१८ एप्रिल २०२०
पुनरुत्थानाच्या अष्टकातील शनिवार
आजची वाचने

पण नंतर ते अकरा जण जेवायला बसले असताना तो त्यांना प्रकट झाला. तो मेलेल्यांतून उठवला गेल्यानंतर ज्यांनी त्याला पाहिले होते, त्यांच्यावर या अकरा जणांनी विश्वास ठेवला नाही. म्हणून त्यांच्या अविश्वासाबद्दल आणि हृदयाच्या कठोरपणाबद्दल त्याने त्यांना खडसावले. मार्क 16:14
येशू मेलेल्यांतून उठला यावर प्रेषितांनी विश्वास का ठेवला नाही? येशूने केलेले कितीतरी अद्भुत चमत्कार त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. तीन वर्षे ते दिवसेंदिवस त्याच्यासोबत राहिले होते. तो पूर्ण अधिकाराने आणि कृपेने सुवार्ता सांगत होता व शिकवत होता, हे त्यांनी स्वतः ऐकले होते. तरी आता, तो मेलेल्यांतून उठल्यानंतर, त्यांची हृदये कठोर झाली होती आणि त्यांनी लगेच विश्वास ठेवला नाही. येशूला त्यांच्यासमोर प्रकट होऊन त्यांच्या डोळ्यांसमोरच हा पुरावा द्यावा लागला.
प्रेषितांनी अनुभवलेला हा संघर्ष आपल्यालाही वारंवार अनुभवायला येतो. हा संघर्ष हृदयाच्या कठोरपणाशी आहे. त्यांना विश्वास ठेवायचा होता, पण काही पुरावा मिळेपर्यंत पुनरुत्थानाचा खऱ्या श्रद्धेने, मोकळ्या मनाने स्वीकार करणे त्यांना जमले नाही. त्यांना जितका पुरावा हवा होता, तितका त्यांच्या अंतःकरणात आधीपासूनच होता, याची त्यांना कल्पनाही नव्हती.
श्रद्धा बाळगण्याचे, त्याच्यावर विश्वास ठेवण्याचे आणि अनेक गोष्टी श्रद्धेने स्वीकारण्याचे आमंत्रण येशू आपल्याला कितीतरी वेळा देतो. श्रद्धेची देणगी आपल्या हृदयातील एका छोट्याशा ज्योतीसारखी आहे. आपण निष्काळजीपणे ती वाऱ्यावर उघडी सोडतो. या निष्काळजीपणामुळे ती ज्योत मोठी होण्याआधीच विझू शकते.
श्रद्धेच्या त्या ज्योतीचा देवाच्या इच्छेप्रमाणे धगधगता अग्नी होऊ देणे, हे आपल्या ख्रिस्ती जीवनप्रवासाचे ध्येय आहे. आणि हे शक्य आहे! ती ज्योत सर्वस्व व्यापून टाकणारा असा अग्नी बनू शकते की तो कशानेही विझणार नाही. ती ज्योत तेजाने पेटत राहावी म्हणून जे करायला हवे ते करण्याची तुमची तयारी आहे का? आणि हे आपण कसे करायचे?
आपल्या अंतःकरणात श्रद्धेचा असा धगधगता अग्नी पेटण्यासाठी, तिथे आधीपासून असलेली ठिणगी आपण कशी जपतो, हे महत्त्वाचे आहे. त्या छोट्याशा ज्योतीची काळजी घेऊन ती वाढवली पाहिजे. आपल्या श्रद्धेची सुरुवात फार काळजीपूर्वक जपली पाहिजे. ती वाढावी म्हणून तिचे रक्षण केले पाहिजे आणि तिला इंधन दिले पाहिजे. त्यासाठी आपण करू शकतो ती एक गोष्ट म्हणजे प्रार्थनेच्या जीवनात निष्काळजीपणा टाळणे.
आपल्या अंतःकरणात देवाचे जीवन वाढू देण्याची गुरुकिल्ली म्हणजे प्रार्थना. तो तिथेच आहे. तो आपल्याशी बोलतो आणि आपल्याला विश्वास ठेवण्यासाठी बोलावतो. जेव्हा जेव्हा आपण शंका घेतो किंवा आपले हृदय कठोर करतो, तेव्हा तेव्हा आपण ती चिमुकली ज्योत वाऱ्यापावसाच्या माऱ्यासमोर उघडी सोडतो. पण जेव्हा जेव्हा आपण एकाग्रतेने त्या ज्योतीकडे लक्ष देतो, तेव्हा तेव्हा तिला वाढून स्थिर होण्यास वाव मिळतो. प्रार्थना करणे, ऐकणे, शोध घेणे, प्रेम करणे आणि विश्वास ठेवणे हे देव आपल्याला देऊ इच्छित असलेली श्रद्धा स्वीकारण्याचे मार्ग आहेत. प्रेषितांनी आपली हृदये कोमल करून त्यांच्या अंतःकरणात खोलवर पेरलेल्या श्रद्धेच्या देणगीला वाढू दिले असते, तर येशू जिवंत आहे यावर त्यांनी त्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची गरज न पडता, लगेच आणि सहज विश्वास ठेवला असता.
आज या गोष्टीवर चिंतन करा: पुनरुत्थित ख्रिस्त आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याला ओळखण्याची आणि त्याच्यावर प्रेम करण्याची क्षमता प्रेषितांप्रमाणेच आपल्यातही आहे. ख्रिस्ताशी तुमची ओळख अधिक खोल व्हावी आणि त्याच्यावरचे तुमचे प्रेम वाढावे, यासाठी तुम्ही दररोज काय करता? तुमच्या श्रद्धेच्या जीवनात या ज्योतीचा सर्वस्व व्यापून टाकणारा धगधगता अग्नी व्हावा म्हणून तुम्ही काय करता? आज प्रार्थनेला पुन्हा नव्याने स्वतःला वाहून घ्या आणि ख्रिस्तावरील तुमची श्रद्धा कशी तेजाने बहरते ते पाहा!
प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझ्या हृदयात पेटवलेल्या श्रद्धेच्या ज्योतीचा सर्वस्व व्यापून टाकणारा धगधगता अग्नी व्हावा, यासाठी मला मदत कर. तुला ओळखायला आणि तुझ्यावर प्रेम करायला मला मदत कर, म्हणजे तुझ्याशी झालेली ही ओळख आणि तुझ्यावरचे हे प्रेम मला बदलून टाकतील. या अग्नीने माझा आत्मा शुद्ध कर आणि माझ्या हृदयातील सारा कठोरपणा दूर कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
नववा दिवस: दैवी दयेच्या रविवारच्या तयारीची नोव्हेना

दैवी दयेवरील दैनंदिन चिंतन:
संत फॉस्तिनाबरोबर 365 दिवस




