20 जानेवारी 2020
सामान्य काळातील दुसऱ्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने
संत सेबास्टियन, रक्तसाक्षी — ऐच्छिक स्मरणदिन

जुन्या अंगरख्याला न आकसलेल्या कापडाचे ठिगळ कोणीही लावत नाही. तसे केले, तर नवे ठिगळ आकसताना जुने कापड ओढते आणि फाटलेली जागा आणखी मोठी होते. मार्क 2:21
येशूने दिलेली ही उपमा आपण सर्वांनी याआधी ऐकली आहे. असे वचन आपण सहज ऐकतो आणि त्याचा अर्थ समजून न घेताच त्याकडे दुर्लक्ष करतो. या उपमेचा अर्थ तुम्हाला समजतो का?
या उपमेनंतर येशू नवा द्राक्षारस जुन्या चामड्याच्या पखालींत ओतण्याची उपमा देतो. तो म्हणतो की असे कोणीही करत नाही, कारण त्यामुळे जुन्या पखाली फुटतील. म्हणून नवा द्राक्षारस नव्या पखालींत ओततात.
या दोन्ही उपमा एकच आध्यात्मिक सत्य सांगतात. येशूच्या सुवार्तेचा नवा, जीवन पालटणारा संदेश स्वीकारायचा असेल, तर आपण आधी नवी सृष्टी बनले पाहिजे, हे त्या दाखवून देतात. आपल्या जुन्या पापमय जीवनात कृपेचे हे नवे दान सामावू शकत नाही. म्हणून येशूचा संदेश पूर्णपणे स्वीकारण्यासाठी प्रथम आपली नव्याने घडण होणे आवश्यक आहे.
पवित्र शास्त्रातील हे वचन आठवा: “ज्याच्याजवळ आहे, त्याला आणखी दिले जाईल; आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे आहे तेही त्याच्याकडून काढून घेतले जाईल” (मार्क 4:25). हे वचनही असाच बोध देते. कृपेच्या नवतेने आपण भरून जातो, तेव्हा आपल्याला आणखी कृपा लाभते.
येशू तुम्हाला देऊ इच्छितो तो “नवा द्राक्षारस” आणि ते “नवे ठिगळ” नेमके काय आहे? आपले जीवन नव्याने घडू देण्यास तुम्ही तयार असाल, तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला जितकी अधिक कृपा लाभते, तितकीच आणखी कृपा तुमच्यावर ओतली जाते. ज्याला आधीच विपुल कृपा लाभली आहे, त्याला आणखी विपुलतेने दिले जाते. जणू एखाद्याला लॉटरी लागली आणि आपल्या पाहण्यातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तीला त्याने बक्षिसाची सारी रक्कम देण्याचे ठरवले. कृपा अशीच कार्य करते. पण आनंदाची बातमी ही आहे की आपण सर्वांनी कृपेने समृद्ध व्हावे, अशी देवाची इच्छा आहे.
आज येशूच्या या शिकवणीवर मनन करा. तुम्ही आधी स्वतःला नव्याने घडू देण्यास तयार असाल, तर तुमच्या जीवनात विपुल कृपा ओतण्याची त्याची इच्छा आहे, हे लक्षात ठेवा.
हे प्रभू, तू मला नव्याने घडवावे, अशी माझी इच्छा आहे. तुझ्या पवित्र वचनांतून तू माझ्यावर आणखी विपुल कृपा ओतावी म्हणून तुझ्या कृपेत नवे जीवन जगण्याची माझी इच्छा आहे. हे प्रिय प्रभू, तू माझ्यासाठी राखून ठेवलेल्या समृद्ध जीवनाचा स्वीकार करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.




