२९ मे २०२०
पास्काच्या सातव्या आठवड्यातील शुक्रवार
आजची वाचने
संत पॉल सहावे, पोप — ऐच्छिक स्मृतिदिन

त्याने तिसऱ्यांदा त्याला विचारले, “योहानाचा पुत्र शिमोन, तू माझ्यावर प्रेम करतोस का?” “तू माझ्यावर प्रेम करतोस का?” असे त्याने तिसऱ्यांदा विचारल्यामुळे पेत्राला दुःख झाले. तो त्याला म्हणाला, “प्रभू, तुला सर्व काही माहीत आहे; माझे तुझ्यावर प्रेम आहे, हेही तुला माहीत आहे.” येशू त्याला म्हणाला, “माझ्या मेंढरांना चार.” योहान 21:17
येशूने पेत्राला तीनदा विचारले की त्याचे आपल्यावर प्रेम आहे का. तीनदाच का? एक कारण असे की पेत्राने तीनदा येशूला नाकारले होते आणि त्याची “भरपाई” करण्याची संधी त्याला मिळावी. येशूला पेत्राने तीनदा क्षमा मागण्याची गरज नव्हती. पण पेत्राला आपले प्रेम तीनदा व्यक्त करण्याची गरज होती, आणि हे येशूला माहीत होते.
तीन ही संख्या पूर्णत्वही दर्शवते. उदाहरणार्थ, आपण देवाला “पवित्र, पवित्र, पवित्र” असे म्हणतो. देव सर्वांहून पवित्र आहे, हे व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. येशूवर आपले प्रेम आहे असे तीनदा सांगण्याची संधी पेत्राला मिळाली. त्यामुळे त्याला आपले प्रेम अंतःकरणाच्या अगदी तळापासून व्यक्त करता आले.
अशा रीतीने, पेत्राने तीनदा आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि त्याने तीनदा केलेला नकारही पुसला गेला. यातून आपल्यालाही देवावर प्रेम करण्याची आणि त्याची दया मागण्याची किती गरज आहे, हे उमगले पाहिजे. तेही अशाच “तिहेरी” रीतीने केले पाहिजे.
आपले देवावर प्रेम आहे असे तुम्ही त्याला सांगता, तेव्हा ते प्रेम किती खोल असते? ते केवळ ओठांपुरते असते, की तुमचे संपूर्ण जीवन व्यापून टाकणारे प्रेम असते? देवावर प्रेम आहे असे तुम्ही म्हणता, ते अगदी मनापासून म्हणता का? की ते प्रेम अधिक खोल व्हावे म्हणून अजून प्रयत्न करण्याची गरज आहे?
आपले प्रेम अधिक खोल व्हावे म्हणून आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. म्हणूनच हा उतारा आपल्यासाठी इतका महत्त्वाचा आहे. येशू आपल्यालाही हाच प्रश्न तीनदा विचारतो आहे, हे आपण ऐकले पाहिजे. “प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे” एवढे एकदाच म्हटल्याने त्याचे समाधान होत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. हे शब्द त्याला पुन्हा पुन्हा ऐकायचे आहेत. हे प्रेम अंतःकरणाच्या अगदी तळापासून व्यक्त करण्याची आपल्याला गरज आहे, हे त्याला माहीत आहे. म्हणून तो आपल्याला हा प्रश्न विचारतो. “प्रभू, तुला सर्व काही माहीत आहे; माझे तुझ्यावर प्रेम आहे, हेही तुला माहीत आहे!” हेच आपले अंतिम उत्तर असले पाहिजे.
तीनदा विचारलेला हा प्रश्न आपल्याला त्याच्या दयेची आपल्या अंतःकरणात किती खोल आस आहे, हे व्यक्त करण्याचीही संधी देतो. आपण सगळेच पाप करतो. आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे येशूला नाकारतो. पण शुभवार्ता ही आहे की आपल्या पापामुळे खचून न जाता, त्यातून आपले प्रेम अधिक खोल करण्याची प्रेरणा घ्यावी, असे आमंत्रण येशू आपल्याला नेहमी देतो. तो आपल्यावर राग धरून बसत नाही. तो रुसून बसत नाही. आपल्या पापाची आठवण करून देत तो आपल्याला सतत दोष देत नाही. मात्र, आपल्या पापाबद्दल आपल्याला अंतःकरणापासून दुःख व्हावे आणि आपल्या हृदयाचे संपूर्ण परिवर्तन व्हावे, अशी त्याची अपेक्षा आहे. आपण पापापासून पूर्णपणे दूर वळावे, अशी त्याची इच्छा आहे.
आज तुमचे देवावरचे प्रेम किती खोल आहे आणि ते तुम्ही त्याच्यापाशी किती चांगल्या प्रकारे व्यक्त करता, यावर चिंतन करा. देवावरचे तुमचे प्रेम तिहेरी रीतीने व्यक्त करण्याचा निश्चय करा. ते प्रेम खोल, प्रामाणिक आणि कधीही मागे न घेतले जाणारे असू द्या. प्रभू तुमची ही अंतःकरणापासून केलेली कृती स्वीकारेल आणि त्याबदल्यात तुम्हाला शंभरपट प्रेम देईल.
प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे, हे तुला खरोखर माहीत आहे. माझ्यात किती दुर्बलता आहे, हेही तुला माहीत आहे. तुझ्यावरचे माझे प्रेम आणि तुझ्या दयेची माझी आस व्यक्त करण्यासाठी तू मला देत असलेले आमंत्रण मला ऐकू येऊ दे. हे प्रेम आणि ही आस मला पूर्ण अंतःकरणाने तुझ्यापुढे मांडता येऊ दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
पवित्र आत्म्याची नोव्हेना
पेन्टेकॉस्टच्या तयारीसाठी केली जाणारी प्रार्थना
आठवा दिवस – शुक्रवार, २९ मे
आजचे संत – संत पॉल सहावे, पोप





