रविवार, १२ जानेवारी २०२०
प्रभूचा बाप्तिस्मा – सण

सर्व लोकांचा बाप्तिस्मा झाल्यावर येशूनेही बाप्तिस्मा घेतला. तो प्रार्थना करीत असताना आकाश उघडले आणि पवित्र आत्मा कबुतरासारख्या देहधारी रूपात त्याच्यावर उतरला. स्वर्गातून एक वाणी ऐकू आली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस; तुझ्यावर मी फार प्रसन्न आहे.” लूक 3:21-22 (वर्ष क)
आजच्या सणाने नाताळकाळ संपतो आणि सामान्य उपासनाकाळ सुरू होतो. येशूच्या अप्रकट जीवनातून त्याच्या सार्वजनिक सेवाकार्यात होणाऱ्या संक्रमणाचा हा सण आहे. प्रभूच्या प्रकटीकरणाचा आशयही या सणात पुन्हा उमटतो. कारण प्रभूचा बाप्तिस्मा हे आणखी एक प्रकटीकरण आहे, ज्याद्वारे येशूचे देवत्व त्याच्या सर्व आरंभीच्या अनुयायांना आणि बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाच्या शिष्यांना जाहीर होते.
सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की येशूला योहानाकडून बाप्तिस्मा घेण्याची गरज नव्हती. योहान देत असलेला बाप्तिस्मा हा अंतःकरणापासून पश्चात्ताप करण्याचे आवाहन आणि त्या पश्चात्तापाचे चिन्ह होता. येशूला पश्चात्ताप करण्याची गरज नव्हती. तरीही तो योहानाकडे येतो. योहान सुरुवातीला नकार देतो, पण येशू आग्रह धरतो. येशूने बाप्तिस्मा का घेतला?
पहिली गोष्ट म्हणजे, योहानाकडून बाप्तिस्मा स्वीकारून येशूने योहानाने जे काही सांगितले आणि केले, त्या सर्वाला दुजोरा दिला. येशूसाठी आणि कृपेच्या नव्या युगासाठी मार्ग तयार करण्याच्या योहानाच्या पवित्र भूमिकेलाही त्याने मान्यता दिली. अशा रीतीने येशूचा बाप्तिस्मा जुन्या करारातील संदेष्टे (ज्यांच्यातला शेवटचा संदेष्टा योहान होता) आणि नव्या करारातील कृपेचे व सत्याचे युग यांना जोडणारा दुवा ठरतो.
दुसरी गोष्ट म्हणजे, असे म्हटले जाते की येशू बाप्तिस्म्यासाठी पाण्यात उतरला तेव्हा पाण्याने त्याचा बाप्तिस्मा झाला नाही; उलट, त्याच्या बाप्तिस्म्यात या जगातील सर्व निर्मित जलाचा एका अर्थाने त्याच्याकडून ‘बाप्तिस्मा’ झाला. पाण्यात उतरून येशूने ते पवित्र केले आणि आपली कृपा विपुलपणे ओतली. अशा रीतीने पुढे सर्व पाणी तारणाचे साधन बनले.
तिसरी गोष्ट म्हणजे, येशूचा बाप्तिस्मा हे एक प्रकटीकरण होते. त्या क्षणी त्याचे देवत्व प्रकट झाले. तो पाण्यातून वर आला तेव्हा, “आकाश उघडले आणि पवित्र आत्मा कबुतरासारख्या देहधारी रूपात त्याच्यावर उतरला. स्वर्गातून एक वाणी ऐकू आली, ‘तू माझा प्रिय पुत्र आहेस; तुझ्यावर मी फार प्रसन्न आहे.’” येशूचे पुत्रत्व आणि देवत्व अशा मूर्त रूपात प्रकट झाले की ते उपस्थितांना दिसलेही आणि ऐकूही आले. त्यामुळे येशू हा पित्याचा पुत्र आहे, हे त्यांना निःसंशयपणे कळले. अशा प्रकारे, येशूच्या बाप्तिस्म्याद्वारे पित्याने आपल्या पुत्राची आणि त्याच्या कार्याची जगाला ओळख करून दिली.
सामान्य उपासनाकाळ सुरू करण्याची तयारी करताना, येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी पित्याने उच्चारलेल्या या शब्दांवर आज चिंतन करा. पिता आपल्या पुत्राच्या देवत्वाविषयी तुम्हाला काय सांगत आहे, ते ऐका. आपली दृष्टी येशूकडे वळवा आणि त्याचे अनुसरण करण्यास व त्याचा प्रत्येक शब्द मनावर घेण्यास स्वतःला तयार करा. आपल्याला पित्याकडे आणण्यासाठी त्याला या जगात पाठवण्यात आले. ते कार्य तुमच्या स्वतःच्या जीवनात पूर्ण करू द्या.
हे प्रभू, तू सनातन पित्याचा पुत्र आणि जगाचा तारणारा आहेस, असा माझा विश्वास आहे. तू कृपेचे आणि सत्याचे नवे युग आणले आहेस आणि तू मला जिथे नेशील तिथे तुझ्यामागे जाण्याचे मला पाचारण आहे, असाही माझा विश्वास आहे. आता सामान्य उपासनाकाळ सुरू होत असताना, हा काळ माझ्यासाठी असामान्य कृपेचा ठरो आणि दररोज मी तुझी वाणी ऐकून त्याप्रमाणे वागावे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.




