१६ मार्च २०२०
प्रायश्चित्तकाळातील तिसऱ्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने

जिवंत देवासाठी माझा जीव तहानला आहे. मी कधी जाऊन देवाचे मुख पाहीन? (पाहा स्तोत्र 42:3)
हे किती सुंदर उद्गार आहेत! ‘तहानला’ हा शब्द आपण फारसा वापरत नाही, पण त्या एका शब्दावरही मनन करण्यासारखे आहे. त्यातून अशी तळमळ व्यक्त होते की ही तहान केवळ देवाने नव्हे, तर ‘जिवंत देवाने’ भागवावी! आणि त्याचे मुख पाहण्याचीही ओढ त्यातून व्यक्त होते.
तुम्हाला अशी ओढ कितीदा लागते? देवाला भेटण्याची आस तुमच्या अंतःकरणात कितीदा प्रज्वलित होऊ देता? अशी आस, अशी तळमळ असणे ही किती सुंदर गोष्ट आहे! खरे तर, केवळ ही आसही जीवनात खोल समाधान आणि परिपूर्णतेची अनुभूती देऊ लागते.
एका वृद्ध संन्याशाची गोष्ट आहे. ते एकांतवासात राहत होते आणि मठातील धर्मभगिनींच्या समुदायासाठी धर्मगुरू व आध्यात्मिक सेवक म्हणून काम पाहत होते. त्यांनी आपल्या आयुष्याचा बहुतेक काळ एकांतात, प्रार्थना, अध्ययन आणि काम यांत अगदी शांतपणे घालवला. आयुष्याच्या अखेरीस एके दिवशी त्यांना विचारले गेले, ‘इतकी वर्षे तुम्हाला तुमचे जीवन कसे वाटले?’ क्षणाचाही विलंब न लावता त्यांचा चेहरा गहिऱ्या आनंदाने उजळून निघाला. ते पूर्ण खात्रीने म्हणाले, “माझे जीवन किती धन्य आहे! दररोज मी मरणासाठी तयारी करतो.”
या संन्याशाच्या जीवनात एकच ध्येय होते: देवाचे मुख पाहणे. बाकी कशालाच खरे महत्त्व नव्हते. त्या गौरवमय परमसुखद दर्शनात देवाला समोरासमोर पाहण्याचा क्षण कधी येईल, याची ते रोज आतुरतेने वाट पाहत. याच विचाराने त्यांना दिवसेंदिवस, वर्षानुवर्षे पुढे चालत राहण्याचे बळ दिले. त्या गौरवमय भेटीच्या तयारीसाठी ते मिस्साबलिदान अर्पण करत आणि देवाची आराधना करत.
तुम्हाला कशाची तहान आहे? ‘माझा जीव … साठी तहानला आहे’ हे वाक्य तुम्ही कसे पूर्ण कराल? नेमके कशासाठी? वरवरच्या आणि क्षणभंगुर गोष्टींचीच तहान आपल्याला कितीतरी वेळा लागते. सुखी होण्यासाठी आपण खूप धडपडतो, तरीही कित्येकदा ते सुख आपल्याला लाभत नाही. पण जी गोष्ट खरोखर आवश्यक आहे, जिच्यासाठी आपली निर्मिती झाली आहे, तिची आस आपण आपल्या अंतःकरणात प्रज्वलित होऊ दिली, तर जीवनात बाकी सर्व गोष्टी आपापल्या जागी बसतील. आपल्या साऱ्या ओढींच्या, आशांच्या आणि इच्छांच्या केंद्रस्थानी देव असेल, तर इथेच आणि आत्ताच आपल्याला ‘देवाचे मुख’ दिसू लागेल. देवाच्या गौरवाचे ओझरते दर्शनसुद्धा आपल्याला इतके तृप्त करील की जीवनाकडे पाहण्याची आपली संपूर्ण दृष्टी बदलेल आणि आपण जे काही करतो त्याला स्पष्ट आणि निश्चित दिशा मिळेल. आपल्या प्रत्येक नात्यावर याचा परिणाम होईल, आपल्या प्रत्येक निर्णयाला पवित्र आत्मा दिशा देईल आणि आपण शोधत असलेला जीवनाचा हेतू व अर्थ आपल्याला सापडेल. जेव्हा जेव्हा आपण आपल्या जीवनाचा विचार करू, तेव्हा आपण ज्या वाटेवर आहोत तिचे चिंतन करताना आपले चेहरे उजळून निघतील. त्या वाटेच्या शेवटी आपली वाट पाहणाऱ्या शाश्वत प्रतिफळाची आस आपल्याला पूर्ण उत्साहाने पुढे चालत राहण्याची प्रेरणा देईल.
आज तुमच्या ‘तहाने’वर मनन करा. पोकळ आश्वासनांवर आपले आयुष्य वाया घालवू नका. ऐहिक गोष्टींच्या आसक्तीत अडकू नका. देवाचा शोध घ्या. त्याच्या मुखाचे दर्शन मिळावे म्हणून झटा. त्याची इच्छा जाणून घेण्याचा आणि त्याचा गौरव पाहण्याचा प्रयत्न करा. मग ही ओढ तुम्हाला ज्या वाटेने नेईल, त्या वाटेवरून मागे फिरावेसे तुम्हाला कधीच वाटणार नाही.
हे येशू, एक दिवस मला तुझ्या संपूर्ण वैभवाचे आणि गौरवाचे दर्शन घडो. मला तुझे मुख पाहायला मिळो आणि तेच ध्येय माझ्या जीवनाच्या केंद्रस्थानी राहो. माझे सारे अस्तित्व या उत्कट इच्छेने व्यापून जावो आणि या वाटचालीचा आनंद मला भरभरून लाभो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
क्रुसाच्या पायथ्याशी ४० दिवस – एकोणिसावे चिंतन – बागेतील येशूची मरणवेदना
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
कोरोना विषाणूच्या महामारीचा सामना करण्यासाठी प्रार्थना





