मराठी

प्रार्थनेची सवय

२१ ऑक्टोबर २०२०
सामान्य काळातील एकोणतिसाव्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “हे नक्की लक्षात ठेवा: चोर कोणत्या वेळी येणार हे घरमालकाला माहीत असते, तर त्याने चोराला आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही तयार राहा, कारण तुम्हाला अपेक्षा नसेल अशा वेळी मानवपुत्र येईल.”  लूक 12:39-40

पवित्र शास्त्रातील हा उतारा आपल्याला एक आमंत्रण देतो.  येशू आपल्याला अपेक्षा नसताना दोन प्रकारे आपल्याकडे येतो, असे म्हणता येईल.

पहिली गोष्ट म्हणजे, जिवंतांचा आणि मृतांचा न्याय करण्यासाठी तो एके दिवशी वैभवाने परत येईल, हे आपल्याला माहीत आहे.  त्याचे दुसरे आगमन ही खरी गोष्ट आहे आणि ते कोणत्याही क्षणी घडू शकते, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.  अर्थात, ते घडायला अनेक वर्षे, कदाचित शेकडो वर्षेही लागतील; पण ते घडणार हे निश्चित आहे.  असा एक क्षण येईल, जेव्हा आज जसे आहे तसे हे जग संपुष्टात येईल आणि एक नवी व्यवस्था प्रस्थापित होईल.  त्या दिवसाची, त्या क्षणाची वाट पाहत आपण प्रत्येक दिवस जगायला हवा.  त्या अंतासाठी आपण सदैव तयार असू, अशा रीतीने आपण जगले पाहिजे.  

दुसरी गोष्ट म्हणजे, येशू आपल्या कृपेने सतत आपल्याकडे येत असतो, हे आपण ओळखले पाहिजे.  परंपरेनुसार आपण त्याच्या दोन आगमनांविषयी बोलतो: १) त्याचे देहधारण आणि २) त्याचे वैभवाने पुन्हा येणे.  पण त्याच्या तिसऱ्या आगमनाविषयीही आपण बोलू शकतो: ते म्हणजे तो आपल्या कृपेने आपल्या जीवनात येतो.  हे आगमन खरोखर घडते आणि त्याकडे आपण सतत लक्ष दिले पाहिजे.  कृपेने येणाऱ्या येशूला भेटण्यासाठी आपण सतत ‘तयार’ असले पाहिजे.  आपण तयार नसलो, तर त्याची भेट नक्कीच हुके‍ल.  कृपेद्वारे होणाऱ्या या आगमनासाठी आपण कशी तयारी करावी?  त्यासाठी सर्वांत आधी दररोज अंतःकरणातून प्रार्थना करण्याची सवय आपण जोपासली पाहिजे.  अंतःकरणातून प्रार्थना करण्याची सवय म्हणजे, एका अर्थाने, सतत प्रार्थनेत असणे.  म्हणजेच, रोजच्या जीवनात आपण काहीही करत असलो, तरी आपले मन आणि हृदय नेहमी देवाकडे वळलेले असते.  हे श्वास घेण्यासारखे आहे.  आपण सतत श्वास घेतो आणि त्यासाठी आपल्याला विचारही करावा लागत नाही.  श्वास घेण्याइतकीच प्रार्थनाही आपल्या अंगवळणी पडली पाहिजे.  आपण कोण आहोत आणि कसे जगतो, या दोन्हींच्या केंद्रस्थानी प्रार्थना असली पाहिजे.

आज आपल्या प्रार्थनामय जीवनावर चिंतन करा.  दररोज केवळ प्रार्थनेसाठी राखून ठेवलेले क्षण तुमच्या पवित्रतेसाठी आणि देवाशी असलेल्या तुमच्या नात्यासाठी अत्यावश्यक आहेत, हे ध्यानात ठेवा.  या क्षणांमुळे देवाकडे सदैव लक्ष देण्याची सवय तुमच्यात रुजली पाहिजे, हेही लक्षात ठेवा.  अशी तयारी असेल, तर ख्रिस्त आपल्या कृपेने तुमच्याकडे येईल त्या प्रत्येक क्षणी तुम्हाला त्याची भेट घेता येईल.

हे प्रभू, प्रार्थनामय जीवन माझ्या अंतःकरणात रुजवायला मला मदत कर.  मी सतत तुझा शोध घ्यावा आणि तू येशील तेव्हा तुला भेटण्यासाठी सदैव तयार असावे, यासाठी मला मदत कर.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

चित्र: ‘तुम्हाला माझ्याबरोबर एक तासही जागता आले नाही’ — जेम्स तिसो