मराठी

नीतिमान होण्याचे आपले पाचारण

19 मार्च 2026
मरियेचे पती संत योसेफ यांचा महोत्सव

आजची वाचने

व्हिडिओ

तिचा पती योसेफ नीतिमान होता. तिला लोकांसमोर लज्जित करण्याची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने गुप्तपणे तिला घटस्फोट देण्याचे ठरवले. त्याचा असा विचार असतानाच पाहा, प्रभूचा दूत त्याला स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला, “दाविदपुत्र योसेफा, तुझी पत्नी मरिया हिला आपल्या घरी आणण्यास भिऊ नकोस…” मत्तय 1:19–20

यहुदी परंपरेत नीतिमान असणे म्हणजे देवाच्या कराराशी पूर्णपणे सुसंगत असे जीवन जगणे. यात मोशेच्या नियमशास्त्राचे पालन करणे आणि ते देणाऱ्या देवावर श्रद्धा ठेवणे, या दोन्ही गोष्टींचा समावेश होता. केवळ नियमशास्त्राचे बाह्य पालन केल्याने मनुष्य नीतिमान ठरत नाही; देवावरील श्रद्धेने तो नीतिमान ठरतो. आठवा, “अब्रामाने प्रभूवर श्रद्धा ठेवली आणि प्रभूने ती त्याचे नीतिमत्त्व म्हणून गणली” (उत्पत्ती 15:6). अब्राहाम नीतिमान का ठरला, हे संत पौल स्पष्ट करतात: “त्याने अविश्वासामुळे देवाच्या अभिवचनाबद्दल शंका घेतली नाही; उलट, श्रद्धेमुळे त्याला बळ मिळाले, त्याने देवाचा गौरव केला आणि देवाने जे वचन दिले होते ते पूर्ण करण्यास तो समर्थ आहे, अशी त्याला पूर्ण खात्री होती” (रोमकरांस 4:20–21). नोहालाही नीतिमान म्हटले आहे, कारण “नोहा देवाबरोबर चालला” (उत्पत्ती 6:9).

पवित्र शास्त्राने ज्यांना नीतिमान म्हटले आहे, अशा आणखी एका व्यक्तीचा आज आपण सन्मान करतो: संत योसेफ. योसेफांना नीतिमान म्हणताना शुभवर्तमान त्यांना श्रद्धेने जगलेल्या जुन्या करारातील या प्रमुख व्यक्तींच्या पंक्तीत ठेवते. पण त्याच वेळी त्यांना त्या सर्वांहून उंच स्थान देते, कारण त्यांच्या श्रद्धेने जुन्या कराराची नव्हे, तर मशीहाची साक्ष दिली. स्वतःला किंमत मोजावी लागली तरी आपल्या निष्कलंक पत्नीची आणि बालयेशूची काळजी घेण्याच्या व त्यांचे रक्षण करण्याच्या देवाच्या पाचारणाशी ते एकनिष्ठ राहिले. त्यांची ही साक्ष प्रेरणादायी आहे. यातून आपल्याला दिसते की नीतिमत्त्व शेवटी त्यागमय प्रेमात आणि देवावरच्या अशा विश्वासात प्रकट होते, ज्यामुळे जगाचा तारणारा या जगात येतो.

योसेफांचे नीतिमत्त्व शब्दांत नव्हे, तर कृतीत दिसते. ते स्वप्नात देवदूताचे म्हणणे ऐकतात आणि पूर्ण विश्वासाने त्याला प्रतिसाद देतात: मरियेला आपल्या घरी आणतात आणि देहधारणेच्या रहस्यातील आपली भूमिका स्वीकारतात. देवदूताने त्यांना जे उघड करून सांगितले आणि जे करण्यास सांगितले, ते आकलनापलीकडचे होते. त्यामुळे योसेफांची श्रद्धा विशेष ठळकपणे दिसून येते. त्यांच्या पत्नीला “पवित्र आत्म्याद्वारे” गर्भ राहिला आहे आणि तिचे बाळ “आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारेल” (मत्तय 1:21), यावर विश्वास ठेवण्यास त्यांना सांगण्यात आले. योसेफांच्या प्रतिसादात श्रद्धा, धैर्य आणि उदारता दिसून आली: “योसेफ झोपेतून उठला, तेव्हा प्रभूच्या दूताने आज्ञा केल्याप्रमाणे त्याने केले आणि आपल्या पत्नीला घरी आणले” (मत्तय 1:24).

आपण सर्वांनी देवाला कसा प्रतिसाद द्यावा, हे योसेफ आपल्या उदाहरणाने दाखवतात. देवाने अब्राहामाला कल्पनाही करता येणार नाही अशी गोष्ट करण्यास सांगितली, तेव्हा त्याच्या श्रद्धेची परीक्षा झाली. त्याचप्रमाणे योसेफांच्या श्रद्धेने त्यांच्या मानवी विवेकाला देवाच्या प्रज्ञेच्या रहस्याच्या प्रकाशात दिशा दिली. देवाची योजना आपल्या आकलनापलीकडे जाते, तेव्हा योसेफांप्रमाणे देवावर विश्वास ठेवण्यास आपल्यालाही अनेकदा बोलावले जाते. प्रश्न आपल्या पाचारणाचा असो, एखाद्या परीक्षेचा असो किंवा जीवनातील अनपेक्षित वळणाचा असो, योसेफांचे उदाहरण आपल्याला शिकवते की श्रद्धेमुळे आपण देवाच्या नजरेने पाहू शकतो. त्यामुळे विश्वासाने आणि आज्ञाधारकपणे प्रतिसाद देण्यास आपल्या विवेकाला दिशा मिळते. त्यांचे अनुकरण करण्यासाठी धैर्य लागते; पण योसेफांप्रमाणे आपणही देवाचे हे शब्द ऐकले पाहिजेत: “भिऊ नकोस.” डोळ्यांना दिसते त्यावर नव्हे, तर श्रद्धेवर विसंबून चालण्यासाठी धैर्य, निष्ठा आणि दृढनिश्चय लागतो.

आजच्या महोत्सवात धन्य कुमारी मरियेचे पती म्हणून योसेफांना मिळालेल्या पाचारणावर विशेष भर दिला जातो. ते सुतार होते, पण देवाने सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी मुख्यतः आपल्या पत्नीची आणि बाळाची काळजी घेऊन पार पाडल्या. त्यांनी दोघांच्या गरजा भागवल्या आणि त्यांचे रक्षण केले. हेरोदाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी ते इजिप्तला पळून गेले आणि नंतर बेथलेहेम या आपल्या गावापासून दूर असलेल्या नाझरेथला गेले. देवाच्या इच्छेशी एकनिष्ठ राहून त्यांनी विशेषतः मरियेचा पत्नी म्हणून स्वीकार केला, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांमध्ये आणि परिचितांमध्ये संभ्रम व गैरसमज निर्माण झाले असण्याची शक्यता आहे. तरीही योसेफांनी या लौकिक अप्रतिष्ठेचा शांतपणे स्वीकार केला आणि लोकांच्या मतांपेक्षा देवाच्या आज्ञापालनाला प्राधान्य दिले. त्यांच्यासाठी देवाची इच्छा सर्वप्रथम होती, आणि त्यांच्या कृतीतून प्रकट झालेली श्रद्धा हेच त्यांच्या नीतिमत्त्वाचे मूळ होते.

देवाने तुम्हाला दिलेल्या पाचारणावर आणि सोपवलेल्या कार्यावर आज चिंतन करा. तुमचे पाचारण किंवा जीवनातील परिस्थिती कोणतीही असो, परीक्षा आणि संकटे येणारच. आपल्या नीतिमत्त्वाची खरी कसोटी संकटे टाळण्यात नाही, तर देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून आपण त्यांना कसे सामोरे जातो, यात आहे. स्वर्गीय पित्याने संत योसेफ, धन्य कुमारी मरिया आणि बालयेशू यांनाही या जगातील संकटांना सामोरे जाऊ दिले, तर आपल्यालाही अशा संकटांना सामोरे जावे लागेल, हे निश्चित. त्या संकटांना कसा प्रतिसाद द्यावा, हे आज संत योसेफ आपल्याला शिकवतात. ज्या अडचणी तुम्ही सहसा टाळता किंवा ज्यांबद्दल तक्रार करता, त्यांवर मनन करा. संत योसेफांचे अनुकरण करून देवाची गूढ इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि संपूर्ण अंतःकरणाने तिचे पालन करा.

हे संत योसेफ, तुम्ही देवाच्या गूढ योजनेवर विश्वास ठेवला आणि अढळ श्रद्धेने त्या योजनेनुसार वागलात, म्हणून तुम्ही नीतिमान ठरलात. माझ्या जीवनात देवाने दिलेले पाचारण जगताना मला तुमच्या उदाहरणाचे अनुसरण करता यावे, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा. मी माझ्या कर्तव्यांपासून कधीही दूर पळू नये, तर धैर्याने, नम्रतेने आणि देवाच्या इच्छेवर भरवसा ठेवून ती स्वीकारावीत. हे संत योसेफ, माझ्यासाठी प्रार्थना करा. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सव्विसाव्या दिवसाची चिंतने:
वाळवंटातील 40 दिवस & क्रुसापाशी 40 दिवस

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावर आधारित चिंतने

सर्व संत / सण

अधिक वाचन – धन्य कुमारी मरियेचे पती संत योसेफ यांचा महासण

मिस्सातील वाचनांचे पर्याय