मराठी

संभ्रमातही अढळ श्रद्धा

गुरुवार, 19 मार्च 2020

मरियेचा पती संत योसेफ यांचा महोत्सव

आजची वाचने

दाविदाचा पुत्र योसेफा, मरियेला आपली पत्नी म्हणून घरी आणण्यास भिऊ नकोस. कारण तिच्या उदरी हा गर्भ पवित्र आत्म्याद्वारे राहिला आहे. ती एका पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवील.  मत्तय 1:20

संत योसेफ किती धन्य होते! देवाच्या पुत्राचे पृथ्वीवरील पिता आणि देवमातेचे पती होण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते! या जबाबदारीचे मोठेपण जाणवून ते थक्क झाले असतील, आणि एवढ्या महान पाचारणापुढे कधी कधी पवित्र भयाने थरथरलेही असतील.

पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या पाचारणाची सुरुवात जणू एका लांच्छनास्पद घटनेने झाली होती. मरिया गर्भवती होती, पण तो गर्भ योसेफापासून नव्हता. हे कसे शक्य होते? मानवी दृष्टीने पाहता, मरिया आपल्याशी निष्ठावान राहिली नाही, एवढेच एक स्पष्टीकरण शक्य वाटत होते. पण योसेफ मरियेला जसे ओळखत होते, त्याच्या हे अगदीच उलट होते. वरकरणी दिसणाऱ्या या पेचाला सामोरे जाताना त्यांना मोठा धक्का बसला असेल आणि ते फारच संभ्रमात पडले असतील. त्यांनी काय करावे?

सुरुवातीला त्यांनी काय ठरवले, हे आपल्याला माहीत आहे. त्यांनी गाजावाजा न करता तिला सोडून देण्याचे ठरवले. पण मग देवदूताने स्वप्नात त्यांच्याशी संवाद साधला. झोपेतून जागे झाल्यावर, “प्रभूच्या दूताने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी केले आणि आपल्या पत्नीला घरी आणले.”

या प्रसंगात मनन करण्यासारखी एक गोष्ट अशी आहे की योसेफांना आपल्या पत्नीचा आणि तिच्या पुत्राचा श्रद्धेने स्वीकार करावा लागला. त्यांच्या या नव्या कुटुंबाचे रहस्य केवळ मानवी बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे होते. नुसता विचार करून त्याचा उलगडा होणे शक्य नव्हते. त्यांना हे रहस्य श्रद्धेने स्वीकारावे लागले.

श्रद्धा ठेवणे म्हणजे आपल्या विवेकबुद्धीतून आपल्याशी बोलणाऱ्या देवाच्या वाणीवर विसंबून राहणे. हो, स्वप्नात देवदूताने जे सांगितले त्यावर योसेफ विसंबले, पण शेवटी ते एक स्वप्न होते! माणसांना कितीतरी विचित्र स्वप्ने पडतात! मानवी स्वभावानुसार त्यांनाही त्या स्वप्नाबद्दल शंका आली असती आणि ते खरे होते का, असा प्रश्न पडला असता. हा संदेश खरोखर देवाकडून आला होता का? हे बालक खरोखर पवित्र आत्म्याद्वारे गर्भात आले आहे का? हे कसे शक्य आहे?

या सर्व प्रश्नांची आणि संत योसेफांच्या मनात उठलेल्या इतर कोणत्याही प्रश्नांची उत्तरे केवळ श्रद्धेतूनच मिळू शकत होती. दिलासा देणारी गोष्ट ही की श्रद्धा खरोखर उत्तरे देते. जीवनातल्या संभ्रमाला खंबीरपणे, दृढ विश्वासाने आणि निश्चयाने सामोरे जाण्याचे बळ श्रद्धा देते. अनिश्चिततेच्या काळातही ती शांतीचे दार उघडते. ती भीती दूर करते आणि तिच्या जागी आपण देवाच्या इच्छेनुसार चालत आहोत, या जाणिवेचा आनंद देते. श्रद्धा आपल्याला सावरते, आणि जीवनात टिकून राहण्यासाठी आपल्या सर्वांना तिची गरज आहे.

आज ज्या गोष्टी तुम्हाला अडचणीच्या वाटतात, त्यांना सामोरे जाताना तुमची श्रद्धा किती खोल आहे, यावर मनन करा. सध्या तुमच्या जीवनातील एखादे आव्हान स्वीकारण्यासाठी देव तुम्हाला बोलावत आहे, असे वाटत असेल, तर संत योसेफांच्या उदाहरणाचे अनुसरण करा. देवाचे हे शब्द मनापासून ऐका: “भिऊ नका!” देवाने संत योसेफांना हे सांगितले आणि तो तुम्हालाही हेच सांगतो. देवाचे मार्ग आपल्या मार्गांपेक्षा, त्याचे विचार आपल्या विचारांपेक्षा आणि त्याचे ज्ञान आपल्या ज्ञानापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. संत योसेफांच्या जीवनासाठी देवाची एक परिपूर्ण योजना होती आणि तुमच्यासाठीही त्याची अशीच योजना आहे. दररोज श्रद्धेने वाटचाल करा, म्हणजे ती गौरवशाली योजना उलगडताना तुम्हाला दिसेल.

हे प्रभू, मला दररोज श्रद्धेने वाटचाल करण्याचे बळ दे. केवळ मानवी ज्ञानाच्या मर्यादांपलीकडे जाऊन सर्व गोष्टींत तुझी दैवी योजना ओळखण्याची दृष्टी मला दे. हे संत योसेफ, तुम्ही जसे श्रद्धेने जगलात तसे मलाही जगता यावे, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा. हे संत योसेफ, आमच्यासाठी प्रार्थना करा. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

क्रुसाच्या पायथ्याशी 40 दिवस – बाविसावे चिंतन – “पाहा, तुमचा राजा!”

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

कोरोना विषाणूच्या महामारीचा सामना करण्यासाठी प्रार्थना

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय