मराठी

सर्वांत श्रेष्ठ कृती करण्यास विलंब करू नका!

20 मार्च 2020
प्रायश्चित्तकाळातील तिसऱ्या आठवड्याचा शुक्रवार
आजची वाचने

एका शास्त्रज्ञाने येशूकडे येऊन विचारले, “सर्व आज्ञांमध्ये पहिली आज्ञा कोणती?” येशूने उत्तर दिले, “पहिली आज्ञा ही आहे: हे इस्राएला, ऐक! प्रभू आपला देव हाच एकमेव प्रभू आहे! तू आपला देव प्रभू ह्याच्यावर आपल्या संपूर्ण हृदयाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रेम कर.” मार्क 12:28–30

आपल्या संपूर्ण अस्तित्वाने देवावर प्रेम करणे ही जीवनात तुम्ही करू शकणारी सर्वांत श्रेष्ठ कृती आहे, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. म्हणजेच, आपल्या संपूर्ण हृदयाने, जिवाने, मनाने आणि शक्तीने त्याच्यावर प्रेम करणे. आपल्या मानवी क्षमतांचे सारे बळ लावून, इतर सर्व गोष्टींपेक्षा देवावर अधिक प्रेम करणे, हे ध्येय साधण्यासाठी तुम्ही आयुष्यभर प्रयत्नशील राहिले पाहिजे. पण याचा नेमका अर्थ काय?

सर्वप्रथम, प्रेमाची ही आज्ञा आपल्या अस्तित्वाच्या विविध अंगांचा उल्लेख करते. यावरून हे ठळक होते की देवावर पूर्णपणे प्रेम करण्यासाठी आपण आपल्या अस्तित्वाचे प्रत्येक अंग त्याला अर्पण केले पाहिजे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर आपल्या अस्तित्वाची ही विविध अंगे अशी आहेत: बुद्धी, इच्छाशक्ती, तीव्र भाववृत्ती, भावना, भावावेश आणि इच्छा. या सर्व अंगांनी आपण देवावर प्रेम कसे करावे?

आपण मनापासून सुरुवात करतो. देवावर प्रेम करण्याची पहिली पायरी म्हणजे त्याला जाणून घेणे. याचा अर्थ असा की देव कोण आहे आणि त्याच्याविषयी आपल्याला जे काही प्रकट झाले आहे, ते नीट समजून घेण्याचा, त्याचा अर्थ उमजून घेण्याचा आणि त्यावर श्रद्धा ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच, विशेषतः पवित्र शास्त्राच्या आणि चर्चच्या इतिहासात मिळालेल्या असंख्य प्रकटीकरणांच्या आधारे, देवाच्या जीवनाचे रहस्य अधिक खोलवर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

दुसरे म्हणजे, देव आणि त्याने प्रकट केलेले सर्व काही आपल्याला अधिक खोलवर समजू लागते, तेव्हा आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याचा आणि त्याच्या मार्गाने चालण्याचा निर्णय स्वेच्छेने घेतो. त्याला जाणून घेतल्यावर असा निर्णय घेणे आवश्यक आहे; तो निर्णय म्हणजे त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याची कृती होय.

तिसरे म्हणजे, देवाच्या जीवनाचे रहस्य आपल्याला उलगडू लागते आणि आपण त्याच्यावर व त्याने प्रकट केलेल्या सर्व गोष्टींवर श्रद्धा ठेवण्याचा निर्णय घेतो, तेव्हा आपले जीवन बदलत असल्याचे आपल्याला दिसेल. विशेषतः, देवाची ओढ आपल्याला लागेल आणि त्याची इच्छा आपल्या जीवनात पूर्ण व्हावी असे आपल्याला वाटेल. त्याचा अधिक शोध घ्यावासा वाटेल, त्याच्या मार्गाने चालण्यात आनंद मिळेल आणि हळूहळू आपल्या मानवी आत्म्याच्या सर्व शक्ती देवाच्या आणि त्याच्या मार्गांच्या प्रेमाने व्यापून जात आहेत, असा अनुभव आपल्याला येईल.

आज देवावर प्रेम करण्याच्या पहिल्या अंगावर विशेष चिंतन करा. देवाला आणि त्याने प्रकट केलेल्या सर्व गोष्टींना जाणून घेण्यासाठी व समजून घेण्यासाठी तुम्ही किती आस्थेने प्रयत्न करता, याचा विचार करा. संपूर्ण अस्तित्वाने देवावर प्रेम करण्यासाठी ही ओळखच पाया ठरली पाहिजे. इथून सुरुवात करा आणि बाकीच्या गोष्टी त्यातून घडू द्या. यासाठी एक मार्ग म्हणजे आपल्या कॅथलिक श्रद्धेचा सर्वांगीण अभ्यास सुरू करणे (पाहा: www.mycatholic.life).

हे प्रभू, सर्वांपेक्षा अधिक प्रेम तुझ्यावर करण्यासाठी मी तुला जाणून घेतले पाहिजे, हे मला उमगते. तुला जाणून घेण्याच्या आणि तुझ्या जीवनातील सर्व गौरवशाली सत्यांचा शोध घेण्याच्या माझ्या संकल्पात मला निष्ठेने प्रयत्न करत राहण्यास मदत कर. तू मला जे काही प्रकट केले आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. आज तुझे जीवन आणि तू प्रकट केलेले सत्य अधिक सखोलपणे जाणून घेण्यासाठी मी स्वतःला अर्पण करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

क्रुसाच्या पायाशी 40 दिवस – तेविसावे चिंतन – मृत्युदंडाची शिक्षा

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

कोरोना विषाणूच्या महामारीचा सामना करण्यासाठी प्रार्थना

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय