैवी व्यक्ती आहेत, तरीही ते एक आहेत. त्यांचे परस्पर प्रेम परिपूर्ण आहे आणि त्यांच्या इच्छांमध्येही परिपूर्ण ऐक्य आहे.

म्हणूनच येशूला ओळखणे म्हणजे पित्यालाही ओळखणे. पण पुत्राचे देवत्व जसे झाकलेले आहे, तशीच पित्याची उपस्थितीही झाकलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. पहिल्या शिष्यांनी येशूला या पृथ्वीवर वावरताना पाहिले; तसा अनुभव आपल्याला नसला, तरी पवित्र युकरिस्तासमोर येतो तेव्हा प्रत्येक वेळी तेच सत्य आपल्यासमोर असते. चर्चमध्ये प्रवेश करून पवित्र संस्काराच्या मंजूषेसमोर एक गुडघा टेकतो, तेव्हा आपण देवपुत्राच्या पूर्ण दैवी उपस्थितीत आहोत, याचे विशेष भान आपण नेहमी ठेवले पाहिजे. आणि म्हणूनच आपण देवपित्याच्याही पूर्ण दैवी उपस्थितीत आहोत! त्यांची उपस्थिती खरी आणि संपूर्ण आहे. फक्त ती आपल्या पाच ज्ञानेंद्रियांना जाणवत नाही.

पण इथे चिंतन करण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्यातील ऐक्य. त्यांच्या ऐक्यावर प्रार्थनापूर्वक चिंतन करणे आपल्या प्रार्थनाजीवनासाठी फार हितकारक आहे. का? कारण त्यांच्या ऐक्यात सहभागी व्हायला आणि एकमेकांशीही ऐक्याने राहायला आपल्याला बोलावले आहे.

एकात्मता साधणे सोपे नाही. त्यासाठी अपार प्रेम लागते. एकात्मता म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपले पूर्ण लक्ष देणे आणि तिला पूर्णपणे समजून घेण्याचा, स्वीकारण्याचा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणे. यासाठी पवित्र त्रैक्य आपला आदर्श आहे. नाते आई-वडील आणि मुलांचे असो, पती-पत्नीचे असो, मित्रांचे असो किंवा इतर कोणतेही असो, त्या नात्यात खोल आणि टिकाऊ एकात्मता साधण्याचे आपल्याला आवाहन आहे.

तुमच्या चांगल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचा विचार करा. मग त्या व्यक्तीच्या चांगल्या ओळखीच्या आणि तिला प्रिय असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा विचार करा. पहिल्या व्यक्तीशी तुमची ओळख आहे, एवढ्यावरूनही दुसरी व्यक्ती आपल्याला काही प्रमाणात परिचित आहे, असे तुम्हाला वाटू शकते. उदाहरणार्थ, तुमच्या एखाद्या जिवलग मित्राला मूल आहे आणि तो आपल्या मुलाबद्दल तुम्हाला बरेच काही सांगतो, असे समजा. मित्राशी असलेल्या तुमच्या नात्यातून तुम्हाला त्या मित्राची आणि त्याच्या मुलाची एकात्मता अनुभवायला मिळते.

देवाच्या बाबतीतही असेच आहे. देवपुत्राची ओळख होत गेली की देवपित्याचीही ओळख आपोआप होत जाते. आनंदाची बातमी अशी की, जर आपण देवाला ओळखत असलो आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आपल्याला जाणून घेऊ दिले, तर आपल्यामार्फत तिलाही देवाची ओळख होऊ शकते. आपल्या ओळखीच्या आणि आपल्याला प्रिय असलेल्या लोकांपर्यंत सुवार्ता आणि देवाची ओळख पोहोचवण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे.

आज देवाशी असलेल्या तुमच्या नात्यावर आणि त्या नात्याचे तेज तुमच्या इतर सर्व नात्यांत कसे झळकते, यावर चिंतन करा. देवाला अधिक जवळून ओळखण्यासाठी आणि त्याच्यावर अधिक प्रेम करण्यासाठी स्वतःला अधिक पूर्णपणे वाहून घ्या, जेणेकरून तुमच्या देवावरील प्रेमाचा लाभ तुमच्या आसपासच्या लोकांनाही होईल.

हे प्रभू, तुला ओळखायला आणि तुझ्यावर प्रेम करायला मला मदत कर. तुझ्याशी असलेल्या या नात्यातून पित्याला आणि पवित्र आत्म्याला ओळखायला व त्यांच्यावर प्रेम करायलाही मला मदत कर. हे परमपवित्र त्रैक्या, तुझ्यावरचे माझे प्रेम जसे वाढत जाईल, तसे ते प्रेम माझ्या प्रत्येक नात्यात आणायला मला मदत कर, जेणेकरून तुझे प्रेम इतरांपर्यंत पोहोचवण्याचे साधन मी होऊ शकेन. हे परमपवित्र त्रैक्या, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत – संत इसिदोर