मराठी

जीवन ‘सामान्य’ आहे का?

13 जानेवारी 2020
सामान्य काळातील पहिल्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने

प्वातियेचे संत हिलरी, बिशप आणि चर्चचे धर्माचार्य — ऐच्छिक स्मृतिदिन

गालिलीच्या समुद्राकाठून जात असताना येशूने सिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया यांना समुद्रात जाळी टाकताना पाहिले; ते मच्छीमार होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या; मी तुम्हाला माणसे धरणारे मच्छीमार करीन.” तेव्हा त्यांनी आपली जाळी सोडली आणि ते त्याच्यामागे गेले. मार्क 1:16-18

नाताळचा काळ आता संपला आहे आणि आपण सामान्य काळाच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश करत आहोत. पुन्हा ‘नेहमीच्या’ जीवनाकडे वळण्याची ही वेळ आहे. पण ख्रिस्ती जीवन खरोखरच सामान्य आहे का? येशूच्या मागे चालण्यात खरोखर काही ‘सामान्य’ आहे का?

आजच्या शुभवर्तमानात येशूची असामान्य हाक आपल्याला ऐकू येते: सर्वस्व सोडून त्याच्या मागे येण्याची हाक. या उताऱ्यात सिमोन आणि आंद्रेया हे दोघे त्या हाकेला प्रतिसाद देतात. पण त्यांचा प्रतिसाद हे आपल्या सर्वांसाठीही एक आमंत्रण आहे—नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडून असामान्य जीवनात पाऊल ठेवण्याचे आमंत्रण.

या उताऱ्यात दोन गोष्टी विशेष ठळकपणे दिसतात: 1) या प्रेषितांनी लगेच प्रतिसाद दिला आणि 2) त्यांनी काहीही राखून न ठेवता प्रतिसाद दिला. आपल्या मागे येण्याच्या येशूच्या आमंत्रणाला प्रतिसाद देताना त्यांनी ना आखडता हात घेतला, ना क्षणभरही संकोच केला.

आणि तुमचे काय? येशू तुम्हाला हाक मारत आहे, हे तुम्हाला ऐकू येते का? ‘माझ्यामागे ये,’ असे तो तुम्हाला म्हणत आहे, हे तुम्हाला ऐकू येते का? आपला प्रभू आपल्यापैकी प्रत्येकाशी बोलतो, तेव्हा आपण लगेच आणि काहीही राखून न ठेवता प्रतिसाद देऊ, अशी आशा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला मिळालेल्या या गौरवशाली पाचारणाचा स्वीकार करताना आपण संकोच करणार नाही, अशीही आशा आहे.

आज या गोष्टीवर चिंतन करा: तुम्हालाही कृपेचे असामान्य जीवन जगण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. त्या जीवनासाठी पूर्ण आत्मसमर्पण आणि निष्ठा आवश्यक आहेत. येशूच्या आमंत्रणाला तत्काळ आणि स्वेच्छेने प्रतिसाद देण्यास तुम्हाला बोलावले आहे. उपासनेच्या वर्षातील या सामान्य काळाच्या सुरुवातीला कृपेच्या त्या असामान्य जीवनात उत्साहाने पाऊल टाका आणि त्याचा मनापासून स्वीकार करा.

प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. कृपेचे असामान्य जीवन जगण्यासाठी तू मला बोलावलेस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. माझे मन आणि माझी इच्छाशक्ती पूर्णपणे तुझ्या अधीन करून तुझ्या आमंत्रणाला प्रतिसाद देण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण